Home महाराष्ट्र कोकण अतुट विश्वासाचं नातं हीच माझी ओळख- निलमताई राणे

अतुट विश्वासाचं नातं हीच माझी ओळख- निलमताई राणे

1

नारायण राणे या व्यक्तिमत्त्वाबरोबर ३६-३७ वर्ष लग्नगाठ होऊन मी संसार करते आहे. साहेबांनी आम्हाला सांभाळून घेतलं. त्यांच्यासोबतचं अतुट विश्वासाचं नातं हीच माझी समाजाकरता ओळख आहे.
कणकवली- नारायण राणे या व्यक्तिमत्त्वाबरोबर ३६-३७ वर्ष लग्नगाठ होऊन मी संसार करते आहे. साहेबांनी आम्हाला सांभाळून घेतलं. त्यांच्यासोबतचं अतुट विश्वासाचं नातं हीच माझी समाजाकरता ओळख आहे. माझे पती, माझी मुलं, माझ्या सुना आणि नातू हेच माझं विश्व आहे.

साहेबांनी परिवार म्हणून आम्हाला सगळय़ांना एका धाग्यात गुंफलं. त्यांनी दिलेलं वळण आणि मुलांना केलेलं मार्गदर्शन, त्यांना दिलेलं शिक्षण आणि संस्कार हे सर्व त्यांनी आम्हाला दिलं आणि त्यामुळे साहेब मोठे होत असतानाच त्यांनी आमच्या परिवारालाही मोठं केलं’..

सौ. निलमताई राणे बोलत होत्या, २५ मे रोजी त्यांचा वाढदिवस, त्या निमित्ताने त्यांनी मनोगत व्यक्त करावं अशी कल्पना त्यांच्यासमोर मांडली आणि अतिशय मोकळेपणाने त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यात आड-पडदा नव्हता. एवढेच नव्हे तर एक धर्मपत्नी, आई आणि एवढं मोठं नाव असलेलं कुटुंब सांभाळणारी एक गृहिणी अशा सगळय़ा भूमिकेतून त्यांनी आपल्या भावना मोकळेपणाने मांडल्या.

‘एक कर्तृत्वान महिला’

माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि निलमताई राणे हे दाम्पत्य म्हणजे कोकणवासीयांना मिळालेले एक अपूर्व लेणे आहे. निलमताई राणे वहिनींच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे यांनी निलमताईंबद्दल म्हणजे आपल्या सौभाग्यवतीबद्दल एका मुलाखतीत व्यक्त केलेले भावविश्व..

मूळच्या विचारे कुटुंबातल्या निलमताई या चेंबूरलाच राहणा-या. नारायण राणे चेंबूर येथेच राहणारे. त्यावेळी ते शिवसेनेचे सैनिक. विचारे कुटुंबातले निलमताईंचे काका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक. ‘‘आमच्या घरात जे वातावरण होतं, त्याच्या अगदी उलट वातावरण राणे कुटुंबीयात. हे शिवसेनेत, त्यामुळे शिवसेनेच्या आचारधर्माप्रमाणे हे काहीसे आक्रमक. त्याचवेळी शिवसेनेचे दाक्षिणात्यांविरुद्ध मुंबईत आंदोलन सुरू होते आणि ‘हे’पण त्यात भाग घेत. आमच्या घरी ते माहीत होतं. माझ्या वडिलांचे कॅन्सरने निधन झाल्यानंतर माझ्या लग्नाची घाई सुरू झाली. कुटुंबात असा एखादा दुर्दैवाने मृत्यू झाला की, वर्षभरात लग्न करावं अशी जुनी पद्धत. घरात सर्व जबाबदारी आईवर आली. एकेदिवशी ‘ह्यांचे’ मामा आमच्या काकांनाच विचारायला आले. ‘तुमची पुतनी आमच्या भाच्याला द्याल का..’’ निलमताई आवंढा गिळून म्हणाल्या.. ‘‘माझे वडील कदाचित असते तर एखाद् वेळेस ‘नाही’ म्हणाले असते; पण काका ‘हो’ म्हणाले आणि १९७९ साली लग्न झालं. लग्नापूर्वी हे जेवढे आक्रमक होते, निलेशचा जन्म झाला आणि हे खूप शांत झाले. लग्न झाल्यानंतर मी राणे कुटुंबीयात आले. तर यांच्या घरी असलेला दीर आणि नणंद यांची मुलं सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर आली. मी लहान होते. नुकतंच लग्न झालेलं आणि या तीन मुलांची जबाबदारी माझ्यावर पडली. खरं तर मला वाटलं होतं की, लग्न होण्यापूर्वी मला सांगितलं गेलं असतं की, ‘ही तीन मुलं तुला सांभाळायची आहेत’ तर बरं झालं असतं; पण मी म्हटलं आता माघार घ्यायची नाही. अन् संसार सुरू केला तो नणंद, दीराची मुलं सांभाळून. माझ्या लग्नापूर्वीच वडील गेले होते. आई काही काम करून कुटुंब चालवत होती. मला पहिला समाधानाचा क्षण होता, ‘ह्यांनी’ सांगितले ‘आईना आता काम करायला सांगायचं नाही; त्यांना आपण सांभाळू’ आणि त्यांनी शेवटपर्यंत माहेरचे घर त्यांचे मानले. बोलल्याप्रमाणे ते वागले. माझ्या दृष्टीने ही खूप मोठी गोष्ट होती. त्यावेळी त्यांची आर्थिक स्थिती फार उत्तम होती असे नव्हे. इन्कम टॅक्समध्ये नोकरी होती. तरीही त्यांनी शब्द पाळला..’’

‘‘एक दिवस त्यांनी मला सांगितले. ‘मी नोकरी सोडून महानगरपालिकेची निवडणूक लढवतो आहे..’ माझ्या छातीत धस्स झाले. तिथपर्यंत मला ‘निवडणूक म्हणजे काय’ हे फारसं माहीत नव्हतं. मी मत व्यक्त केलं, ‘निवडणूक लढवण्याच्या भानगडीत पडू नका, चांगली इन्कम टॅक्सची नोकरी सोडू नका. त्यांच्यासमोर जे उमेदवार होते ते मुजूमदार नावाचे गृहस्थ होते. तीन-चार वेळा निवडून आले होते. त्यांच्यासमोर निभाव लागणार नाही असे मला वाटत होते. माझ्या मैत्रिणीही मला सांगत होत्या की, तुझ्या मिस्टरांनी निवडणूक लढवू नये. सगळे नकारात्मक बोलत होते. पण साहेब म्हणाले मी निवडणूक लढवणार. संधी आलेली आहे, आपण त्याचं सोनं करू आणि मग मात्र मी ठरवलं की, आपलं मत आपण मांडलं, त्यांनी निर्णय घेतला आहे. त्यांच्या मनासारखं त्यांना करू द्यावं. त्यांच्यासोबत राहावं, होता होईल तेवढी मदत करावी. देवालाही मी प्रार्थना सुरू केली आणि ते निवडून आले. निवडणुकीच्या दिवशी त्यांना मी म्हटलं सिद्धिविनायकला जाऊ या तर ते म्हणाले, तूच जाऊन ये. मी म्हटलं, अहो नुसतं जायचं अन् नमस्कार करायचा, त्याने तोटा तर काही नाही. माझी श्रद्धा आहे आणि मग ते माझ्याबरोबर आले. भक्तिभावाने नमस्कार केला. निवडणुकीचा निकाल लागला, ते निवडून आले. तेव्हापासून त्यांची सिद्धिविनायकावर आणि गणेशावर एवढी श्रद्धा आहे की, कणकवलीच्या घराचं नाव ‘ओम गणेश’ आणि मुंबईच्या घराचं नाव ‘आधिश’ त्यांनीच ठेवलं आहे.’’

नारायण राणे यांची तुम्हाला भावलेली एखादी गोष्ट सांगा ना..

निलमताई सांगू लागल्या, ‘‘ज्या काळात मोबाईल नव्हते त्या काळात ते बाहेर कुठे असले तरी त्यांची परिवाराची ओढ इतकी विलक्षण आहे की, कुठूनही सातत्याने घरी फोन करून ते सर्वाची सतत चौकशी करायचे.

नगरसेवकापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत मोठ-मोठ्या जागांवर काम करताना परिवाराची सातत्याने आस्थेने चौकशी करत राहणं. माझ्या माहेरच्या मंडळीचीही सातत्याने काळजी घेणं. त्यामुळे आमच्या परिवारात तुझं आणि माझं असा भेदभाव कधीच झाला नाही. माझ्या माहेरसाठी लागणारा खर्चही तेच भागवायचे. या त्यांच्या स्वभावाने हा माणूस एक विलक्षण आहे आणि माझ्याकरता तर सर्वस्व आहे, ही माझी भावना आहे आणि आमचं कुटुंब हेच माझ विश्व आहे.’’

‘‘एक भयानक घटना अशी घडली होती की, हे सगळय़ांना मदत करायचे आणि एकदा काही लोकांनी शिर्डीला जाण्यासाठी मोठी रक्कम मागितली. त्यातून काही वाद झाला. तर त्या लोकांनी साहेबांवर हल्ला केला. डोक्यावर मोठी जखम झाली होती. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करावं लागलं. त्यावेळी ‘ह्यांना’  वाचवलं ते श्रद्धेने.’’

तुमच्या जीवनातला सगळय़ात मोठा आनंदाचा क्षण कोणता

‘‘मुख्यमंत्री झाले तो क्षण आनंदाचा आहेच; पण पहिल्यांदा नगरसेवक झाले तो क्षण अधिक आनंदाचा आहे. ते मुख्यमंत्री होणार असं मला म्हणायचे. पण मी त्यांना सांगायचे, ‘असं तुम्ही मला अनेक वेळा सांगितलं’ पण एक दिवस त्यांच्या मित्राचा फोन आला. तो फोनवर म्हणाला, ‘तुम्हाला कळलं का ते मुख्यमंत्री होणार आहेत’ तेव्हा आम्ही चित्रकूट बंगल्यावर राहत होतो. टीव्ही बघायला सांगितला तर हे मुख्यमंत्री झाल्याच्या बातम्या येत होत्या. एवढय़ात ह्यांचा फोन आला. त्यांनी मातोश्रीवर बोलवून घेतलं. निलेश-नितेश परदेशात शिक्षण घेत होते. मी मातोश्रीवर पोहोचले. माझ्या डोळय़ातून अश्रू वाहत होते. बाळासाहेब म्हणाले, शुभप्रसंगी रडायचे नाही. मी म्हटले, आनंदाश्रू आहेत. आणि ते मुख्यमंत्री झाले.’’

‘‘ते किती मोठ्या जागेवर गेले तरी आमच्या घराचे ते नेहमीच आधारस्तंभ राहिले. मोठ्या जागेवर असतानाही कुटुंबाची काळजी घेण्यात ते कुठेही कमी पडले नाहीत. पती हा कुटुंबाचा आधारच असतो. एका धाग्यात तो परिवाराला गुंफत असतो. मुलांनी आयुष्य कसं जगावं याचं मार्गदर्शन करीत असतो. त्यासाठी कुटुंबातल्या सर्वाना समजून घ्यायची एक सवय लावावी लागते. लोकांना असे वाटते की, हे खूप संतापी आहेत. पण कुठचीही गोष्ट त्यांना समजावून सांगितली की, तर त्यांना ती पटत असते आणि ती गोष्ट ते मान्य करतात. मुलांना मी हेच सांगत असते, तुमच्या वडिलांनी खूप कष्ट काढून ते मोठे झाले आहेत. खूप संघर्ष केले आहेत. तुम्हाला बरंच काही सहज मिळालं आहे. हा वारसा काय आहे हे समजून घ्या आणि सुदैवाने उच्च शिक्षण घेतलेल्या मुलांनी हे सगळं समजून घेतलं आहे. मी असं मानणारी आहे की, माझ्या दोन्ही मुलांमध्ये साहेबांचे गुण यावेत, सगळय़ांना समजून घ्यावे. आपल्याला जे काही मिळते ते नशिबाने मिळत असते. त्यासाठी जिद्द हवी. जे मिळणार त्यासाठी तक्रार करू नये. आणि वाद तर अजिबात करू नये. समाजासाठी चांगलं करत राहा, आपलं चांगलंच होत राहील. निवडणुकीतले जय-पराजय हा जीवनाचा एक भाग आहे, असं मी मानते. जे आहे ते स्वीकारून जे नाही त्याची खंत न करता जगावं आणि आनंदात राहावं, अशी माझी जीवनाबद्दलची भूमिका आहे. हे कधी-कधी खूप विचार करत बसतात तेव्हा त्यांना मी हेच सांगत असते. पण कोणताही निर्णय करताना माझ्याशी विचारविनिमय केल्याशिवाय ते निर्णय घेत नाहीत आणि एकदा निर्णय झाला की, त्या निर्णयाबद्दल त्यांच्या सोबत राहायचं. मग यश-अपयश या गोष्टी गौण आहेत. असं मी मानते आणि मुलांनाही मी तेच सांगते.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version