Home संपादकीय अग्रलेख अबब! सात वर्षात दोन कोटी घरं..

अबब! सात वर्षात दोन कोटी घरं..

1

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काय कमाल आहे हो! काय फटाफट आकडे तोंडावर फेकतात. ऐकणारा डायरेक्ट गार होऊन जायचा. त्याला घर मिळो किंवा न मिळो, आकडा ऐकूनच माणसे वेडी होतील, अशा पद्धतीने नवीन घरांचे आकडे फटाफट तोंडावर टाकले जात आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काय कमाल आहे हो! काय फटाफट आकडे तोंडावर फेकतात. ऐकणारा डायरेक्ट गार होऊन जायचा. त्याला घर मिळो किंवा न मिळो, आकडा ऐकूनच माणसे वेडी होतील, अशा पद्धतीने नवीन घरांचे आकडे फटाफट तोंडावर टाकले जात आहेत.

काय तर म्हणे, आता २०२२पर्यंत देशात दोन कोटी पक्की घरे बांधण्याचा निर्णय मोदींनी घेतला आहे. अरे व्वा! शाब्बास! २०१९ ला मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होणार. या मधल्या साडेचार वर्षात (आता सहा महिने होऊन गेले.) काही दगाफटका झाला नाही तर २०१९ पर्यंत मोदी महाराजांचे राज्य राहणार आहे. त्यानंतर शिल्लक राहतात तीन वर्षे.

त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीत भाजपावाले आणि मोदीमहाराज दोन कोटी घरांचे बोलायला मोकळे आहेत. बरं दोन कोटी घरे बांधायची, तर त्यात दोनवर किती शून्य हेसुद्धा मोदी फटकन सांगू शकणार नाहीत. बरं, समजा त्यांनी हे शून्य नेमके सांगितले तरी मोदी सरकारने जो दोन कोटी घरांचा निर्णय घेतला आहे आणि त्याच्याकरिता २०२२ ची मुदत घातली आहे.

२०२२ म्हणजे राहिली सात वर्षे. या सात वर्षाचे दिवस होतात २,५५५. आता या २,५५५ दिवसांत मोदीमहाराजांना दोन कोटी घरे बांधायचा ध्यास लागलेला आहे. पुन्हा ती नुसती घरे नाहीत, तर पक्की घरे. त्यात सांडपाण्याची व्यवस्था, नळ योजना, न्हाणी घर, वरांडा एवढे सगळे काही मोदी देणार आहेत. मुंबईत अनेक बिल्डर जाहिराती देतात आणि पान-पान जाहिरातींमध्ये ज्या नवीन वसाहतींचे नकाशे दाखवतात, त्याची जाहिरात करताना निसर्गाच्या सानिध्यात आणि खळखळ वाहणा-या झ-याकाठी अशी पानेच्या पान जाहिराती येतात.

पार कल्याण-डोंबिवलीच्या आजूबाजूच्या खेडय़ांमध्ये या ज्या सिंगल विटेच्या वसाहती उभ्या राहतात, ते निसर्गरम्य ठिकाण बघायला गेले तर तिथे खळखळ वाहणारा झरा नसतोच, असते ते म्युनिसिपाल्टीचे गटार आणि मग घरासाठी गुंतवणूक करणाऱ्यांची फसवणूक होते. मोदीमहाराजांची दोन कोटी घरांची योजनाही अशीच तद्दन फसवणूक आहे. सात वर्षात दोन कोटी घरे बांधायचे ठरवले तर रोज ७ हजार ८२८ घरे बांधावी लागतील.

प्रत्येक दिवशी एवढी घरे अद्ययावत उभी राहिली, तयार झाली तरच २०२२पर्यंत म्हणजे २,५५५ दिवसांत दोन कोटी घरे उभी राहणार आहेत. हा आकडा ज्या मोदींनी फेकला त्यांना हे आताच सांगायला काही हरकत नाही की, ही फेकूगिरी करू नका. केंद्रीय मंत्रिमंडळासमोर असा कुठलाही प्रस्ताव नाही. निधीची कोणतीही तरतूद नाही. हा निधी त्या त्या राज्यांना वर्ग केलेला नाही. त्याची अधिकृतपणे कुठलीही योजना नाही. दिल्लीत एक बैठक घेतली आणि त्या बैठकीत मोदींनी सांगून टाकले, की आम्ही दोन कोटी घरे बांधणार.

घरे बांधून झाल्याच्या थाटात त्याची जाहिरात सुरू झाली. करणार काहीच नाही; पण लोकांना मूर्ख बनवण्याचा उद्योग मात्र?जोरात सुरू आहे. याच घरे बांधण्याच्या फसव्या उद्योगाचा एक पूरक उद्योग म्हणून मुंबईत पहिल्या टप्प्यात सोळा लाख घरे बांधली जातील, असे सांगण्यात आले आहे. ज्या दिवशी या बातम्या प्रसिद्ध झाल्या, तो दिवस आहे २२ जानेवारी. तो दिवस सोडून देऊ. अगदी आजच्या दिवसापासून ती सोळा लाख घर बांधायचे ठरले तर २,१९२ घरे रोज तयार करावी लागतील. त्या सोळा लाख घरांमध्ये २४ तास वीज, २४ तास पाणी, शौचालय अशी सगळी सुविधा असल्याचे मोदीमहाराजांनी सांगितलेले आहे.

सदिच्छा म्हणून हे सर्व ठिक आहे; पण सदिच्छेला व्यवहाराची जोड असली पाहिजे, निश्चित कार्यक्रम असला पाहिले, पैशांची व्यवस्था असली पाहिजे, यंत्रणा असली पाहिजे, तेवढे बांधकाम साहित्य असले पाहिजे आणि मुख्य म्हणजे घरे बांधण्यासाठी खुली जागा असली पाहिजे. या पैकी कशाचाही, कुठेही, कसलाही पत्ता नाही आणि कोटी-कोटींचे आकडे तोंडावर मारून घराची स्वप्ने पाहणाऱ्यांची मोदी सरकार ही जी फसवणूक करीत आहे, ती क्रूर थट्टा आहे.

११९५ साली युतीचे सरकार होते आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. त्यावेळी शिवसेनेने जाहीर केलेले होते की, २७ लाख नोक-या आणि ४० लाख घरे बांधू. सेनावाले तेव्हा लाखात बोलत होते. आता २० वष्रे झाली. त्यामुळे भाववाढ झाली. म्हणून सेनेच्या लाखातल्या गोष्टी आता मोदीमहाराज कोटीत बोलताहेत. त्या २७ लाख नोक-या काही मिळाल्या नाहीत आणि ४० लाख घरातले एक घर काही उभे राहिले नाही. एन्रॉन डुबवले आणि दाऊदला फरफटत आणण्याच्या घोषणाही हवेत विरल्या. त्यावेळी सेनेत जे लोक होते, त्या ताकदीचे लोक आता अजिबात राहिलेले नाहीत.

वाजपेयींच्या मंत्रिमंडळात ज्या ताकदीचे लोक होते, तसे लोकही मोदींजवळ नाहीत. संरक्षण मंत्रालय, रेल्वे या दोन महत्त्वाच्या खात्यांसाठी निवडणुकीत निवडून न आलेल्यांना मंत्रीपदी आणून बसवावे लागले. निवडून आलेल्या २८३ खासदारांत भाजपावाल्यांना या दोन खात्याच्या लायकीचे खासदार सापडले नाहीत. आता दिल्लीसाठी किरण बेदींना उसणे घ्यावे लागले. कोणत्या भरवशावर या गोष्टी हे लोक करतात. देशात दोन कोटी घरे आणि मुंबईत पहिल्या टप्प्यात १६ लाख घरे, ही सगळी फेकमफेक आहे. लोकांची फसवणूक आहे. कोटी-कोटींचे आकडे नाचवायचा हा त्यांचा शौक आहे. स्वत:चे घर मिळवण्यासाठी माणसे अधीर आहेत. त्यामुळे कुठेतरी त्या आशेवर घर नसलेली माणसे जगतील आणि २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा मोदींना मत टाकतील आणि इथेच फसतील.

मुंबईत आणि देशात घरांचा प्रश्न तीव्र आहे आणि आता सगळय़ा शहरांमध्ये हा प्रश्न तीव्रच होत चालला आहे. म्हणून असे कोटीकोटींचे आकडे आले की, लोकं वेडी होऊन टाळय़ा वाजवतील; पण देशातल्या अनेक भोंदूबाबांच्या मागे जनता लागते आणि फसते. मोदींची ही फेकमफेकी भोंदूगिरीच आहे.

मुंबईत पहिल्या टप्प्यात १६ लाख घरे बांधण्याचे जे आश्वासन मोदींनी दिले आहे, ती त्यांची चक्क लबाडी आहे. मुंबईत घरांसाठी ज्या जागा आहेत, त्या एक तर सिडकोजवळ आहेत, नाही तर म्हाडाजवळ आहेत. या म्हाडाने आणि सिडकोने मुंबई उच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र?सादर करून असे निर्दशनाला आणले आहे की, सामान्य माणसाला परवडतील, अशी घरे बांधण्यासाठी सिडको आणि म्हाडाजवळ मुंबईत कुठेही जागा उपलब्ध नाही.

ज्या जागा उपलब्ध आहेत, तिथल्या घरांच्या किमती आवाक्याच्या बाहेर राहणार आहेत. आज मध्य मुंबईतला भाव आणि वांद्रय़ापर्यंतचा भाव कोटीच्या घरात गेलेला आहे. उपनगरातही भाडय़ाची घरे मिळत नाहीत. या स्थितीत सिडको आणि म्हाडाची घरे परवडणारच नसतील तर मोदी सरकार पहिल्या टप्प्यात मुंबईत सोळा लाख घरे बांधणार आहेत, तर ती बांधणार कुठे? किती किमतीला? आणि कधी? कशाला लोकांना फसवता! बंद करा ही फसवणूक. ज्या दिवशी तुमचे खरे रूप लोकांना कळेल, त्या दिवशी लोकांना मताचा बडगा विरोधात वापरूनही स्वस्थता मिळणार नाही, इतकी फसवणूक तुम्ही लोकांची केलेली आहे.

1 COMMENT

  1. अगदी खरे बोललात मी पण बांधकाम कंपनीत काम करतो त्यामुळे मला हे पटतेय. मोदी सरकार फक्त खोटे आश्वासने देण्यातच हुशार आहेत. हे सर्व गरिबांची फसवणूक करतात. तेव्हा सर्वांनी लक्षात ठेऊन पुढील निर्णय स्वत घ्यायला हवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version