Home कोलाज अभिजात भाषा

अभिजात भाषा

1

तमिळ आणि तेलुगू या भाषांना केंद्र सरकारने अभिजात भाषांचा दर्जा दिल्यावर मराठीला तशी मान्यता मिळावी यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. पण मराठी भाषा खरोखरंच अभिजात आहे का? आणि तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तरी त्याने काय फरक पडणार आहे?

गेले काही महिने मराठीला ‘अभिजात भाषा’ म्हणून मान्यता मिळवण्यासाठी ब-याच पातळ्यांवर धडपड / धावपळ सुरू आहे. या खटाटोपामागे मुख्य कारण म्हणजे तमिळ, तेलुगू, कन्नड वगरे भाषांना अभिजात म्हणून मान्यता मिळाली. मान्यता मिळाल्यावर केंद्र सरकारकडून काही कोटी रुपये मिळाले, पुढेही मिळत राहणार आहेत, त्या पैशातून तमिळभवन, तेलुगूभवन वगरे उभारण्याचे ठेके अनेकांना मिळाले, मग त्याचे अध्यक्षपद, सचिवपद वगरे पदांची खैरात.. अशा वेळी काय काय नि कसं कसं होतं, हे सांगण्याची गरज नाही, ते सगळं महाराष्ट्रातल्या लोकांनाही मिळावं, म्हणून हा खटाटोप ‘जोर लगा के’ चालू आहे.

मुळात अभिजात भाषा (क्लासिकल लँग्वेज) म्हणजे काय? आजपर्यंत युरोपात आणि (भारतातही) ग्रीक, लातिन, संस्कृत या क्लासिकल-अभिजात भाषा मानल्या गेल्या. जुनं अरबी आणि जुनं चिनी यांनाही अभिजात मानलं जातं. या जुन्या भाषा ख-या अर्थानं लोकव्यवहाराच्या भाषा नाहीत. त्यांच्यातल्या प्राचीन साहित्यानं फार मोठी उंची गाठलेली होती, नवनवीन शब्द घडवण्याची विलक्षण शक्ती या भाषांमध्ये असल्यामुळे पुढच्या काळातल्या भाषांना शब्द पुरवण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम या भाषा करत आलेल्या आहेत, आजही नवीन शब्द बनवण्यासाठी युरोपात ग्रीक आणि लातिन याच भाषांचा उपयोग केला जातो आणि भारतात संस्कृतचाच उपयोग केला जातो.

तमिळभाषिक आपल्या भाषेबाबत किती आग्रही असतात, याचा अनुभव सा-या देशानं वेळोवेळी घेतलेला आहे. त्यांचा असा आग्रह आहे की, तमिळ हीच जगातली सर्वात जुनी भाषा, त्यामुळे ती(च) अभिजात आहे. या मुद्दयावरून लोकांना प्रभावित करण्याचं तंत्र तमिळ प्रदेशात किती विकसित आहे, हेही आपल्याला ठाऊक आहे आणि केंद्र सरकार किती मृदू आहे, हेही आपण जाणतो. अशा परिस्थितीत तमिळला ताबडतोब अभिजात भाषा म्हणून घोषित करण्यात आलं. अभिजात होण्याचे फायदे दिसताच तेलुगू, कन्नड यांनीही आपली वर्णी लावून घेतली. हा काय काही कोटी रुपयांचाच प्रश्न आहे असा (अ)विचार करून केंद्र सरकारनेही मागेल त्या सर्व भाषिक समाजांना अभिजाततेच्या पदव्यांची खैरात करून टाकली. सगळे खूश. काहींना कुरण मिळालं म्हणून ते खूश नि आम जनता आमची भाषा अभिजात झाली या कल्पनेनं खूश. पण सामान्य जनतेला यात खरंच काय मिळतं? भाषेचा काय फायदा होतो? भाषांच्या विकासाच्या दृष्टीनं या अभिजाततेच्या पदवीनं काय फरक पडतो?

ज्या भाषा आजच्या काळात सर्वसामान्यांच्या लोकव्यवहाराच्या आहेत, ज्या स्वत:च नव्या शब्दांसाठी उसनवारी करतात, ज्यांच्यात आजही बदल होत आहेत, अशा भाषांना अभिजात कसं म्हणायचं. घरातल्या वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, अनुभवसिद्ध पणजीबाईंना जो दर्जा असतो तो चिमुरडया पणतीला द्यायचा का? तिचं कोडकौतुक व्हायला पाहिजे, पण तिला पणजीबाईंचं स्थान कसं द्यायचं? कोणत्याही दृष्टीनं ते योग्य ठरणार नाही. या सा-या चालू भाषा आहेत, त्यांच्यात स्वाभाविकपणे बदल होत आहेत, संस्कृत, लातिन, ग्रीकप्रमाणे त्या थांबलेल्या नाहीत, त्यामुळे त्या अभिजात होत नाहीत.

संस्कृत, ग्रीक, लातिन या अभिजात भाषांच्या तुलनेत मराठी कुठे आहे? किती विषयांवर, किती शास्त्रांवर मराठीत ग्रंथरचना झाली आहे? तिचा प्रचार-प्रसार सोडाच, पण मराठी माध्यमातून किती शिक्षण घेता येतं? विज्ञान आणि वाणिज्य शाखेत आजही जेमतेम दहावीपर्यंतच आपली मजल गेलेली आहे. मग खरंखुरं उच्चशिक्षण दूरच राहिलं. आपल्या वर्तमानपत्रांमधून चार ओळींचा मजकूरही सलगपणे मराठी भाषेत येत नाही. मराठीत असतो त्याचं लेखन कुठल्याही शुद्धलेखनाच्या नियमांमध्ये बसणारं नसतं, आपले नेतेबितेही धडपणे मराठीत बोलत नाहीत, मग कशाच्या आधारावर मराठी अभिजात ठरते?

अभिजातपण सोडाच, पण मराठी महाराष्ट्रातही सर्वदूर लोकव्यवहाराची समर्थ भाषा बनलेली नाही (म्हणजे मराठी भाषिकांनीच तिला बनू दिलेलं नाही किंवा बनवलं नाही), मग तिला समर्थ बनवायचं सोडून अभिजात करून मखरात का बसवून ठेवायचं आहे? यातून काय साधणार?

इंग्लिश ही आज एक समर्थ भाषा आहे. इंग्लिशभाषिकांनी चार-पाच शतकं अनेक कारणांनी जगभर मुशाफिरी करून आपली सत्ता स्थापली, आपल्या वसाहतींमधून आपल्या भाषेचा प्रचार-प्रसारही समर्थपणे केला आणि तिला खरोखरच वैभवाच्या शिखरावर बसवलं, नुसतं कवितेत नाही. त्यांनी कविता-बिविता काही केल्या नाहीत. इंग्लिश भाषेच्या गौरवाच्या कविता नाहीत, ती भाषाच गौरवाच्या शिखरावर आहे. जगात कुठेही इंग्लिश-डे साजरा होत नाही, इंग्लिशभाषिक रोजच्या रोज सर्व व्यवहारांसाठी इंग्लिशचाच उपयोग करतात, त्यामुळे श्राद्ध घातल्यासारखा तिचा दिवस साजरा करत नाहीत.

आपण भाबडया भावुकतेनं मराठीवर कविता रचतो / पाडतो, तिच्या फोटोला हार घालून तिचे दिवस साजरे करतो आणि आता तिला ‘अभिजात’ म्हणून देव्हा-यात बसवायला निघालो आहोत, वंदनीय करून तिला निवृत्त करायला निघालो आहोत. आपल्या प्रत्यक्ष जीवनातून मराठीला हद्दपार करण्याचे हे उद्योग करून मराठी मोठी होईल का?

भाषा मोठी होण्यासाठी या कशाचीच गरज नसते. मराठीला मोठं करायचं असेल तर आपल्या सर्व त-हेच्या अभिव्यक्तीसाठी माध्यम म्हणून मराठीचा वापर सर्वत्र आणि आग्रहानं करा.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version