Home टॉप स्टोरी अमित शहा, गडकरी शिवसेनेला ‘नॉट रिचेबल’

अमित शहा, गडकरी शिवसेनेला ‘नॉट रिचेबल’

1

शिवसेना आणि भाजप यांच्यातील जागावाटपाबाबत बुधवारीही तोडगा निघू शकला नसल्यामुळे महायुतीतील छोटे घटक पक्ष घायकुतीला आले आहेत.
मुंबई- शिवसेना आणि भाजप यांच्यातील जागावाटपाबाबत बुधवारीही तोडगा निघू शकला नसल्यामुळे महायुतीतील छोटे घटक पक्ष घायकुतीला आले आहेत. भाजपच्या आक्रमक पवित्र्यामुळे शिवसेनेतही अस्वस्थता निर्माण झाली आहे.

बुधवारी दिवसभर मुंबईत असलेले भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे शिवसेना नेतृत्वासाठी ‘नॉट रिचेबल’ राहिल्यामुळे शिवसेनेचा जीव टांगणीला लागला आहे.  या दोन्ही नेत्यांनी शिवसेना नेत्यांशी चर्चा नव्हे साधा संपर्कही टाळून भाजप आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे संकेत दिले. याचवेळी घटक पक्षाच्या नेत्यांना चुचकारण्याचे, वश करण्याचे प्रयत्न शिवसेना आणि भाजपने दिवसभर चालवले होते.

दोन्ही पक्षांनी घटक पक्षांच्या नेत्यांशी दिवसभरात स्वतंत्रपणे चर्चा केली. शिवसेनेनेही विभागवार बैठका घेऊन भाजपवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेनेने दबाव वाढवला आहे. भाजपने ‘आता पाय जमिनीवर ठेवावेत, जनतेला गृहीत धरू नका’ असा थेट सल्ला शिवसेनेने दिला आहे. तेच योग्य ठरेल, नुसतेच हवेत राहू नका, अशी शिवसेनेकडून झालेली टीका भाजपलाही चांगलीच झोंबली आहे. ‘देतोय तेवढे घ्या’, असे सूचित करण्याचा हा प्रयत्न भाजप नेत्यांना जिव्हारी लागला आहे. शिवसेनेकडून अशा प्रकारे दबाव वाढत असताना त्याकडे दुर्लक्ष करत भाजपने स्वतंत्र रणनीती आखली आहे. ती आखण्यात पक्षाचे अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आघाडीवर होते. यामुळेच या नेत्यांनी दिवसभरात एकदाही मातोश्रीशी वा अन्य नेत्यांशी संपर्क साधला नाही.

भाजपचे मोठे नेते मुंबईत असूनही सलग तिस-या दिवशी कोणतीही चर्चा होऊ शकली नाही आणि  एवढा दबाव टाकूनही भाजप नेते माघार घ्यायला तयार नसल्याचे लक्षात येताच शिवसेनेत अस्वस्थता वाढली आहे.

सत्ता येण्यापूर्वीच शिवसेना दुय्यम दर्जाची वागणूक देत असेल तर सत्ता आल्यावर त्यांना आवरणे कठीण होईल. त्यामुळे शिवसेनेला जास्त डोईजड करून घेऊ नये, अशी रणनीती भाजपने आखली आहे. ‘थांबा आणि पाहा’ या भूमिकेत भाजप नेते गेले आहेत. महायुती तुटावी ही भाजपची इच्छा नाही मात्र जागावाटप सकारात्मक आणि समाधानकारक झाले पाहिजे अशी अट टाकून त्यांनी शिवसेनेवर कडी केली आहे. त्यातच भाजपने १३५ वरून १२५ जागांवर तडजोड करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र त्याही देण्यास शिवसेनेने नकार दिल्याचे माहीतगाराने सांगितले. जुन्या सूत्रानुसारच जागावाटप होईल, अशी ठाम भूमिका शिवसेनेने घेतली आहे. त्यामुळे भाजपनेही आपल्या मागणीवर ठाम राहण्याचा निश्चय केला आहे. त्यामुळे महायुतीत पेच निर्माण झाला असून ती अधांतरी असल्याचे चित्र दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत गळ्यात गळे घालून फिरणा-या या दोन्ही पक्षांमधील मानापमान नाटयामुळे इतर घटक पक्ष मात्र घायकुतीला आले आहेत.

बुधवारी रात्री उशिरा पक्षाध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते विनोद तावडे यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. जागावाटपासंदर्भात त्यात निर्णायक भूमिका मांडण्यात आली. मात्र शिवसेनेकडून आलेल्या प्रतिसादानंतरच पुढील समीकरणे निश्चित केली जातील, असेही या बैठकीत ठरवण्यात आले.

1 COMMENT

  1. शिवसेनेने भाजपला वाकून मुजरा घालू नये, शिवसैनिकात किती हिम्मत आहे ते दाखवूच त्यांना ,गेला उडत भाजप….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version