Home कोलाज अर्थ आणि संकल्प

अर्थ आणि संकल्प

0

‘‘हे बघा आजपासून संध्याकाळचा तुमचा चहा बंद! हवं तर बाहेरूनच पिऊन या.’’  ऑफिसातून मी घरात माझा उजवा पाय ठेवताच पत्नी शेवंताबाईनं सुनावलं. आता तुम्ही म्हणाल उजवाच पाय का? डावा का नाही? आधीच सांगतो असल्या टुकार प्रश्नांची मी उत्तरे देत नाही. असो.

‘‘हे बघा आजपासून संध्याकाळचा तुमचा चहा बंद! हवं तर बाहेरूनच पिऊन या.’’
ऑफिसातून मी घरात माझा उजवा पाय ठेवताच पत्नी शेवंताबाईनं सुनावलं. आता तुम्ही म्हणाल उजवाच पाय का? डावा का नाही? आधीच सांगतो असल्या टुकार प्रश्नांची मी उत्तरे देत नाही. असो.
तर पत्नी मला खडसावते. मी मान खाली घालत म्हणतो, ‘‘का बुवा चहा बंद? घरातली साखर संपलीय का?’’
‘‘साखर आहे पण ती तुमच्यासाठी नाही. साखरेचा वापर यापुढे जपून करावा लागेल.’’
‘‘का बुवा?’’ मी बुवा लपून तिच्याकडे पाहत म्हणतो.
‘‘तुम्ही जरा पेपर चाळत जा. काल केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झालाय.’’
‘‘अच्छा अच्छा’’ मी कामाच्या गडबडीत विसरूनच गेलो. आता का विसरलो, असा टपराट प्रश्न प्लीज मला विचारू नका. मी स्वत:ला सावरतो. एव्हाना पत्नी म्यानातून तलवार काढावी तसे कपाटातून एक कागदाचे मोठे भेंडोळं बाहेर काढते. ‘‘या वर्षीच्या अर्थसंकल्पामुळे मला बरेच फेरबदल करावे लागलेत.’’
आता ती यादी वाचते.
‘‘तुमच्या ऑफिसच्या टिफिनमध्ये बदल झालेत’’
‘‘बापरे! ते कुठले?’’ मी घाबरतच म्हणतो.
‘‘यापुढे पोळी-भाजी बंद!’’ ‘‘म्हणजे मी ऑफिसातल्या कँटिनमधली टपराट मिसळ खायची की काय?’’
‘‘कशाला पैसे उडवता? तुम्हाला डबा मिळणार आहे पण पोळी-भाजीऐवजी ब्रेड, जाम, लोणच्यावर भागवावे लागेल कळलं?’’
‘‘भागवावे लागेल? इतकंच खायचं मी?’’ मी तिरक्या नजरेने तिच्याकडे पाहत म्हणतो..
इथे सभ्य वाचकांना मी सांगू इच्छितो मी काय खावे, प्यावे हा माझा प्रश्न आहे. त्यांनी मध्ये लुडबुड करू नये. असो.
‘‘ते चालणार नाही अर्थसंकल्पात लोणचं, जाम, जेली स्वस्त झालंय.’’
‘‘बरं आणखी काय काय स्वस्त झालंय?’’
‘‘यापुढे रात्री डोक्याला तेलपाणी बंद!’’
‘‘ऑँ! तेलपण महागलं?’’ मी डोक्यावर हात मारतो.
‘‘होय. दुसरं म्हणजे सिगारेट फुकणं कायमचं बंद. त्याऐवजी माझ्या नावानं कुठली तरी विमा पॉलिसी काढा.’’
‘‘ओके काढतो’’
‘‘मला ठाऊक आहे, तुम्ही कुणाकडे जाणार पॉलिसी काढायला. तुम्हाला आज नाही ओळखत मी. सकाळीच पळसुले गुरुजींशी माझे बोलणे झालेले आहे. त्यांच्याकडूनच काढा कळलं?’’
‘‘पण मी सिगारेटऐवजी सॉफ्ट ड्रिंक घेईन अधनंमधनं..’’ मी चाचरत म्हणतो.
‘‘अजिबात नाही सॉफ्ट ड्रिंकच्या ऐवजी तुम्ही ड्रिंक्स मारणार मला ठाऊक आहे, ते चालणार नाही. ड्रिंक्स कुठलंही असो ते महागलंय.’’
‘‘अरे देवा!’’ माझा आवाज आता सॉफ्ट होतो.
‘‘पुढल्या आठवडयात तुम्हाला दोन दिवस सुट्टी काढावी लागेल.’’
‘‘का बुवा, अर्थमंत्र्यांनी सुट्टय़ांमध्ये सवलत दिली की काय’’
‘‘सिमेंट स्वस्त होणार आहे. त्यामुळे घराची थोडी डागडुजी करावी लागेल.’’
मला मोठयाने ओरडावेसे वाटते अन् मी मोठयाने किंचाळतो. पत्नी मोठे डोळे करून माझ्याकडे पाहते. मी हळूच तिला वरच्या भिंतीवरचे झुरळ दाखवतो. आणि म्हणतो,
‘‘हो आपल्याला डागडुजी करावी लागेल.’’
‘‘यापुढे जेवताना उगाचच पिटपिट मला खपणार नाही.’’
‘‘आता हे काय नवीन?’’ मी चीडचीड करत म्हणतो.
इथे सभ्य वाचकांना सांगून ठेवतो, मी पिटपिटत असेन वा चिडचिडत असेन, नाही तर ओरडत असेन. मी माझं बघून घेईन, तुम्ही तुमचं पाहा.
‘‘तर आता जेवणाचं काय हे नवीन’’ माझा भाबडा सवाल.
‘‘यापुढे जेवणात खोबरं कमी असेल. नारळ महाग झालेत.’’
नशीब माझं याक्षणी माझ्या हातात नारळ नव्हता. नाही तर..
‘‘नाही तर काय?’’ पत्नी अचानक उखडली ना.
मला नवल वाटतं, आयला हिला मनातले पण विचार कळतात की काय. मला काळजी घ्यावी लागेल.
‘‘उद्या संध्याकाळी लवकर या घरी.’’
‘‘काय म्हणतेस काय.. सिनेमाची तिकिटं स्वस्त झालीत की काय.. ग्रेट..!’’
‘‘फालतू बडबड नको, संध्याकाळी नवीन स्कुटर घ्यायला हवी.’’
‘‘छान गो बाय माझी. किती काळजी तुका माझी.. बरे झाले बसची कटकट तरी संपेल.’’
‘‘हे पाहा स्कुटर तुमच्यासाठी नाहीय, मला बाजारहाटासाठी हवीय. तुमची बसची लाइन कायम आहे. स्कुटरचे भाव कमी होणार आहेत.’’
‘‘खंडूसाठी लवकरच लॅपटॉप घ्या.. स्वस्त झालेत.’’
‘‘घेतो, पुढे अजून काय?’’
‘‘पगाराची पावती नीट बघून घ्या. आयकरात मोठी सूट आहे.’’
‘‘छान ‘कर’ नाही त्याला ‘डर’ कशाला?’’
लगेच तिची डरकाळी येते.
‘‘हॉटेलात गेलात कुणाबरोबर तर कॉफी पिऊ नका. कॉफी महाग झालीय.’’
‘‘अरे देवा, आता काय होणार?’’ मी काळजीत पडतो.
‘‘तशी तुमची कॉफी बंद होणारच आहे. ती कोण लीना काटकर, तिचा साखरपुडा आहे पुढल्या आठवडयात.’’ हा माझ्यासाठी मोठाच धक्का असतो. हिला कुठे सापडली लीना काटकर? मी विचारात पडतो. हिला कसं कळलं?
‘‘कसं कळलं? मुर्ख आहात तुम्ही. तुमच्या आधी ती माझ्याशी बोलते. मग तुमचं काय ते हॅ हू सुरू होतं.’’
‘‘आता काय बाकी आहे काटकसर करायचं?’’
मी निराश होतं बूट काढायला घेतो.
इथे मी पुन्हा वाचकांना नम्रपणे सांगू इच्छितो मी चप्पल घालत असेन का बूट, असल्या तुमच्या फडतूस प्रश्नात मला रस नाही. असो.
‘‘थांबा थांबा बूट काढू नका.’’
पत्नी एकदम ओरडते. मी लहान मुलासारखं अंग काढतो. किती दचकतो मी.
‘‘आता काय?’’
‘‘.. चला आपल्याला लगेच बाहेर जायचं आहे खरेदीला.’’
माझ्या पायातले त्राण जातात.
‘‘आता कसली खरेदी.’’
‘‘सोन्याची चैन आणि कानातलं एखादं घ्यायचं म्हणतेय मी. सोने अर्थसंकल्पात थोडे का होईना स्वस्त झालंय.’’
म्हणे स्वस्त झालेय. मी मनातल्या मनात म्हणतो, तुझं काय जातंय म्हणा डुल घे नाही तर चैन घे.
‘‘काय घे म्हणालात?’’ तिचा आवाज. ‘‘एक ग्लास पाणी घे म्हटलं,’’ माझा आवाज. इथे वाचकांना मी नम्रपणे सांगू इच्छितो की कृपया, त्यांनी माझ्या आवाजाची तुलना करू नये. घरातला आवाज नि बाहेरचा आवाज यात फरक असतोच ना. आणि तुम्ही मला जर का असले फडतुस प्रश्न विचाराल तर याद राखा! तुमच्या घरात सोडवून दाखवा तुमचे प्रश्न.
आले मोठे प्रश्नवाले!

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version