Home महामुंबई ..तर इवलेकर सुखरूप असते

..तर इवलेकर सुखरूप असते

1

आपत्कालीन परिस्थितीत सोशल मीडियाच्या एका चुकीमुळे इवलेकरांचा जीव गेला आणि इतर सहकारी जखमी झाल्याचे वृत्त सर्वत्र आहे. 

मुंबई – अंधेरीतल्या लोटस बिझनेस पार्कमधील आगीत अग्निशमन दलाचे जवान अडकले आहेत. तसेच आग लागलेल्या इमारतीच्या लिफ्टमध्ये एक महिला अडकून पडल्याच्या अफवेचा एक फोन अग्निशमन दलाला आल्याने त्याची पडताळणी करण्यासाठी हे जवान गेले होते. हा फसवा कॉल अग्निशमन दलाला आला नसता तर अनेक जवान आज जखमी झाले नसते. तसेच इवलेकर आज नक्की सुखरूप असते, अशी चर्चा आहे. या प्रकरणी इवलेकरांच्या कुटुंबीयांनी चौकशीची मागणी केली आहे.

आपत्कालीन परिस्थितीत सोशल मीडियाच्या एका चुकीमुळे इवलेकरांचा जीव गेला आणि इतर सहकारी जखमी झाल्याचे वृत्त सर्वत्र आहे. इमारतीला आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने मदतकार्यास सुरुवात केली. आगीचा लोळ वाढत असताना इमारतीचे २१ आणि २२ मजले आगीच्या भक्ष्यस्थानी होते. तर इमारतीच्या खालच्या मजल्यांवरही आग फोफावत होती. इमारतीमधील अग्निशमन यंत्रणा पूर्णपणे निकामी ठरलेली असताना आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्नांची शर्थ करत होते. इतक्यात इमारतीच्या पाच लिफ्टपैकी एका लिफ्टमध्ये सहाव्या मजल्यावर महिला अडकली असल्याचा फोन आला.

या फोनची दखल घेत तातडीने दलाची एक तुकडी या महिलेचा शोध घेण्यासाठी गेली. आगीमुळे सगळीकडे धूर पसरला होता. त्यातच वेगवेगळ्या मजल्यांवर लिफ्ट अडकल्यामुळे महिलेचा शोध लावणे हे त्यांच्यासमोर एक आव्हान होते. दीड तासाच्या अथक प्रयत्नांनंतरही महिला सापडली नाही. वा-यामुळे आग पसरत होती. त्या वेळी सर्व जवान स्वत:चा जीव वाचवण्यासाठी धुरातून मार्ग काढत इमारतीच्या गच्चीवर गेले. यात इवलेकर नव्हते. तर इवलेकर हे त्याआधीच आग विझवण्यासाठी २२व्या मजल्यावर गेले असताना तिथे अडकून पडले होते. आगीच्या लोळामुळे धुरातून इवलेकर यांना मार्ग सापडत नव्हता. या वेळी श्वास गुदमरल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे अग्निशमन दलाचे अधिकारी सुनील नेसरीकर यांनी सांगितले.

मात्र आज पुन्हा एकदा अफवेमुळे अग्निशमन दलाचे जवान कशाचीही पर्वा न करता मृत्यूच्या दारात गेले. मात्र सुदैवाने ते बचावले. दरम्यान, अग्निशमन दलाला ज्या नंबरवरून फोन आला होता. तो नंबर पोलिसांकडे देण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

अतिरिक्त आयुक्तांमार्फत अंधेरीतील आगीची चौकशी

मुंबई – अंधेरीतील लोटस बिझनेस पार्क या कॉर्पोरेट ऑफिसच्या २२ मजली इमारतीला शुक्रवारी लागलेल्या आगीची बृहन्मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांमार्फत सखोल चौकशी केली जाईल, असे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नसिम खान यांनी सांगितले आहे.

शनिवारी खान यांनी आग लागलेल्या इमारतीला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच कुपर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अपघातामधील जखमींची विचारपूस केली. या वेळी जिल्हाधिकारी शेखर चन्ने, अग्निशमन विभागाचे अधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, नसिम खान यांनी आग लागलेल्या इमारतीत राहणारे रहिवासी, व्यावसायिक तसेच सोसायटीच्या पदाधिका-यांशी सविस्तर चर्चा करून घटनेची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी या अपघाताची महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांमार्फत उच्चस्तरीय सखोल चौकशी केली जाईल, तसेच चौकशीनंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. या अपघातासंदर्भात स्थानिक पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करून या घटनेची चौकशी करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी पोलिस अधिका-यांना दिले.

1 COMMENT

  1. याला म्हणतात ( तहान लागल्यावर विहीर खोदणे ) मुंबईतील प्रत्येक इमारतीचा सेफ्टी फ्याक्टर का तपासाला जात नाही ???.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version