Home रिलॅक्स अशोक जीवनातून ‘रिटायर’

अशोक जीवनातून ‘रिटायर’

0

आई रिटायर होतेय, श्यामची मम्मी, अशा अनेक नाटकांचे लेखक, एकेकाळी छोटया पडद्यावरचे यशस्वी लेखक, संवादलेखक अशोक पाटोळे यांचे १२ मे रोजी निधन झाले. त्यांच्या कार्याला व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला वाहिलेली ही शब्दरूपी श्रद्धांजली..

अशोक पाटोळे गेले. ते केवळ देहाने गेले. त्यांनी त्या नश्वर देहाचेही दान केले. आपल्या जीवनाविषयी जितकी सजगता त्यांनी बाळगली तितकीच त्यांनी आपल्या मृत्यूविषयीही बाळगली. ते गेल्याची बातमी आली आणि कानात त्यांचे शब्द घुमू लागले.

प्रत्येक वेळी बोलताना आपल्याला काय करायचे आहे व त्यासाठी इतरेतर आपल्याला कशी मदत करत आहेत हेच ते सांगत असत. सतत काम करत राहणं व सतत त्या कामांविषयीच बोलत राहणं हा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्याबरोबर मी जवळजवळ सहा महिने रोज भेटत होतो.

पनवेलला स्वप्ननगरी उभारणा-या बाळ सुर्वे यांनी काही मालिका केल्या होत्या. आचार्य अत्रे यांचे नातू राजेंद्र पै हे त्यांचे मित्र. त्यांच्यामुळे त्यांनी अत्रेंची नाटके वाचली होती. या नाटकांवर आधारित आपण एखादी मालिका करावी अशी त्यांची इच्छा होती. त्यावेळी अशोक पाटोळे व राजन वाघधरे या जोडीनेच आपली मालिका करावी यासाठी निर्माते प्रयत्नशील असत. त्याप्रमाणे त्यांनी अशोकजींशी संपर्क साधला. या मालिकेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी तेव्हा माझ्यावर होती.

अशोक पाटोळे हे एकदा या मालिकेच्या चर्चेसाठी पनवेलला स्वप्ननगरीत आले. त्यांनी आमची संकल्पना वाचली. त्यांनाही ती फार आवडली. त्यावर आपण मालिका लिहायला तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यावेळी त्यांना ताबडतोब अ‍ॅडव्हान्स देण्यात आला. तुम्हाला जरा माझ्या मागे लागवं लागेल असं ते त्यावेळी म्हणाले. त्याप्रमाणे रोज त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याशी मालिकेच्या प्रगतीबाबत चर्चा करण्याचं काम माझ्यावर सोपवण्यात आलं होतं.

अशोक पाटोळे यांचं नाव मी ऐकून होतो. आई रिटायर होतेय या नाटकाचा प्रयोग आम्हा सगळयांना माझ्या वडिलांनी झवेरबेन सभागृह घाटकोपर इथे दाखवला होता. ते नाटक व भक्ती बर्वे यांचा अभिनय पाहून मी थक्कच झालो होतो. इतक्या मोठया लेखकाशी संपर्क साधण्याचं दडपण होतं. अशोकजींनी ती लागलीच कमी केलं. त्यांचं बोलणे इतकं लाघवी व मधाळ होतं की जणू आपल्या जुन्या ज्येष्ठ मित्रालाच भेटत आहोत असं मला वाटत होतं. त्यांच्याबरोबर केवळ मालिकाच नव्हे तर अनेक विषयांवर गप्पा झाल्या.

कोणतीही गोष्ट करायची तर ती संपूर्ण अभ्यास करूनच करायची असा त्यांचा स्वभाव होता. एक गंमतशीर आठवण आहे. त्याकाळी वुडलँड्सचे बूट नवीन आले होते. काहीसे महाग असलेले हे बूट त्यांनी घेतले होते. मात्र त्यांच्या बोलण्यातून हे जाणवत होते की त्यांनी त्या बुटांचा व त्या कंपनीचा पूर्ण अभ्यास केला होता.

हा अभ्यासच त्यांचा स्थायीभाव आहे. त्यांच्या आत्मचरित्राची काही पाने नुकतीच वाचनात आली होती. त्यातही त्यांच्या आधीपासूनच्या या अभ्यासू दृष्टिकोनाचा व कष्टाची पानापानावर जाणीव होत होती. त्याकाळी आपली नोकरी सांभाळून त्यांचं ते तासन् तास वाचनालयात बसणं त्यांचे ते ब्रिटिश लायब्ररीत बसणं हे सारंच अकल्पित आहे. अशा प्रकारच्या कष्टांशिवाय अशा प्रकारच यश कोणालाही मिळू शकत नाही हेच त्यातून जाणवतं.

अशोक पाटोळे यांच्या व्यक्तिमत्त्वातच एक प्रकारचा उत्साह होता. त्यांच्या बोलण्यातून तो सतत जाणवत राहायचा. तो काळ आपल्या कथा वा संकल्पना इतक्या गुप्त ठेवण्याचा काळ नव्हता. असं असलं तरी त्यांनाही काही कटू अनुभव आलेच. ते अनुभवही त्यांनी हसण्यावारी नेले. त्यांच्या बोलक्या स्वभावामुळे त्यांच्या अनेक कल्पना या लोकांनी आपल्या म्हणूनही वापरल्या. त्याचे त्यांनी कधी वैषम्य वाटू दिले नाही की त्याचा त्रास करून घेऊन आपल्या कामावर परिणाम होऊ दिला नाही.

आपल्याला याहीपेक्षा भन्नाट कल्पना या सुचत राहणार आहेत यावर त्यांना पूर्ण विश्वास होता. एका पाठोपाठ एक नवीन विचार करण्याची त्यांची क्षमता होती. लेखकाकडे अशा प्रकारची क्षमता ही असावीच लागते, त्याहीपेक्षा ही क्षमता त्याने विकसित करावी लागते हे त्यांच्या कारकिर्दीवरून लक्षात येते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत एक खास असा मार्ग निवडला. कधी कधी अभिनेता होण्याच्या त्यांच्या आवडीमुळे ते लेखनाकडून दूर गेले असतील तरीही त्या अनुभवाचाही त्यांनी नंतर आपल्यासाठी चांगलाच उपयोग करून घेतला.

बीपीटीमध्ये नोकरीला असताना त्यांनी पहिली एकांकिका लिहिली. त्यापाठोपाठ पूर्ण लांबीचं नाटक. त्या नंतरही ते जे जे करत असत त्यात एक प्रयोगशीलता होती. अशोक पाटोळे यांच्याकडे सतत संधी चालून येत होती, असं असलं तरी केवळ विकलं जात म्हणून त्यांनी काहीही लिहिलं नाही. जे पटलं,ज्यात आनंद वाटला, ज्यात नावीन्य होतं असंच त्यांनी लिहिलं. त्यांच्या या कल्पनाशक्तीला खरोखरच सलाम करायला हवा.

मराठी रंगभूमीला नाटककारांची एक मोठी परंपरा आहे. आपला भर हा वाचिक अभिनयावर असतो त्यामुळे मराठीत शब्दांना फार महत्त्व आहे. त्यातल्या संवादांना आहे. ज्या पद्धतीने संवादातून कथा उलगडत जाते त्याला महत्त्व आहे. अशोक पाटोळे यांनी या सा-या आघाडयांवर यशस्वी मुशाफिरी केली. त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी त्यांच्या बँकेतल्या एका सहका-याचा उल्लेख केला आहे.

त्या त्यांना नेहमी भावी पुल म्हणत होत्या. त्यांच्या लेखनातून त्यांच्या व पुलंच्या लेखनातलं साम्य अनेकदा दिसून आलं. त्यांनी त्यांच्या भाईंदरच्या वास्तव्यातला एक प्रसंग त्यांच्या आत्मचरित्रात लिहिला आहे. ते रेल्वेने घेऊन जात असलेली कणकेची पिशवी फाटते व त्यातल पीठ सा-या लोकांच्या अंगावर उडतं. ती पिशवी माझी आहे ही गोष्ट ते लपवतात. त्याबद्दल लिहिताना त्यांनी म्हटलं आहे, ‘ मी जर हे सांगितलं असतं की ही पिशवी माझी आहे तर डब्यातल्या लोकांनी माझी चांगलीच कणिक तिंबली असती. अशी अनेक शाब्दिक सौंदर्यस्थळे निर्माण केलेल्या लेखकाला आपण आता मुकलो आहोत, त्यांची उणीव येणा-या काळात भासल्याशिवाय राहणार नाही.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version