रामघळ

1

सह्याद्रीची रूपेच न्यारी! जितकी रौद्र, तितकीच सुंदर. येथली उंचच उंच गिरीशिखरे, धडकी भरवणा-या द-या, बेलाग कडे, वळणदार जुन्या घाटवाटा, घनदाट जंगले यांसारख्यांवर अनेक भटके आणि फिरस्ते आपल्या भटकंतीची भूक भागवत असतात. या प्रत्येक सह्यरूपाला स्वतंत्र असा भटके मंडळीचा चाहता वर्ग आहे. सह्याद्रीच्या कुशीत लपलेली रामघळ हे भटक्यांचं एक आवडीचं ठिकाण.

गड-किल्ल्यांवर फिरायला जाणारा दुर्गप्रेमी येथल्या इतिहासाने प्रेरित झालेला असतो. जुन्या घाटवाटा पालथ्या घालणारा सह्याद्रीशी स्वत:चं नातं शोधत असतो. धडकी भरवणा-या द-या-खो-यांची वाट धुंडाळणारा साहसाला कवेत घेत असतो. घनदाट जंगलाच्या वाटा तुडवणारा यामध्ये निसर्ग,पशू-पक्षी, वनस्पती यांचा अभ्यास करताना दिसतो.

जुनी हेमाडपंथी, यादवकालीन मंदिरे पाहणारा मंदिरातील सौंदर्य एकलेच शोधत असतो, तर हजारो वर्षापूर्वी निर्मिलेल्या डोंगराच्या पोटातील लेण्या पाहताना आपल्या संस्कृतीची ओळख शोधत असतो. कितीतरी कारणे आहेत. या सर्वात साम्य मात्र एकच. ते म्हणजे फिरण्यातून आनंद वेचण्याचे!असो. ही सारी रूपे इतिहासाने भरलेली आणि भूगोलाने नटलेली आहेत.

सह्याद्रीत आश्चर्यही ब-याच ठिकाणी दिसते. याची कितीतरी उदाहरणे देता येतील. ते म्हणजे पुण्यातील मुळशी तालुक्यातील तेलबैलाची जुळी भिंतीची रुपे, अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असणारी सांधण व्हॅली, पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवर टाकळी हाजी गावाजवळील कुकडी नदीवरील रांजण-खळगे, उन्हेरे येथील गरम पाण्याची कुंडे ही सारी ठिकाणे आपल्यासमोर येत असतात.

आश्चर्याने भरलेली आणि निसर्गाने निर्माण केलेली ही ठिकाणे म्हणजे विज्ञानाची तीर्थेच! इतिहास आणि भूगोलाव्यतिरिक्त यांना पदर असतो तो म्हणजे भू-विज्ञानाचा! आपल्या सामान्य दृष्टीला ते आश्चर्यच म्हणायला हवे. या आश्चर्यासारखी कितीतरी ठिकाणे आपल्याला भटकंतीदरम्यान भेटत असतात. असो. अशीच निसर्गनिर्मित आणि आश्चर्यमिश्रित ठिकाणे आहेत ती म्हणजे घळींची भटकंती!

डोंगराच्या पोटात असलेली, दगडात किंवा कातळातील कपार म्हणजेच घळ. भटकंती करता-करताच सह्याद्रीच्या अनेक वैविध्यपूर्ण ठिकाणे पाहायची आवड निर्माण झाली. अशा प्रेमातून डोंगरातल्या या घळींची भेट झाली. अन् सह्याद्रीचा नवा अवतारच जणू आम्हाला भेटला.

आपणा सर्वानाच रायगडमधील समर्थ रामदासांची पवित्र शिवथर घळ ब-यापैकी माहीत आहे. ती पाहिली. खूपच प्रसन्न वाटले. याच पंक्तीतली एक सुंदर घळ सातारा जिल्ह्यातील कोयनानगरजवळ आहे. तिचं नाव ‘रामघळ’. समर्थ रामदासांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही रामघळ म्हणजे डोंगरी सफारीचा एक सुंदर अनुभव होय. ही काहीशी अपरिचित. फक्त अस्सल भटक्यांच्याच ओळखीची आहे. म्हणूनच फिरण्यासाठी रामघळीचा सुरेख पर्याय निवडत वाट धरली ती कोयनानगरकडे..

सातारातून कोयनानगरला जावे लागले. तिथून कुंभार्ली घाटरस्त्यावरच हेळवाक नावाचे गाव लागते. या गावाच्या डाव्या बाजूलाच रामघळीकडे जाण्यासाठी वाट आहे. ही वाट चाफ्याचा खडक येथील धनगरपाडयापर्यंत जाते. तसं पाहिलं तर हेळवाक हे गावपट्टीच्या ट्रेकरसाठी नवीन नाही. कारण याच गावावरून साता-यातील दुर्गमात दुर्गम अशा भैरवगडाचा ट्रेक केला जातो. हा ट्रेक करतानाच्या वाटेवर एक फाटा फुटतो. येथून तासाभराच्या अंतरावर ही निसर्गरम्य रामघळ आहे. रामघळीत पोहोचल्यावर डोळे अक्षरश: विस्फारले जातात.

अर्धचंद्राकृती आडवी पसरलेली ही रामघळ आत जवळपास वीस फुटांपर्यंत आहे. वर डोक्यावर दगडाचे छप्पर. घळीतून दिसणारा समोरचा चांदोळी अभयारण्याचा हिरवाकंच नजारा. हे खरोखरच शब्दात उतरवणे कठीण काम. हा सारा परिसर निबीड अभयारण्यात स्थित आहे. आपण जर पावसाळ्यात गेलो तर आपल्यासारखा भाग्यवंत दुसरा कोणीही नाही.

या घळीवरूनच धबधबा पाण्याची पांढरीशुभ्र चादर पसरवून खाली पडत असतो. हा नजारा अनुभवण्यासारखं दुसरं सुख नाही. आम्ही एकदा पावसाळ्यात गेलो होतो. तेव्हा पाण्याचा प्रपात सौंदर्याचे वेगळेच मापदंड घेऊन घळीवरून खाली खोसळत होता. हे दृश्य बघितले आणि समर्थाच्या काही ओळी आठवल्या,

‘‘गिरीचे मस्तकी गंगा। तेथुनि चालली बळे।
धबाबा लोटती धारा। धबाबा तोय आदळे।।’’

पावसाळा सोडून इतर ऋतूत आलो तरी रुक्षपणा आपल्याला जाणवणार देखील नाही. हिरव्यागार झाडांनी नटलेल्या या सदाहरीत जंगलात खरं तर कोणता ऋतू चालू आहे हे कळायला अवघडच! या अशा सुंदर जागेतच समर्थाचे वास्तव्य होते असे म्हणतात.

रामघळ म्हणजे ट्रेकरसाठी अस्सल डोंगरी मेवाच आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. नजर जाईल तिथपर्यंत पसरलेलं घनदाट जंगल, एका बाजूला महाराष्ट्राला वरदान असलेलं कोयनेचं विशाल धरण, चहूबाजूंनी आपल्याला घेरलेल्या डोंगराच्या रांगा.. या सा-या सुंदर पसा-यातच आपण रामघळीची यात्रा केलेली असते. मात्र ही रामघळ सैर करताना माहितीगार अथवा वाटाडया घेणे केव्हाही चांगलेच, अन्यथा रानातल्या इतर वाटा तुम्हाला चकवा दिल्याशिवाय राहणार नाहीत.

रामघळीचा ट्रेक काही स्वतंत्ररित्या केला जात नाही. बहुतेक जण भैरवगड-प्रचितगड अथवा जंगली जयगडाला जोडूनच हा ट्रेक करतात. परंतु या ट्रेकदरम्यान रामघळीचं सौंदर्य आपल्यापासून दुर्लक्षित राहू नये म्हणूनच हा स्वतंत्र लेख-प्रपंच!

1 COMMENT

  1. शिवथर प्रांतातील शिवथर घळीचे सत्य स्वीकारण्याचे आवाहन.
    सदर घळीचे फोटो आणि रचने संदर्भातील माहिती

    हीच खरी घळ ह्याचे ठोस पुरावे,
    1) छत्रपती शिवाजी महाराजांचे रामनगर पेठ वसवण्या संदर्भातील पत्र की श्री येऊन राहिल्याउपवरी येथील व्यापाऱ्यांकडून बारा वर्षे दिवाण माफ यावरून समर्थ वास्तव्याच्या कालावधीचा अंदाज करावा.
    पत्ता कोड नलवडा मौजे पारमाची ताा शिवथर
    दूसरे पत्र समर्थशिष्य योगीराज श्री कल्याण स्वामी यांनी दिवाकर गोसावी यांना पाठवलेल्या पत्रातील उल्लेख की श्री ….. च्या दरशनास पारमाचीस सिवथर प्रांती नवलवाडीयाचा कोड तेथे जाभलीच्या चउथरीयावर श्री संतोषरूप बैसले होते.
    जर शिवथर प्रांतात समर्थांच्या दर्शनाची जागेचा उल्लेख आहे.
    हे नलवडा वा नवलवाडी चा कोड म्हणजेच सध्याचे रामदास पठार.आणि शिवथर हा तेव्हाचा तालुका चे ठिकाण होते. हया येथील मंदिराच्या जागेचे आज ही सरकार दरबारी सातबारा वरील नाव मठाचा माळ असा आहे. हया ठिकाणाहून संशोधित शिवथरघळ अवघ्या सहाशे मीटर वर आहे म्हणजेच पायी पंधरा ते वीस मिनीट. ही दोन्ही पत्र विश्वासनीय आहेत व आज ही ती समर्थ वाग्देवताच्या बाड मध्ये पहायला मिळतात.
    2) घळीची भौगोलिक स्थान आणि रचनेचा उल्लेख समर्थ शिष्य गिरिधर स्वामी यांच्या समर्थ प्रताप मध्ये आहे तो खालील प्रमाणे
    समर्थे पर्वती केले येक गुप्तसदन।
    प्रसंगे ठेवावया देवार्चन।
    सूर्यप्रकाश उदक सन्निध उर्ध्वगमन।
    मार्ग सोपान करूनी जावे॥
    समर्थ प्रताप गिरीधरस्वामींनी समर्थ रामदास स्वामींच्या या सदनाचे वर्णन केले आहे. हे सदन पर्वतावर आहे, गुप्त आहे, तेथे प्रसंगी देवार्चन म्हणजेच देवघर ठेवता येते, सूर्यप्रकाश सन्निध आहे, म्हणजेच या गुप्तसदनाला पूर्व-पश्चिमेचा उगवतीचा व मावळतीचा सूर्यप्रकाश समोर आहे, उदक म्हणजे या रामगंगा धबधबा समोर ठेऊन उर्ध्वगमन म्हणजेच उर्ध्व दिशेने जावे आणि यासाठी मार्ग सोपा करून सोपान म्हणजे शिडीसारखे चढून जावे, अशी वर्णनानुरूप परिस्थिती आढळते.
    आज ही सरकार दरबारी घळीचे सातबारा वरील नाव मठाचा माळ असा आहे. तर बाजूच्या धबधबाचे नाव भटाचा माळ आहे.
    3) आनंदवनभुवनी म्हणजे समर्थांनी केलेल्या शिवथर प्रांतातील वास्तव्यातिल स्वानुभव,हया जागेचा महिमा आणि या जागेतच पुढे काहि घडणार आहे असा उल्लेख केला आहे. तसेच हया वनभुवनाला सर्व प्रथम मान दया अशी आज्ञा केली आहे. त्यातील काही ओवी देत आहे.

    गुप्त उदंड भुवने म्हणजे शिवथरघळ

    सकळ देवांची साक्ष | गुप्त उदंड भुवने |सौख्य जे पावणे जाणें | आनंदवनभुवनी ||१५||

    रामगंगा म्हणजे बाजूच्या धबधब्याचे वर्णन

    स्वर्गीची लोटली तेथे |रामगंगा महानदी |तीर्थासी तुळणा नाही | आनंदवनभुवनी ||१३ ||

    गुप्तगंगा चा उल्लेख

    ग्रंथी जे वर्णिली मागे .| गुप्तगंगा महानदी |जळांत रोकडे प्राणी | आनंदवनभुवनी ||१४

    अकरा हया अंकाची प्रचिती

    आक्रा आक्रा बहु आक्रा |काये आक्रा कळेचीना |गुप्त ते गुप्त जाणावे |आनंदवनभुवनी ||१७ ||

    दासबोध नव्याने लिहिल्याचा उल्लेख

    लिहिला प्रत्ययो आला | मोठा आनंद जाहाला |चढता वाढता प्रेमा |आनंदवनभुवनी ||३८ ||

    गणपतीला केलेली प्रार्थना त्याबद्दल

    जे साक्ष देखिली दृष्टी |किती कल्लोळ उठीले|विघ्न्घ्ना प्रार्थिले गेलो | आनंदवनभुवना ||८ ||

    देवालये दीपमाळा |रंगमाळा बहुविधा |पूजिला देव देवांचा | आनंदवन भुवनी || ४०||

    नवीन दासबोध लिहिल्याचा उल्लेख.

    वेद शास्त्र धर्म चर्चा |पुराणे महात्में किती |कवित्वे नूतने जीर्णे | आनंदवनभुवनी ||५० ||

    त्या ठिकाणचे महत्व:

    वेद तो मंद जाणावा | सिध्द आनंदवनभुवनी |आतुळ महिमा तेथे |आनंदवनभुवनी ||५२ ||

    मानसी प्रचीत आली | शब्दी विश्वास वाटला |कामना पुरती सर्वै | आनंदवनभुवनी ||५३ ||

    येथूनी वाचती सर्वै | ते ते सर्वत्र देखती | सामर्थ्य काय बोलावे | आनंदवनभुवनी ||५४ ||

    उदंड ठेविली नामे | आपस्तुतीच मांडिली |ऐसे हे बोलणे नाही | आनंदवनभुवनी ||५५ ||

    पुढे हया ठिकाणी खरे काही घडणार आहे त्याची कल्पना समर्थांना ठाऊक होती.आणि काय होईल ते पहावे हया ठिकाणी अस सावध करत आहेत.

    बोलणे वाउगे होते |चालणे पाहिजे बरे |पुढे घडेल ते खरे | आनंदवनभुवनी ||५६ ||

    स्मरले लिहिले आहे | बोलता चालता हरी |काये होईल पहावे | आनंदवनभुवनी ||५७ ||

    महिमा तो वर्णवेना | विशेष बहुतांपरी | विद्यापीठ ते आहे | आनंदवनभुवनी || ५८ ||

    सर्वसद्या कला विद्या | न भूतो न भविष्यती |वैराग्य जाहाले सर्वै |आनंदवन भुवनी ||५९ ||

    अशा सिद्ध स्थानास सर्वात प्रथम मान दया अशी समर्थांच्या आज्ञाचे स्मरण राहू दया

    ‘इति श्रीवनभुवनी नाम मान प्रथम॥’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version