Home मजेत मस्त तंदुरुस्त अ‍ॅलर्जीपासून जरा जपून..

अ‍ॅलर्जीपासून जरा जपून..

1

त्वचेवर खाज सुटणे, पुरळ उठणे, अचानक शिंका येणे, डोळ्यांना खाज सुटणे, त्वचा लाल होणे, उलटया होणे असे प्रकार हे अनेकदा अ‍ॅलर्जीमुळे होत असतात. बरेचदा आपल्याला त्याची माहिती नसते. अ‍ॅलर्जीची लक्षणे ही वेगवेगळ्या स्वरूपातील असतात. काही वेळा ती सौम्य स्वरूपाची असतात तर काही वेळा ती अतिशय तीव्र असतात. ज्याची परिणती काही वेळा अतिशय घातक रूपात अथवा मृत्यूमध्येदेखील परावर्तित होऊ शकते. कुठल्याही प्रकारची अ‍ॅलर्जी असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्याची तपासणी करून घ्यावी आणि त्वरित योग्य ते औषधोपचार करावेत.

कुठल्याही बाह्य घटकांच्या विरुद्ध शरीरातील संरक्षण संस्थेने दिलेली तीव्र स्वरूपातील प्रतिक्रिया म्हणजे अ‍ॅलर्जी होय. ही अनेक कारणांमुळे अथवा घटकांमुळे होऊ शकते. परागकण, धुलीकण, अन्नपदार्थ, कीटकांचा चावा, औषधे, बुरशीचे बिजाणू इत्यादींनी अ‍ॅलर्जी होऊ शकते. अ‍ॅलर्जीची लक्षणे विविध प्रकारे दिसून येतात. ही लक्षणं सौम्य किंवा तीव्र स्वरूपाची असली तरीही ती घातक ठरू शकतात.  सर्वसामान्यपणे अ‍ॅलर्जीचे काही ठरावीक प्रकार दिसून येतात. हे प्रकार आणि त्यामागची कारणे थोडक्यात जाणून घेऊ –

हे फिव्हर : अ‍ॅलर्जीचा हा प्रकार परागकण अथवा इतर सुक्ष्म घटकांमुळे दिसून येतो. या प्रकारामध्ये सर्दी, खाज सुटणे आणि डोळ्यातून पाणी येणे अशी लक्षणेसुद्धा दिसतात. तसेच नाकाजवळील भागात जळजळ होणे, खाजणे किंवा म्युकस अधिक प्रमाणात तयार होणे अशीही लक्षणे दिसतात. अधिक संवेदनशील व्यक्ती असेल तर त्वचेवर चट्टेही उठू शकतात.

रॅश : रॅश म्हणजे पुरळ. यामध्ये त्वचेवर काही वेळा गडद लाल रंगाचे चट्टे पडतात किंवा तेवढा भाग फुगल्यासारखा होतो. विषाणूजन्य अ‍ॅॅलर्जीमुळे, ताणतणावामुळे, सूर्यकिरणे किंवा तापमानातील बदलामुळेदेखील त्वचेवर पुरळ येऊ शकतात.

वनस्पतींची अ‍ॅलर्जी : पॉयझन आयव्ही, पॉयझन ओक, पॉयझन सुमॅक या झाडांमध्ये उरुशिओल नावाचा तेलकट रस असतो. या रसामुळे ब-याच जणांना अ‍ॅॅलर्जिक रिअ‍ॅक्शन येते. हा रस त्वचेच्या संपर्कात आल्यास पुरळ येऊन खाज सुटते. हा पुरळ काही तासांतच येतो आणि काही दिवसांपर्यंत राहतो. बागकामाचे साहित्य अथवा अन्य कुठल्याही कारणांमुळे व्यक्ती या रसाच्या संपर्कात आल्यास तिला याचा त्रास होऊ शकतो.
कीटकांचा चावा : मधमाशी, गांधीलमाशी, कुंभारमाशी, मुंग्या यासारखे कीटक आणि त्यांचा चावा यामुळे अनेकांना अ‍ॅलर्जी येऊ शकते. या कीटकांनी चावा घेतल्यानंतर त्यांच्या नांगीद्वारे विशिष्ट रस त्वचेवर सोडला जातो. त्यामुळे काही वेळा त्या ठिकाणी अल्प वेदना, सूज, लाली येऊ शकते.

पेट अ‍ॅलर्जी : काही व्यक्तींना पाळीव प्राण्यांपासून अ‍ॅलर्जीचा त्रास होतो. एखाद्या व्यक्तीची संरक्षण संस्था प्राण्यामधील ठरावीक प्रथिनांप्रति तीव्र प्रतिक्रिया दाखवते तेव्हा अशा प्रकारची अ‍ॅलर्जी होते. यामुळे नाकाच्या भागात तीव्र खाज सुटते, िशका येतात, नाक वाहते आणि इतरही लक्षणे दिसतात.

लॅटेक्स अ‍ॅलर्जी : रबरमधील प्रोटिनमुळे काही व्यक्तींना अ‍ॅलर्जी येते. यामध्ये सर्दीपासून तीव्र प्रकारच्या अ‍ॅलर्जीपर्यंत वेगवेगळे प्रकार दिसतात. काही वेळा परिस्थिती गंभीर होते तेव्हा त्वरित वैद्यकीय सेवेची गरज भासते. पातळ अथवा ताणले जाणारे रबर जे रबरी हातमोजे, फुगे इत्यादीमध्ये वापरले जाते त्यात प्रोटिन अधिक प्रमाणात असते. त्यामुळे त्यापासून काही जणांना अ‍ॅलर्जी येऊ शकते.

बुरशीची अ‍ॅलर्जी : यामध्ये प्रामुख्याने इनडोअर आणि आउटडोअर अशा बुरशीच्या प्रजाती असतात. अन्नावरची बुरशीही यासाठी कारणीभूत असते. बुरशीचे बीजकण श्वसनामार्फत शरीरात गेल्यास काही व्यक्तींच्या संरक्षण संस्थेद्वारे तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होते. याचा परिणाम म्हणून कफ होणे, डोळ्यांना खाज सुटणे यासारखी लक्षणे दिसतात. काही व्यक्तींच्या बाबतीत अस्थमादेखील अशा प्रकारच्या अ‍ॅलर्जीचा परिणाम दिसू शकतो.

सौंदर्यप्रसाधनांची अ‍ॅलर्जी : मॉइश्चरायझर, शाम्पू, डिओड्रंट, मेकअपचे सामान, कोलेजन्स आणि इतर सौंदर्यप्रसाधने आपल्या दैनंदिनीचा भाग असतात. बरेचदा अशी सौंदर्यप्रसाधने अ‍ॅॅलर्जकि रिअ‍ॅक्शनला कारणीभूत ठरतात. प्रसाधनांमध्ये वापरण्यात येणारे वेगवेगळ्या प्रकारचे सुगंध, प्रिझव्‍‌र्हेटिव्ह्ज हे अ‍ॅलर्जकि रिअ‍ॅक्शन वाढवणा-या अ‍ॅन्टजन्ससारखे काम करतात.

औषधांची अ‍ॅलर्जी : औषधांच्या अ‍ॅलर्जीमुळे एकाच वेळी वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे दिसतात. एखाद्या औषधाविरुद्ध अ‍ॅलर्जी दिसणे ही तशी सर्वसामान्य गोष्ट आहे. मात्र या रिअ‍ॅक्शनच्या स्वरूपात वेगवेगळे प्रकार दिसून येतात. सौम्य खाज सुटणे किंवा सौम्य साइड इफेक्ट्स म्हणजे उलटया अथवा अन्नावरील वासना उडणे याबरोबरच तीव्र अ‍ॅलर्जीदेखील यामध्ये दिसून येते. ब-याच औषधांमुळे त्वचेवर बारीक पुरळ उठतात.

सलम सिकनेस : औषधे घेतल्यानंतर काही दिवसांनी दिसणारा हा अ‍ॅलर्जीचा प्रकार आहे. काही वेळा अशा प्रकारची अ‍ॅलर्जी एका आठवडयानंतर येते. एखादी लस दिल्यानंतरही अशा प्रकारची अ‍ॅलर्जी दिसू शकते. सल्फा ड्रग्ज, आकडीसाठी घेण्यात येणारी औषधे, इन्सुलीन, आयोडिनेटेड एक्स-रे कॉन्ट्रास्ट डाईज इत्यादी औषधांमुळे येणा-या अ‍ॅलर्जीसाठी कारणीभूत असणारे घटक आहेत.

एक्झिमा : हा त्वचेवर खाज निर्माण करणारा अ‍ॅलर्जीचा प्रकार आहे. लहान मुले, नवजात अर्भके आणि काही व्यक्तींना आयुष्यभर या त्रासाला सामोरे जावे लागते. अनेक प्रकाचे त्वचेचे दाह व्यक्त करणारी अ‍ॅलर्जी ही एक्झिमाची सर्वसामान्य व्याख्या आहे. त्याला डर्मिटीज असेही म्हणतात. संरक्षण संस्थेचे अनसíगक कार्य हे या अ‍ॅलर्जीचे कारण मानले जाते. एक्झिमा होण्यामागे त्वचेच्या संपर्कात येणारे काही सर्वसामान्य घटक आहेत. त्यामध्ये साबण, प्रसाधने, कपडे, डिर्टजट, दागिने आणि घाम यांचा समावेश होतो.

डोळ्यांची अ‍ॅलर्जी : डोळ्यांची अ‍ॅलर्जी ही एक सर्वसामान्य तक्रार आहे. यामुळे डोळे येणे, डोळ्यात घाण येणे, खाज सुटणे यासारखी सर्वसामान्य लक्षणे दिसून येतात. परागकण, गवत, धूळ, पाळीव प्राण्यांच्या शरीरावरील सुक्ष्म कण यामुळे ही अ‍ॅलर्जी होऊ शकते.

दुधाची अ‍ॅलर्जी : दूध आणि दुधाची वेगवेगळी उत्पादने तसेच दुधातील प्रथिने काही व्यक्तींसाठी अ‍ॅलर्जीस कारणीभूत ठरतात. अशा व्यक्तींना उलटया होणे, जुलाब होणे, पोटात कळा येणे अशी लक्षणे दूध अथवा दुग्धजन्य पदार्थ घेतल्यास लगेच दिसतात.

अन्नपदार्थाची अ‍ॅलर्जी : काही व्यक्तींना ठरावीक अन्नपदार्थाची अ‍ॅलर्जी असते. त्यामध्ये अंडी, दूध, पिनट्स आणि इतर काही अन्नपदार्थाचा समावेश असतो. या प्रकारच्या अ‍ॅलर्जीमुळे शरीरात अ‍ॅलर्जी निर्माण करणा-या इम्युनोग्लोबीन अ‍ॅण्टीबॉडीज तयार होतात. काही व्यक्तींमध्ये फारशी तीव्र लक्षणे दिसत नाहीत. अन्नाची अ‍ॅलर्जी असेल तर संरक्षण संस्था अ‍ॅण्टीबॉडीज आणि हिस्टामाईन अर्थात रक्तपेशींशी संबंधित असणारे द्रव्य तयार करतात. तसे पाहिले तर कुठल्याही अन्नामुळे अ‍ॅलर्जी होऊ शकते. पण सर्वसामान्यपणे जे अन्नपदार्थ यासाठी कारणीभूत असतात त्यामध्ये वर सांगितल्याप्रमाणे अंडी, दूध, समुद्री प्राणी, गहू इत्यादींचा समावेश असतो.

प्रतिबंधात्मक उपाय : अ‍ॅलर्जी पूर्णपणे बरी होण्यासाठी तसा कुठलाही ठोस इलाज नाही. पण एकदा अनुभव घेतल्यानंतर आपण योग्य ती काळजी घेतल्यास त्यापासून बचाव करता येतो. अ‍ॅलर्जीसाठी कारणीभूत असणा-या वेगवेगळ्या गोष्टींपासून स्वत:ला दूर ठेवणे हा त्यावरील एक सोपा उपाय आहे. त्यासाठी घरातील पाळीव प्राणी खोलीतून बाहेर ठेवावेत किंवा त्यांना रोज आंघोळ घालावी. घरातील ब्लँकेट्स, काप्रेट्स, पांघरूण रोज खोलीतून बाहेर काढावीत आणि त्यावरील धूळ झटकावी. आठवडयातून एकदा धुवावीत. ज्यामुळे घरात जास्त प्रमाणात धूळ येते अशा वस्तू अथवा घराची रचना ठेवू नये. धुळीची अ‍ॅलर्जी असल्यास विशिष्ट प्रकारच्या उशा आणि अभ्रे वापरावेत.

परागकणांची अ‍ॅलर्जी असल्यास घरात असताना खिडक्या बंद ठेवाव्यात. हवेत मोठया प्रमाणात परागकण असण्याच्या ऋतूमध्ये बाहेरून आल्यानंतर त्वरित कपडे बदलावेत. बुरशीची अ‍ॅलर्जी असल्यास घरातील ओला राहणारा भाग म्हणजे बाथरूम, सिंक इत्यादी स्वच्छ ठेवावेत.

तीव्र स्वरूपाची अ‍ॅलर्जी असल्यास घरात अ‍ॅण्टीडॉट नेहमीच असू द्यावेत. एपिनेफ्रिन हे सर्वसामान्यपणे वापरण्यात येणारे परिणामकारक औषध आहे. चटकन सापडतील अशा ठिकाणी बेनाड्रील या अ‍ॅण्टी हिस्टामाइन गोळ्या ठेवाव्यात. जवळ नेहमी मेडिकल इमर्जन्सी नंबर ठेवावा. अ‍ॅलर्जी झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी सरळ झोपवावे आणि पायाखाली उशी ठेवावी. कपडे सल असावेत आणि त्या ठिकाणी हवा खेळती असावी.

सर्दी किंवा तत्सम प्रकारच्या अ‍ॅलर्जीचे लक्षण दिसत असल्यास आणि औषधांनीदेखील ती बरी होत नसल्यास चिमूटभर बेकिंग सोडा किंवा अर्धा चमचा आयोडाईज्ड् नसलेले मीठ घ्यावे, त्यात थोडे कोमट पाणी टाकावे. स्वच्छ ग्लासात हे मिश्रण घेऊन नाक आणि तोंड धुवावे. त्वचेवर पुरळ येत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्याचबरोबर गार पाण्याने शॉवर घ्यावा, कॅलामाइन लोशन लावावे. तसेच तोंडावाटे अ‍ॅन्टी हिस्टामाइन घ्यावे.

कीटकांच्या चाव्यामुळे अ‍ॅलर्जी येत असल्यास कीटकांना दूर ठेवण्याचे शक्य तितके प्रयत्न करावेत. एखाद्या कीटकाची नांगी त्वचेत राहिल्यास तीस सेकंदाच्या आत ती काढावी, जेणेकरून नांगीतील द्रव त्वचेत जाणार नाही. त्वचेवर बसलेला कीटक पूर्णपणे काढून टाकण्याचा प्रयत्न करून हा भाग कोमट पाण्याने स्वच्छ धुवावा. त्यासाठी सौम्य डिर्टजटचा वापर करावा. तसेच तोंडातून अ‍ॅन्टी हिस्टामाइन घ्यावे. अर्थात, कुठल्याही प्रकारची अ‍ॅलर्जी असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्याची तपासणी करून घ्यावी आणि त्वरित योग्य ते औषधोपचार करावेत.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version