आज टिप ऽऽर!

1

आज टिप्पऽऽर आसा ..मी दुपारी ढोरा बांधलंय काय सोमतो, तलावात आंघोळ करून देवळात जातलयं.. थयच जेवंण ऽ टिपर पाजळल्याशिवाय घराक येवचंय नाय.. ह्या एका दमात बबन्यान सांगल्यान आणि त्यांना वाडय़ातसून ढोरांची कानी उडवल्यान.. आता ह्या म्हणना कोणी आयकल्यान की नाय.. याची त्येका काय फिकीर नाय. कारण वर्षाच्या वार्षिकाक मंदिरात ‘भोपळय़ाच्यो आडय़ो  जोपर्यंत खायत नाय तोपर्यंत टिपर झालो असो वाटतच नाय’ असा त्याचा नियम आहे. हा टिपर म्हणजे दीपोत्सव..सर्व गाव एक साजरा करत असलेला दिव्यांचा उत्सव! जनता आणि देवता यांमधील नाते अधिक दृढ करणारा हा दिवस.. गावचा सलोखा जपणारी ही परंपरा आज होत आहे.
तुळशीच्या लग्नाच्या तिस-या दिवशी म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेला गावच्या ग्रामदेवतेच्या मंदिरात मोठी लगबग सुरू असते. देवाच्या तरंगांना पुन्हा वस्त्रे नेसवली जातात. कुणी साफसफाई करत असतो.. तर कुणी आणखी काही. गावोगावी ग्रामदेवतांच्या मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेच्या औचित्यावर दीपोत्सवाचा कार्यक्रम होणार असतो. या दिवसाला आमच्या मुलखात ‘टिपराचा उत्सव ’ म्हणतात. हरकुळखुर्द गावच्या पावणाईच्या मंदिरात देवतांना तेलाची आंघोळ घालतात.. तर कुर्ली गावच्या कुर्लादेवीच्या मंदिरात त्रिपुरारी दिवशी होणा-या उत्सवात खणा-नारळांच्या ओटय़ांची रास लागते. काही गावांमध्ये कारीटाचे दिवे लावले जातात. आच-याच्या रामेश्वराला तर कुवाळय़ांच्या दिव्यातून ओवाळले जाते.. सर्वच गावांत परंपरा भिन्न असल्या तरी दिव्यांचा उत्सव हा दिमाखदार असतो. कुंभारवाडय़ात मोठी गडबड सुरू झालेली असते. दिवाळीनंतरही पणत्यांच्या कामात हा वाडा अधिकच मग्न झालेला असतो. छोटय़ा पणत्यांबरोबरच मोठय़ा पणत्याही त्यांना तयार कराव्या लागतात.

दिवाळी म्हटली की, दिव्यांची आरास. गोडधोड आणि प्रत्येक दिवशी वेगळा सण म्हणजे वसुबारस असो, धनत्रयोदशी असो, पाडवा नाहीतर भाऊबीज प्रत्येक दिवशी वेगळा थाटमाट.. पण घराघरांत साजरा होणारा हा दिवाळोत्सव घरापुरताच असायचा. आलेच तर पाहुणे, मित्रमंडळी शहरातील आणि ग्रामीण भागातील ही दिवाळी अनेक पटींनी वेगवेगळी. परंपरा जपणारी, शेजारधर्म पाळणारी असे असले तरीही आमच्या गावातील खरी दिवाळी आम्हाला वाटते ती टिपराच्या पौर्णिमेची! दिव्यांची आरास.. घरापासून मंदिरापासून दीपमाळेचा साज आणि मुख्य म्हणजे ग्रामदेवतांना घातली जाणारी तेलाची आंघोळ. प्रत्येक भागात दीपोत्सवाचा जल्लोष. चुरमु-यांची उधळण आणि त्रिपुरारीचा चंद्र आकाशातून जाईपर्यंत टिपेला पोहोचणारा उत्साह यालाच आमच्या मुलखात टिपर पाजळणे म्हणतात. टिपर पाजळणे म्हणजेच आमच्या गावचा जल्लोष..!

काही वर्षापूर्वीची दिवाळी आठवते; तुळशीच्या लग्नात तुळस सजवताना पणत्यांची सभोवताली आरास करताना घरातल्या प्रत्येक भागात दिव्यांनी सगळा भाग उजळवून टाकण्यात आमची केवढी धावपळ असे. आता मेणाच्या पणत्या आणि मेणबत्त्यांनी दिव्यांची जागा घेतली. पण मेणाच्या दिव्यांपेक्षा पणत्या सोप्या वाटायच्या.. मातीच्या पणत्यांमधील तेल सांडू नये म्हणून दक्षता तर घ्यावी लागायची शिवाय या पेटलेल्या दिव्यांच्या वाती मांजर आणि उंदरापासून वाचविण्याची कसरत करायला लागायची. काज-याच्या आणि एरंडाच्या बिया पेटवून दिव्याप्रमाणे वाती जाळण्यातली मजा आजही अनुभवायला मजा वाटते. या बिया जाळून दिवा पेटविण्याची वेळ आजही अनेक भागातील मंडळीवर येते. पण तेल कसलेही असो दिवा जळलाच पाहिजे हा उत्साहच आनंद भरणारा असतो.

टिपराच्या दिवशी भल्या पहाटेच नौबत अधिक वेळ सुरू असते. पहाटेच्या निरव शांततेत ही आवाजाची कंपने अगदी मस्तकापर्यंत जाऊन पोहोचतात. ढढंम्..ऽढम्..ढाम..ढाम..ऽऽ चालीचा हा आवाज त्रिपुरारीचा सांगावा देत असतो. सूर्योदयापूर्वीच मग आज टिपर आहे. रात्री टिपर पाजळूक जावूक व्हया. अशा उंच स्वरात तात्या सांगत सुटतात. लहानथोर कुणीही भेटू दे ते त्याला हक्काने सांगतात. भल्या पहाटे त्यांची ही दवंडी सुरू होते. वयाने ज्येष्ठ असलेले तात्या आमच्या आवाटातच नव्हे तर गावात ‘आरड’ म्हणून प्रसिद्ध आहेत. असे तात्या केवळ आमच्याच वाडीवर आहेत असे नाही. तात्याच्या जागेवर दुस-या वाडीत कुणीतरी बाळय़ा असतो, कुणी अण्णा असतात कुणी आणखी..! प्रत्येक जण सांगावा धाडत असतात, तात्यांना आज लवकरच देवळात जायचे असते. त्यांना देवाच्या दिव्यांच्या उत्सवात सहभागी व्हायचे असते. गावातल्या मंडळींना जास्त दगदग न करता भेटता येणार असते.

एव्हाना शेतीची कामेही बरेचशी संपलेली आहेत. भातकापणी झाली आहे. घरात आलेले भात पाखडून, सुकवून कणगी, तटय़ांमध्ये भरले गेले आहे. गवतही वाळवून गंजी तयार झाल्या आहेत. यामुळे कामाची थोडी उसंत आहे. दिवसभरातली शेतीची कामे आटोपून सर्वच मंडळी लवकर देवळात पोहोचणार आहेत. घराघरात टिपराचे काही पडसाद जाणवायचे नाहीत. कारण इतर सण वेगळे आणि टिपराची पौर्णिमा वेगळी!

टिपरादिवशी दुपारीच जंगलात काही ग्रामस्थ पोहोचलेले असतात. त्यांचे लक्ष करमळीच्या झाडांवर असते. करमळीच्या पानांची ओझी दिवस मावळायच्या आत देवळात आणली जातात. करमळीचे पान म्हणजे फुटभर रुंदीचे आणि दीड ते दोन फूट लांबीचे! शेराच्या भाताची रास लावली तरी एक शीत जमिनीवर सांडणार नाही.. गरमगरम भात ओतला तरी पान तेवढेसे भाजून निघायचे नाही. देवाच्या राईतल्या करमळीची पाने फक्त देवासाठी असतात. त्रिपुरारी पौर्णिमेदिवशी देवळात करमळीच्या पानावर भोपळय़ांच्या आडय़ेंसह मिळणारा महाप्रसाद म्हणजे विलक्षण आनंददायी असतो. यासाठी दुपारीच भोपळा पोहोचलेला असतो. भल्या मोठय़ा भोपळय़ाच्या आडय़ा तयार केल्या जातात.

डाळ, भात आणि भोपळय़ाच्या आडय़ांचा मेनू तयार होतो आणि ग्रामदेवतांना प्रसाद दाखविला जातो. देवदेवतांना त्रिपुरारीचा हा प्रसाद दाखविल्यानंतर मंदिरात येणा-या समस्त रयतेला हा महाप्रसाद खुला केला जातो. करमळीच्या पानांवर मिळणारा हा महाप्रसाद हे एक टिपराचे वैशिष्टय़ म्हणावे लागेल. अलीकडे करमळीची झाडे कमी झाली आहेत. पण पहिल्या दोन पंक्ती या पानांच्या उठायला हव्यात हा गाववाल्यांचा आग्रह आजही असतो. मानकरी यासाठी सतर्क असतात. करमळीच्या पानांची जागा अलीकडे चकचकीत वाटणा-या कागदाच्या पत्रावळीने घेतली आहे. पूर्वी करमळीच्या पानांचे एक कवळच आणले जायचे. एका कवळात दीड-दोनशे पाने असायची. आता तशी जंगलातून पाने आणणारी मंडळी कमी झाली आहेत.. आणि जंगलातली झाडे सुद्धा!

खरे तर टिपराच्या पौर्णिमेचा उत्सव हा सा-या रयतेचा.. कुणी एक माणूस येऊन तो होणार नाही आणि सर्व माणसे आल्याशिवाय त्याची सुरुवातही नाही. बारा बलुतेदार एकत्र झाल्यावर मानकरी पुढे होतात. ग्रामदेवतेला साद घातली जाते आणि मग दिव्यांचा उत्सव सुरू होतो. देवळात दुपारी कुंभाराने पणत्यांची रास आणलेली असते. एक-दोन नव्हे पाचशे ते सहाशे पणत्या असतात. आमच्या गावच्या मंदिरात ३६० पणत्या मोजून लागतात. दीपमाळेला वेगळय़ा आणि इतर मानाच्या वेगळय़ा. मध्यानानंतर तेली बांधवही तेलाच्या बुधल्या घेऊन दाखल होतो. पूर्वी तिळाची शेती ही मंडळी करायची. सराईला ते एकत्र काढून घरात दिवाळीच्या पहिल्या आठ दिवसांत तेल घाणा जुंपला जायचा. ग्रामदेवतेला नमस्कार करून आस फिरविले जायचे आणि तिळाचे तेल ठिपकू लागायचे. त्यातले पाच शेर तेल देवाचे हे ठरलेले असायचे. पाचशेर तेलाने देवाला आंघोळ घातली जाते. याला ‘म्हाकण’ असे म्हटले जाते. एकदा का म्हाकण झाले की पणत्या तेलाने भरल्या जातात आणि मानाप्रमाणे प्रत्येक पणती देवाच्या प्रांगणात सजविली जाते. देवाच्या प्रांगणात लागणा-या सर्व दिव्यांना पाहिजे तेवढे तेल ओतण्याची जबाबदारी तेली बांधवांची. हा मान तेलीवाडीचा.

बलुतेदारी प्रमाणे गावच्या वाडय़ा वसलेल्या आहेत. सुतारवाडी सुतारांचीच असते. तेलीवाडी तेलींची, गावडेवाडी गावडय़ांची, कुंभारवाडी
कुंभारांची, गुरववाडी गुरवांची.. अशी मोठी नामावली सांगता येईल. यात वाडय़ांची नावे मालवणी अपभ्रंशातली असली तरी त्यात एक गोडवा आहे. नावाप्रमाणे प्रत्येक वाडीची कामे ठरलेली आहेत. प्रत्येकाचा गावच्या उत्सवात सन्मान ठरलेला आहे आणि प्रत्येक जण मोठय़ा श्रद्धेने आपले काम म्हणजे आपला सन्मान समजून त्याच कृतार्थ भावनेने देवासमोर हजर झालेला असतो. काळाच्या ओघात वाडीवस्तीचे रूप बदलून गेले आहे. आता सुतारवाडीत अन्य ज्ञातीबांधवांची नांदती घरे आहेतच. मातीच्या भांडय़ांना किंमत नाही असे नाही पण त्याचा वापर कमी झालेला आहे.

कुंभारवाडीतील मंडळी आता अन्य कामे करत असतात. काही जणांनी शहर गाठले. आपली परंपरागत कामे बाजूला सारून नव्या कामांकडे त्यांनी मोर्चा वळविला. तेलीवाडीतल्या रामा तेलीचा घाणा केव्हाच बंद पडला. पूर्वी सात-सात खंडी तिळ पिकवून त्याचे अनेक लिटर तेल काढणारा त्याचा हा घाणा आता भंगारात गेला आहे. रामा तेलीही आता म्हातारे झाले आहेत. त्यांची मुले शिकली. उच्चशिक्षित झाली, शहरातच ती स्थिरस्थावर झाली. वाडीवस्तीचे रूप बदलले आहे. घरांची रचना बदलली आहे. परंतु ग्रामदेवतेवरची श्रद्धा कमी झालेली नाही. वर्षाच्या वार्षिकाला ते आपला सन्मान टिकविण्याच्या प्रथेप्रमाणे आपला शिदा घेऊन हजर असतात. या सेवेसाठी ग्रामदेवतेने प्रत्येक बलुतेदाराला त्याच्या त्याच्या कामाप्रमाणे विशेष सेवेसाठी देवाची अशी काही जमीन दान केली आहे. या जमिनीत त्यांनी कसायचे, मेहनत करायची, उत्पन्न घ्यायचे आणि त्याबदल्यात गावच्या वार्षिकात सन्मानाने हजर व्हायचे. आजही ही परंपरा श्रद्धेने सुरू आहे.

टिपराच्या दिवशी दुपारीच मंदिरात सुरू होणारी ही लगबग सूर्य अस्ताला जाताच अधिकच वाढत जाते. एकेक जण मंदिरात दाखल होत असतो. एव्हाना मंदिर पूर्ण भरून जाते. अख्खा गाव एकत्र होतो. समाजमन एक होते. ख्याली खुशाली सुरू होते. देवाच्या उत्सवाच्या निमित्ताने प्रत्येक जण एकमेकांना भेटत असतो. सह्याद्रीतून चंद्र डोकावू लागतो. त्रिपुरारीचा भलामोठा चंद्र आपली शीतल छाया घेऊन हळूहळू वर सरकत असतो. सूर्य अस्ताला जात असतानाच मंदिराच्या भोजनकक्षात भलेमोठे भाताचे टोप उतरवले जात असतात. भोपळय़ाची भाजी रठरठत असते.  देवळीमामा पुढे होतात. पंक्तींची तयारी सुरू होते. घाडी-गुरव बांधव कंबरबांधून सज्ज होतात. करमळीच्या पानांवर महाप्रसाद वाढला जातो. भोपळय़ाच्या आडय़ांबरोबर हा महाप्रसाद एक वेगळय़ाच चवीने तयार झालेला असतो. भोजनाचा हा कार्यक्रम संपतानाच ढोलांचा ताल अधिकच वाढतो. दीपमाळेची साफसफाई सुरू होते. प्रत्येक जण रिवाजाप्रमाणे आपापली कामे करू लागतात. एव्हाना चंद्र अगदी मस्तकावर पोहोचलेला असतो. गर्द झाडीतल्या मंदिरात त्याची छाया अधिकच फुलून दिसते. मंदिर विद्युतरोषणाईने झगमगून गेलेले असते. रात्री महाप्रसादाचा कार्यक्रम झाल्यावर धार्मिक विधी सुरू होतात. गाऱ्हाणी सुरू होतात. रयतेच्या सुखदु:खांबाबत ग्रामदेवता प्रत्येकाशी संवाद साधू लागते.आज देवाच्या पाषाणांचे थेट दर्शन होत असते. अवसरांनी परवानगी देताच दिव्यांचा उत्सव सुरू होतो. देवळीमामा मशाल पेटवतो. त्याच्या एका हातात मशाल तर दुस-या तेलाची बुधली असते. एकदा पेटलेली मशाल आता उत्सव पूर्ण होईपर्यंत विझणार नाही याची दक्षता तो घेत असतो.

देवाची तरंग स्वारी मंदिरातून बाहेर पडते. इतर मंदिरांना भेटी दिल्या जातात. देवाच्या पाषणांना तेलाची आंघोळ घालण्यासाठी ते-ते मानकरी पुढे होतात. तेलाची धार पाषाणांवर धरली जाते. मानक-यांचे आणि सेवेक-यांचे हात देवाच्या पाषाणासमोर फिरू लागतात. प्रत्येक पाषाण विलक्षण तेजाने चमकू लागते. पाषाणांना तेलाची आंघोळ घातल्यानंतर देवासमोर दिवे पेटवले जातात. एरव्ही प्रत्येक उत्सवात ग्रामदेवतांची पाषाणे वस्त्रालंकोराने सजलेली असतात. त्रिपुरारी दिवशी हे सर्व वस्त्रालंकार उतरविले जातात आणि पाषाणांना म्हाकण केले जाते. म्हाकण म्हणजे तेलाची आंघोळ. त्रिपुरारी पौर्णिमेदिवशी ही तेलाची आंघोळ झाली की पुढचे दोन दिवस पाषाणांना जसे आहेत तसे ठेवले जाते. तिस-या दिवशी चून खोब-याच्या रसाने देवाला पुन्हा आंघोळ घालून दुधाचा अभिषेक करत पुन्हा वस्त्रांलकार चढविले जातात.

पणत्यांची आरास सुरू होते. तेलाने चमकत असणा-या पाषाणांसमोर तेलाचे दिवे उजळून निघतात. आणि दिव्यांच्या रोषणाई डोळय़ांचे पारणे फिटते. मंदिरासमोरच्या दीपमाळेवरही दिव्यांची आरास लावली जाते. दिवे पेटविण्याची येथे एक परंपरा आहे. प्रत्येक दिवा पेटेपर्यंत ढोल वाजतच असतो. या भारलेल्या वातावरणातच देवाची मंदिराभोवती प्रदक्षिणा सुरू होते. त्या प्रदक्षिणेत चुरमुरे उडविले जातात. उडविलेले चुरमुरे मिळविण्यासाठी रयतेने ही झुंबड उडालेली असते. टिपर पाजळला जातो. चुरमु-यांची रास संपत जाते. दीपोत्सव उजळून निघतो. चंद्र आता परतीच्या मार्गाला लागलेला असतो. ग्रामदेवता, कुलदेवतेचा जयजयकार होत असतो. मंदिर दिव्यांच्या रोषणाईत न्हावून निघते.

आज टिपर तोच आहे. उत्सवही तसाच आहे. फरक फक्त  एवढाच पणत्यांचा आकार बदलला आहे. तिळाच्या तेलाची जागा गोडेतेलाने घेतली आहे. आता फक्त एकच मशाल पेटते. इतर मशाली पेटविण्याची गरज वाटत नाही. कारण ती जागा विजेच्या रोषणाईने घेतली आहे. हरकुळ खुर्द गावात होणा-या या टिपराच्या उत्सवाप्रमाणे थोडय़ाफार फरकाने मुलखातल्या सर्व गावांमध्ये टिपर असाच पाजळला जातो. नेरूरच्या मंदिरात कारीट कापून दिवे पेटविले जातात, आच-याच्या रामेश्वर मंदिरात कुवाळय़ाच्या दिव्यांनी रामेश्वराला ओवाळले जाते. गावाचे गावपण, सलोखा ग्रामदेवतांच्या उत्सवाने अधिकच घट्ट होत असतो. आणि उत्साहाचा प्रकाश उजळून निघतो.

कुर्ला देवीला दाखविला जातो पाठीमागून प्रसाद!

कुर्ली गावात त्रिपुरारीचा उत्सव हा गावाचा मोठा सण. या दिवशी देवीचे दर्शन घेणे म्हणजे अहोभाग्य!

यासाठी गावातल्या प्रत्येक घरात गजबज वाढलेली असते. गावातील परभागात असणारी मंडळीही घराकडे परतलेली असतात. माहेरवाशीणी दाखल होतात. दुपारी मंदिरात येणा-या प्रत्येक भाविकाला देवीचा प्रसाद दिला जातो. देवीला मात्र पाषाणाच्या विरुद्ध दिशेने प्रसाद दाखविला जातो. देवीचा म्हाळ या दिवशी घातला जातो. या दिवशी पावणादेवीच्या मंदिरात अवसर काढले जातात.आणि सर्व ‘आलावत’ मध्यरात्री टिपर पाजळण्यासाठी कुर्ला देवीच्या मंदिरात दाखल होतात. यावेळी गाभा-यातील विजेचे दिवे बंद केले जातात. आणि गाभारा पणत्यांच्या दिव्यांनी उजळून निघतो. हा उत्सव रात्रभर सुरू असतो.

त्रिपुरारी दिवशी वाढले जातात पेढय़ाएवढे वडे!

दक्षिण कोकणचा अधिपती भगवान शिवशंकराचे आत्मलिंग म्हणून प्रकट झालेले कणकवली गावचे ग्रामदैवत श्री देव स्वयंभू रवळनाथ पंचायतन देवस्थान. या देवस्थानच्या स्वयंभू मंदिरात प्रथा परंपरांनी ‘टिपर’ त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जात आहे. प्रतिवर्षी हा टिपराचा कार्यक्रम मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. श्रद्धेचे व जागृत असलेल्या ग्रामदेवतेच्या या जत्रोत्सवाची भाविक आतुरतेने वाट पाहत असतात. दिवाळीपासून त्रिपुरारीपर्यंत होणारी श्री देवतची पालखी प्रदक्षिणा आणि त्रिपुरारी पौर्णिमेची जत्रा हे या देवतेच्या कार्यक्रमातील विशेष आहे. पौर्णिमेच्या उत्सवाला सकाळपासूनच सुरुवात होते. दुपारी सर्व भक्तांना महाप्रसाद देण्याची प्रथा या मंदिरात आहे. हजारो पंगती महाप्रसादासाठी बसतात. यासाठी भोपळय़ाच्या आडय़ा असतातच..पण खास देवाचे वडे असतात पंक्तीला.. वडे तांदळाच्या पिठाचे पण अगदी हातावर दाबून तयार केले जातात. प्रसाद म्हणून प्रत्येकाला भाविकाला दिले जातात..

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version