Home महामुंबई सेल्फीमुळे टूरिस्ट फोटोग्राफर्सचा धंदा बुडीत!

सेल्फीमुळे टूरिस्ट फोटोग्राफर्सचा धंदा बुडीत!

0

प्रत्येक जण स्मार्टफोन, सेल्फी स्टिक हाती घेऊन आपापले फोटो काढत असल्याने टूरिस्ट फोटोग्राफर्सचा धंदा बुडीत निघाला आहे.

मुंबई- गेट वे ऑफ इंडिया, चौपाटी, ताज हॉटेल आदी पर्यटनस्थळे म्हणजे मुंबईची शानच. या पर्यटनस्थळांना भेट दिल्यावर आपल्यासोबत एक आठवण राहावी म्हणून प्रत्येक जण हा क्षण कॅमे-यात कैद करतो. हल्ली प्रत्येकाजवळ स्मार्ट फोन असल्याने पर्यटनस्थळाला भेट दिल्याचा सेल्फी काढतात. सेल्फी स्टिकमुळे फोटो काढणे अधिक सोयीस्कर झाले आहे. पण लोकांची ही सोय टूरिस्ट फोटोग्राफर्ससाठी गैरसोय ठरत आहे. प्रत्येक जण स्मार्टफोन, सेल्फी स्टिक हाती घेऊन आपापले फोटो काढत असल्याने टूरिस्ट फोटोग्राफर्सचा धंदा बुडीत निघाला आहे. विशेषत: ‘गेट वे ऑफ इंडिया’ परिसरातील फोटोग्राफर्सना ही चिंता अधिक सतावत आहे.

गळ्यात कॅमेरा लटकवत, पर्यटनस्थळाला मध्यभागी ठेवत पर्यटकांच्या काढलेल्या फोटोंचा अल्बम हाती घेत आणि क्षणीच फोटोची हार्ड कॉपी देणारी मशीन हाती घेऊन फिरणा-या टूरिस्ट फोटोग्राफर्सना सेल्फी आणि स्मार्टफोनची वाढती क्रेझ महागात पडत आहे. सुट्टीत, विकेन्डला बाहेर फिरायला जायचे असेल तर ‘गेट वे ऑफ इंडिया’ परिसराला बहुतांश जण भेट देतात. समुद्रकिनारा, ताज हॉटेल, दक्षिण मुंबईतील खाऊची विविध ठिकाणे, शॉपिंग हे सर्व एकाच विभागात असल्याने या ठिकाणी सतत वर्दळ असते. मुंबईकर, मुंबई बाहेरून आलेले, परदेशातून आलेले पर्यटक गेट वे ऑफ इंडियाजवळ हमखास जातात. या पर्यटनस्थळी पाऊल ठेवताच या ठिकाणी असलेले टूरिस्ट फोटोग्राफर्स प्रत्येकाला घेरतात. ‘मॅडमजी-साहबजी एक फोटो लेलो. एक फोटो का ३० रुपया’ ‘लेलो ना फोटो..अच्छी लेंगे’ असे म्हणत पर्यटकांभोवती गर्दी करतात. विविध पोझमध्ये पर्यटकांचे गेट वे ऑफ इंडियाजवळ काढलेल्या फोटोचा अल्बमही ते प्रत्येकाला दाखवतात. फार पूर्वीपासून हे फोटोग्राफर्स गेट वे परिसरात व्यवसायासाठी येतात. ग्राहकाला फोटोही झटपट मिळत असल्याने अनेक जण फोटोग्राफर्सकडून फोटो काढण्याला पसंती द्यायचे. पण आता याचे प्रमाण घटले आहे.

पूूर्वी ज्या उत्साहात, ज्या संख्येने पर्यटक फोटो काढायचे तेवढय़ा संख्येत फोटो काढले जात नसल्याचा सूर येथील टूरिस्ट फोटोग्राफर्समध्ये उमटला आहे. प्रत्येक जण ग्रुप सेल्फी काढतात किंवा स्मार्टफोन, कॅमे-याच्या सहाय्याने ताज, गेट वे, समुद्रकिना-यासह फोटो काढतात. याचा परिणाम थेट धंद्यावर होत आहे. आधी महिन्याला ९ ते १० हजार कमाई व्हायची. पण आता तीही कमी होत आहे. आधी गेट वे ऑफ इंडिया परिसरात २० ते ३० फोटोग्राफर्स असायचे; पण गेल्या काही वर्षात त्यांची संख्या १००पर्यंत वाढल्यानेही धंद्यावर परिणाम होत असल्याचे फोटोग्राफर जयचंद चौधरी यांनी सांगितले.

मी गेल्या सात वर्षापासून गेट वे ऑफ इंडियाजवळ फोटोग्राफी करत आहे. पूर्वी ज्या प्रमाणात नागरिक आमच्याकडून फोटो काढून घ्यायचे त्याचे प्रमाण आता घटले आहे. प्रत्येक जण आपल्या स्मार्टफोनने ग्रुप फोटो, सेल्फी काढतात. याचा परिणाम आमच्या धंद्यावरही होत आहे. आमच्याकडून फोटो काढून घेण्यासाठी पर्यटकांना खूप समजवावे लागते. – दीपक चौधरी, टूरिस्ट फोटोग्राफर

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version