Home Uncategorized ..आणि शेवटी पडदा उघडला

..आणि शेवटी पडदा उघडला

0

ब-याच दिवसांपासून सर्व माध्यमांतील मथळे सजवून, जागतिक अर्थकारणाची उत्सुकता वाढवणारी बातमी शेवटी एकदाची १६ डिसेंबर २०१५ या दिवशी आली.

ब-याच दिवसांपासून सर्व माध्यमांतील मथळे सजवून, जागतिक अर्थकारणाची उत्सुकता वाढवणारी बातमी शेवटी एकदाची १६ डिसेंबर २०१५ या दिवशी आली. त्या दिवशी वाढणार, वाढणार असे गाजत असलेले फेडरल रिझव्‍‌र्हने त्यांचे दर २५ बेसीस पॉइंटनी वाढवल्याची अधिकृत घोषणा झाली. या दिवसानंतरचे मथळे सजले ते परिणामांच्या बातमीने! म्हणजे माध्यमांना फरक नाही. मग कोणाला?

फेडरल रेटचा आपल्या दैनंदिन जीवनातल्या कर्जावरील व्याजदरांशी सरळ संबंध असतो. म्हणजे, वाढत्या फेडरल रेटसोबत ते वाढतात. तर शेअर बाजार, व्यावसायिक नफा, ग्राहकांची खर्च करण्याची ताकद यांच्याशी व्यस्त संबंध म्हणजेच, वाढत्या फेडरल रेटसोबत हे घटत असतात. अर्थात, आपल्या माहिती गोळा करण्याच्या आणि ती मिरवण्याच्या कौशल्यामुळे, आपण यावर तासन्तास व अगदी त्यातील दशांशापर्यंतच्या बदलाबद्दल बोलत असाल. मला त्याबद्दल अभिमानच आहे.

पण, या कौशल्य मिरवण्याच्या स्पध्रेत, आपण फेडरल रेटची व्याख्या आणि त्याचा व्यक्तिगत पातळीवर होणारा परिणाम हे मूळ व महत्त्वाचे मुद्दे समजावून घ्यायचे दुय्यम ठरवतो. आज, याच मुद्दय़ांना उजाळा देण्याचा माझा उद्देश आहे. सर्वात प्रथम, फेडरल रेट म्हणजे काय हे पाहू या. अमेरिकेतील एका ठेवीदार संस्थेने आपली राखीव शिल्लक, एका दिवसासाठी, तारणरहित तत्त्वावर, गरजू ठेवीदार संस्थेला देऊ करताना आकारलेले व्याज म्हणजेच फेडरल रेट. फेडरल रिझव्‍‌र्ह या स्वायत्त संस्थेला हे व्याज दर ठरविण्याचे पूर्ण अधिकार आहेत.

अमेरिकन सरकारच्या हस्तक्षेपापासून स्वतंत्र कारभार हाकणा-या या संस्थेला, वर्षातून दोन वेळेला सरकारला या संदर्भात संबोधावे लागते. जागतिक अर्थकारणातील या संस्थेची ताकद, त्यांना शिंक आली तर जागतिक अर्थव्यवस्थेला फ्ल्यू होण्याची शक्यता असते, या वाक्यावरून वाचकांना समजेल, अशी आशा आहे.

या फेडरल रेटच्या अति चांगल्या अथवा अति वाईट परिणामापासून आपल्या अर्थव्यवस्थेचे व बँकिंग प्रणालीचे संरक्षण करणे हेच कोणाही समोरचे सगळ्यांत मोठे आव्हान आहे. कारण, कूर्मगतीने चालणा-या अर्थव्यवस्थेस चालना देण्यासाठी व्याजदर उतरवून गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन दिले जाते. तर, वेगाने जाणा-या अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी व्याजदर चढे ठेवून गुंतवणुकीस खीळ घालावी लागते. थोडक्यात, अर्थव्यवस्थेला जत्रेतल्या गरग-या किंवा पाळण्यासारखे एका विशिष्ट वेगात ठेवले तरच त्याचा आनंद घेता येतो अथवा जनतेची फरपट निश्चित असते.

वेगाने वाढणा-या अर्थव्यवस्थेच्या पाठीवरून चलनफुगवटा, महागाईचे पिंजरेही आपल्याकडे सरकत असतात. अमेरिकी अर्थव्यवस्थेला अशा धोकादायक सापळ्यांपासून वाचवण्याची जबाबदारी फेडरल रिझव्‍‌र्हवर असते. आणि अर्थातच या जबाबदारीचे पालन करताना फेडरल रिझव्‍‌र्ह १९१३ पासून व्याज दर हे एक शस्त्र म्हणून वापरते.

व्याज दरातील बदलांसंबंधीच्या निर्णयाप्रत पोहोचण्यासाठी फेडरल रिझव्‍‌र्ह दर सात आठवडय़ांनी भेटून बाजारकलाचा अभ्यास करते. म्हणजेच दरवर्षी फेडरल रिझव्‍‌र्हच्या आठ अधिकृत बैठका होतात. या संस्थेला असे कष्ट घेत आपली जबाबदारी पार पाडताना वाचून असे वाटते की, आपणही हे अर्थकारण समजून घेण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत. त्यानंतर आपल्याला समजेल की, वाढत्या व्याजदराचे फायदे फक्त आíथक क्षेत्राला, बँक ठेवीदारांना आणि छोटय़ा व्यावसायिकांना होतात तर बेरोजगार, कमी वेतनावर काम करणारे कामगार, निर्यातदार, नव्या बाजारपेठा निर्माण करणारे उद्योग आणि करदात्यांसाठी वाढते व्याजदर तोटय़ाचा कंदील दाखवतात. पण, सद्यस्थितीत शून्याधारित फेडरल रेटचा काळ संपला, हे मान्य करून मार्गक्रमण करण्याला पर्याय नाही. एकच आशा आहे की, येत्या बारा महिन्यात ते आणखी न वाढो!

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version