Home संपादकीय विशेष लेख ‘आप’आपला विजय

‘आप’आपला विजय

0

लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर मोदी लाटेवर स्वार होत काही राज्यांत भाजपाला सलग विजय मिळाला. या विजयात उन्माद होता. सोशल नेटवर्किंग साइटवर त्याचा बोलबाला होता. नमो जप सुरू होता आणि नरेंद्र मोदी म्हणजे कोणी मसिहा आहे, असे चित्र रंगवले जात होते.

लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर मोदी लाटेवर स्वार होत काही राज्यांत भाजपाला सलग विजय मिळाला. या विजयात उन्माद होता. सोशल नेटवर्किंग साइटवर त्याचा बोलबाला होता. नमो जप सुरू होता आणि नरेंद्र मोदी म्हणजे कोणी मसिहा आहे, असे चित्र रंगवले जात होते. आता फक्त विजय आणि विजयच, पराभव दिसणारच नाही. मोदी म्हणजे विजय आणि विजय म्हणजे मोदी, असे भाजपाला वाटत होते. त्यांचा हा भ्रम होता आणि तो भ्रम दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दूर झाला. भाजपाचे हवेतील विमान आपो ‘आप’ जमिनीवर आले. त्यामुळे दिल्लीत ‘आप’ आणि भाजपा साफ असे चित्र होते. हीच संधी साधून लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेला सोशल मीडियावरील नमो जपला ब्रेक लागला आणि संधीची वाट पाहत असलेल्या नेटकरांनी व्याजासह मोदी आणि भाजपाला लक्ष्य करत त्याची परतफेड केली.

मोदीजी आगे बढो हम ‘आप’ के साथ है

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल जेवढय़ा जलदगतीने येत नव्हते त्यापेक्षा दहापट जलदगतीने या निकालांचे विश्लेषण सोशल नेटवर्किंग साइटवर होत होते. सुरुवातीपासूनच ‘आप’ने सर्वच ठिकाणी आघाडी घेतली होती तेव्हा सर्वत्र एक मेसेज फिरत होता. त्याला संदर्भ चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींचा होता. त्यांनी सर्वच निवडणुकीत केलेला प्रचार हा चर्चेचा होता. त्यानंतर दिल्ली विधानसभा निवडणुकीचा लागलेला निकाल पाहाता हा मेसेज सोशल नेटवर्कींगवर धुम करत होता. तो असा होता. ‘ब्रेकिंग न्यूज, आमच्या सोसायटीच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलावण्याचे ठरले होते.पण दिल्ली निवडणूक निकालानंतर तो बेत रद्द करण्यात येत आहे.’ त्यानंतर हसणारे बाहुले दाखवण्यात आले होते. ही तर सुरुवात होती. त्यानंतर जो काही मेसेजचा भडीमार होत होता तो अगदी दोन दिवस चालला. ‘ये दिल्ली तेरे आंगन में, नया सुरज चढनेवाला है। सुना है दस लाख के सुट पे १०० रुपये का मफलर भारी पडने वाला है।’ यात भर म्हणून की काय मोदी प्रेमींना डिवचणारा एक मेसेज व्हायरल झाला. तो असा होता. ‘दिल्ली इलेक्शन के बाद, आज एकही लगती है कमी, फेसबुक व्हॉट्सअॅप पर कही भी नही मोदी प्रेमी’ या बरोबर ‘मोदीजी आगे बढो हम ‘आप’ के साथ है।’ अशा असंख्य मेसेजची निकालावेळी धूम होती. ‘मोदी लाटेने भाजपाचा केला सुफडा साफ,’ ‘भारत स्वच्छता अभियान दिल्लीवाल्यांना येवढे आवडले की, त्यांनी झाडू घेऊन भाजपालाच साफ केले.’ ‘भाजपा झाली ऑटो पार्टी’ भाजपाला मिळालेला हा मोठा धक्का होता. त्याचा फायदा मात्र नेटकरांनी आपली खदखद व्यक्त केली.

किरण बेदी आता दिल्लीच्या नायब राज्यपाल

भाजपाने मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार किरण बेदी यांचे नाव जाहीर केले होते. प्रत्यक्षात या बाई पराभूत झाल्या. मुळात त्या आधी अरविंद केजरीवाल यांच्याबरोबरच होत्या. मात्र सत्तेसाठी त्यांनी भाजपाशी घरोबा केला. तो त्यांना जास्तच महाग पडला आणि त्याही टीकेच्या धनी बनल्या. त्यांचा पराभव झाला, याची बातमी सर्वत्र पसरताच अनेक जण हसत हसत बोलत होते. ‘चला आता बेदी मॅडमच्या घर वापसीचा मार्ग मोकळा झाला.’ येवढेच नाही तर त्या घर वापसी करणार नसतील तर काय करणार याचीही रूचकर चर्चा मंत्रालय परिसरात होताना दिसत होती. त्यात एका हुशार व्यक्तीने सुचवले ‘आता तर बेदी मॅडमवर दिल्लीचीच मोठी जबाबदारी येणार’ त्यावर ‘कोणती रे भाऊ?,’ असा प्रश्न आलाच. उत्तर होते, ‘मोदी त्यांना आता दिल्लीचे नायब राज्यपाल बनवणार. बेदी नायब राज्यपाल आणि केजरीवाल मुख्यमंत्री आणि पुन्हा एकदा युद्ध आमचे सुरू, जिंकू किंवा मरू.’

शिवसेनेला उकळय़ा फुटल्या

भाजपाचा पराभवाचा सर्वात जास्त आनंद कोणाला झाला असेल तर तो त्यांच्याच मित्र पक्ष (असे का म्हणतात हे माहीत नाही.) शिवसेनेला. भाजपा कोणत्याही राज्यात पराभूत होतील, याची वाट शिवसेना पाहत होती. जणू दिल्लीत ‘आप’ला शिवसेनेने आपले उमेदवार पुरवले असावेत, अशा खुषीत, प्रथम मिशीतल्या मिशीत आणि नंतर जाहीरपणे शिवसेना पक्षप्रमुख हसत होते. दिल्लीत ‘आप’ने बाजी मारली आणि त्याचा आनंद साजरा करायलाच जणू उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद बोलावली. आपण कसे अरविंद केजरीवाल यांना फोन करून अभिनंदन केले, हे त्यांनी सांगितले. नशीब त्यांनी ‘व्ही फोर व्हिटरी’चे दोन बोटांचे ‘साइन’ दाखवले नाही. जणू शिवसेनेचा मित्रपक्ष भाजपा नसून केजरीवाल यांचा ‘आप’ आहे. भाजपा पराभूत झाला आणि शिवसेनेला उकळय़ा फुटल्या. ही संधी शिवसेनेला तब्बल नऊ महिन्यांनी मिळाली. उद्धव ठाकरे यांच्या चेह-यावरील आनंद हा पाहाण्यासारखा होता.

शिवसेनेला आपणच विजयी झालो, असे वाटत होते आणि वाटत आहे. लोकशाही काय असते, हे ते बोलून दाखवत होते. जनता हेच सर्वोच्च स्थानी असते, त्यांना गृहित धरून नका, हे ठणकावून सांगितले जात होते. ते बोलत काही वेगळे सांगत होते पण त्यांना बहुदा ‘एक ही मारा. पर क्या सॉलीड मारा; पण केजरीवालने.’ असे सांगायचे होते. पण तसे न सांगताही सगळय़ांना कळत होते. गेल्या नऊ महिन्यांपासून म्यँव करणारी शिवसेना जणू आपणच दिल्लीची सत्ता काबीज केल्यासारखी दिवसभर उकळय़ा..सॉरी डरकाळय़ा फोडत होती. ‘खुश तो बहोत होंगे ‘आप’ अशी देहबोली शिवसेना पक्षप्रमुखांसह सगळय़ाच नेत्यांची होती. काही जण खास मराठी शैलीत भाजपाची खिल्ली उडवत होते. ‘चला हवा येऊ द्या. लाट गेली त्सुनामी आली. आता हवा येऊ द्या.’

ओबामांचा राजीनामा

दिल्लीतील भाजपाच्या पराभवाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भेटीचा किनाराही जोडण्यात आला. प्रचारादरम्यान मोदी सांगत होते. सत्तेत आल्यापासून जगात भारताचा रुबाब आणि वजन वाढले आहे की नाही, असा प्रश्न ते दिल्लीतील प्रचारसभांमध्ये विचारताना दिसत होते. त्याला उत्तर ‘हो’ असे दिले जात होते. प्रत्यक्षात मतदानानंतर मतदारांनी दिलेले उत्तर सर्वा समोर आहे. ही परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून नेटकरांच्या डोक्यातून भन्नाट कल्पना आली. त्याचीही ‘ब्रेकिंग न्यूज’ होती. ओबामा निकाल पाहत होते, असे ते चित्र होते आणि बराक ओबामा यांचा राजीनामा, असे बाजूला लिहिलेले होते.

दिल्ली निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली, असा हा संदेश जेवढा विनोदी वाटतो तेवढाच तो मार्मिक होता. तो सर्वाच्या पसंतीला ही उतरत होता. दिल्ली विधानसभा निवडणूक, प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर स्वत:चे महत्त्व वाढवण्यासाठी मोदी यांना ओबामा यांचाही फायदा झाला नाही.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version