Home मध्यंतर शोध - बोध आपत्ती व्यवस्थापनासाठी नागरी संरक्षण प्रशिक्षण

आपत्ती व्यवस्थापनासाठी नागरी संरक्षण प्रशिक्षण

1

आपला भारत देश तर दहशतवादाच्या समस्येला सातत्याने सामोरा जात आहे. ही शक्यता लक्षात घेऊनच सामाजिक सुरक्षा गरजेची आहे. सामाजिक सुरक्षेचं महत्त्व लक्षात घेऊन घरटी किमान एका माणसाने आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण घेतल्यास प्रशासनाला आणि समाजालाही त्याची फार मोठी मदत होऊ शकते. नागरी संरक्षण दलांमधून अशा प्रकारचं प्रशिक्षण मिळू शकतं.

संगणक युगात सर्वच जण घडयाळाच्या काटयापेक्षाही आपले जीवन अधिक गतिमान करण्यासाठी धावपळ करीत आहेत. सर्व ठिकाणी स्पर्धात्मक युग येऊ लागले आहे. प्रत्येक जण आपली इच्छा दुस-यावर लादण्याचा कसोशीने प्रत्यत्न करीत आहे. अत्याधुनिक अशा क्षेपणास्त्राचा साठा करण्यापलीकडे त्याच्या चाचण्या करून इतरांपेक्षा आपण सरस आहोत, असे भासवण्याकडे काही देशांचा कल आहे. अशा धावपळीच्या जीवनात कधी काय होईल, हे सांगता येत नाही. आज देशा-देशांमध्ये खेळलं जाणारं युद्ध हे ऐतिहासिक काळातील लढायांपेक्षा नक्कीच वेगळं आहे. २१व्या शतकातील लढाई रणभूमीवर लढली न जाता ती आपल्या घरापर्यंत लढली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. धर्मयुद्धं इतिहासजमा झाली. एखादा समाजकंटक रासायनिक किंवा आण्विक, जैविक अस्त्रांच्या साह्याने संपूर्ण समाजास सहज वेठीस धरू शकतो. संघटित गुन्हेगारी, अतिरेकी विचारणी व समाजविघातक घटक एक प्रकारे भीतीचं साम्राज्य निर्माण करत आहेत. यातच नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीशी सामना करण्याची आपली क्षमता कमी पडल्यास भीतीची तीव्रता वाढते. 

सामाजिक सुरक्षा आपल्या घरापासून सुरुवात होणं आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरात दक्ष राहणं गरजेचं आहे. आपल्या परिसरातील विविध प्रश्न आणि अडचणी पाहता सुख-शांती, सलोखा प्रस्थापित करण्यासाठी विविध कमिटी, मंडळांमार्फत जागृती निर्माण होणं गरजेचं आहे. यासाठी स्वत: दक्ष राहून आपले कान व डोळे शाबूत ठेवून आपल्या परिसरात अशा गोष्टी घडणारच नाहीत, यांची जागृत नागरिक म्हणून योग्य भूमिका घेणं काळाची गरज आहे. यासाठी एकमेकांचा आदर करणं, प्रतिसाद देणं, समन्वय साधणं, विचारांची देवाण-घेवाण करणं, विविध उत्सव-समारंभ यातून योग्य संवाद साधणं, चर्चा करणं, त्यातून प्रश्नांची सोडवणूक होऊन सामाजिक सुरक्षितता वाढेल. ज्याप्रमाणे दो-यामध्ये फुलं गुंफली जातात, त्यातून सुंदर, सुबक, सुवासिक गजरा निर्माण होतो, तशी गुंफण समाजामध्ये होणं अपेक्षित आहे. यातूनच आपल्या समाजाची, देशाची प्रगती होईल. समाज सुधारण्यासाठी नागरिक सुधारणं गरजेचं आहे.

मानवाने नवनवीन शोध लावले. त्याचा वापर चांगल्या कामासाठी कमी, तर विध्वंसक वृत्तीसाठी जास्त करू लागला. १६ जुलै, १९४५ रोजी न्यू मेक्सिकोतील वाळवंटात जगातील पहिला अणुस्फोट करण्यात आला. त्या प्रकल्पाचे प्रमुख होते जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. होपेन हाइमर. यानंतर सहा ऑगस्ट १९४५ व नऊ ऑगस्ट १९४५ रोजी जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणुबॉम्ब टाकण्यात आले. दहशतवादी हल्ले व अन्य आपत्तीप्रसंगी बाहेरून मदतकार्य येण्याअगोदरच आपणच आपल्या नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनासाठी सहकार्य करू शकतो. त्याचं प्रशिक्षण देऊ शकतो.

देशाची औद्योगिक राजधानी व आंतरराष्ट्रीय पातळीवर मुंबई शहराचं महत्त्व लक्षात घेता बृहन्मुंबइंचं क्षेत्रफळ ६०३ चौ. कि. मी. असून लोकसंख्येचा विचार करता संभाव्य धोके टाळण्यासाठी बृहन्मुंबई नागरी संरक्षण दलाच्या व्यवस्थापनासाठी एकूण चार क्षेत्रे, २४ विभाग व ५४० वॉर्डन पोस्ट असून २४ उपनियंत्रक केंद्रे व आगार अस्तित्वात येणार आहेत.

भारतामध्ये नागरी संरक्षणाची सुरुवात २४ ऑक्टोबर, १९४१ रोजी नागरी संरक्षण विभागाच्या निर्मितीतून झाली. १९१४ पहिलं महायुद्ध, १९३९ दुसरं महायुद्ध, १९६२ मध्ये भारत-पाकिस्तान संघर्षात झालेल्या हानीचा विचार करता १० जुलै, १९६८ ला नागरी संरक्षण कायदा संमत करण्यात आला. याद्वारे या दलातील जवानांना काही अधिकार देण्यात आले. हे दल संरक्षणात्मक, नियंत्रणात्मक आणि पुनर्वसनात्मक उपयायोजनांद्वारे परिस्थिती कशी नियंत्रणामध्ये आणायची यांचं प्रशिक्षण जिल्हा, राज्य आणि केंद्रीय पातळीवर देत असतं.

नागरी संरक्षण कामाच्या सुलभतेसाठी १५ सेवांची निर्मिती करण्यात आलेली आहे. मुख्यालय सेवा, प्रशिक्षण सेवा, क्षेत्ररक्षक सेवा, संदेशवहन सेवा, आगार आणि दळणवळण सेवा, रुग्ण सेवा, अग्निशमन सेवा, विमोचन सेवा, पुरवठा सेवा, मृतदेह विल्हेवाट सेवा, नष्ट सेवा मालमत्ता मापन, कल्याणकारी सेवा, किरणोत्सर्ग निर्मूलन सेवा, स्थलांतर सेवा यांचा यात समावेश होतो. या सेवांतर्गत ‘लालबागचा राजा’ गणपती बंदोबस्त, महालक्ष्मी मंदिर-नवरात्रोत्सव बंदोबस्त, माउंट मेरी जत्रा बंदोबस्त, निवडणूक बंदोबस्त, लोकसभा/विधानसभा सार्वजनिक निवडणूक, लातूर, उस्मानाबाद, गुजरात या ठिकाणी झालेल्या भूकंपाच्या वेळी, तसंच ओरिसात झालेल्या चक्रीवादळाच्या वेळी या दलातील जवान मदतकार्यात कार्यरत होते. ही सर्व मदतकार्य लक्षात घेता व संभाव्य (बॉम्बहल्ले, जातीय दंगल) धोक्यांना सामोरे जाण्यासाठी या दलातील जवानांना छोटी आग विझविण्याचं, लोकांच्या जीविताचं, संपत्तीचं संरक्षण करणं, देशाच्या उत्पादन केंद्रांची जपणूक करणं, दळणवळणाचे मार्ग सुरक्षित राखणं, इमारतीतून व्यक्तींची सुटका करणं, त्यांना प्रथमोपचार देणं, न फुटलेले बॉम्ब शोधणं, पोलिसांना मदत करणं अशा विविध कार्यातून स्वत:चा जीव वाचवून दुस-याचा जीव कसा वाचवता येईल याचं प्रशिक्षण या दलातील जवानांना शिस्तबद्ध व कमी वेळात ‘निष्काम सेवा’अंतर्गत देण्यात येतं. समाजातील प्रत्येकाने आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण घेतल्यास स्वत:चा जीव वाचवतानाच देशाचंही संरक्षण करण्यास हातभार लावता येईल.

1 COMMENT

  1. आपण उपरोक्त लेखा मध्ये नागरी संरक्षा बाबत महत्वाची व गरजेची माहिती दिली आहे. परंतु मुंबई येथे असलेल्या दलाबाबत कोणत्या अधिकाऱ्याला भेटावे, व प्रशिक्षणाबाबत माहिती मिळविता येईल, त्यांचे संपर्क क्रमांक याबाबत माहिती मिळाल्यास आभारी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version