Home प्रतिबिंब गोपीचंद अ‍ॅकॅडमी = भारतीय बॅडमिंटन

गोपीचंद अ‍ॅकॅडमी = भारतीय बॅडमिंटन

0

भारतीय बॅडमिंटनसाठी सध्या चांगले दिवस आहेत. युवा बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूच्या जागतिक स्पर्धेतील पहिल्यावहिल्या कांस्यपदकानंतर भारताचे भविष्यही उज्ज्वल आहे, असे म्हणायला हरकत नाही. क्रिकेटमधील आयपीएलप्रमाणे इंडियन बॅडमिंटन लीगचा (आयबीएल) प्रयोगही यशस्वी ठरला. 
भारतीय बॅडमिंटनसाठी सध्या चांगले दिवस आहेत. युवा बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूच्या जागतिक स्पर्धेतील पहिल्यावहिल्या कांस्यपदकानंतर भारताचे भविष्यही उज्ज्वल आहे, असे म्हणायला हरकत नाही. क्रिकेटमधील आयपीएलप्रमाणे इंडियन बॅडमिंटन लीगचा (आयबीएल) प्रयोगही यशस्वी ठरला. बॅडमिंटनपटूंचे यश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारताचा वाढता दबदबा यात एक समान धागा म्हणजे राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद आणि त्यांची अ‍ॅकॅडमी. आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक प्रसिद्ध बॅडमिंटनपटू म्हणून नाव कमावलेले पी. गोपीचंद हे कारकीर्दीतील दुस-या ‘इनिंग’मध्येही भारतीय बॅडमिंटनसाठी भरभरून योगदान देत आहेत. त्यामुळे गोपीचंद अ‍ॅकॅडमी = भारतीय बॅडमिंटन असे समीकरण सध्या बनले आहे.

गोपीचंद यांच्या हैदराबादमधील गोपीचंद बॅडमिंटन अ‍ॅकॅडमीने गेल्या एका तपाच्या कालावधीत अनेक प्रतिभावंत बॅडमिंटनपटू भारताला दिले. महिला एकेरीत सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू, पुरुष एकेरीत पारुपल्ली कश्यप, गुरु साइ दत्त, सौरभ वर्मा, बी. साई प्रणिथ, के. श्रीकांत, एच. एस. प्रणॉय तसेच महिला दुहेरीत प्रज्ञा गद्रे, एन. सिक्की रेड्डी आणि अपर्णा बालन आदी बॅडमिंटनपटूंचा त्यात प्रामुख्याने समावेश आहे. वरील सर्वानी जागतिक क्रमवारीत पहिल्या ५० बॅडमिंटनपटूंमध्ये स्थान राखले आहे. महिला एकेरीत सायना (चौथ्या स्थानी) तर पहिल्या दहामध्ये आहे. सिंधू (१२व्या स्थानी) आणि पारुपल्ली कश्यपने (१७व्या स्थानी) अव्वल २० बॅडमिंटनपटूंमध्ये स्थान मिळवले आहे. गुरू, सौरभ, प्रणिथ, श्रीकांत, प्रणॉय तसेच प्रज्ञा, एन. सिक्की वयाने लहान आणि अनुभवाने कमी आहेत. मात्र कारकीर्दीच्या सुरुवातीला अव्वल ५० बॅडमिंटनमध्ये स्थान मिळवल्याने भारताची दुसरी फळीही तयार आहे, असे अभिमानाने सांगावेसे वाटते. सायना, सिंधूसह भारताच्या बॅडमिंटनपटूंच्या उंचावलेल्या यशाचे सर्वाधिक श्रेय गोपीचंदला जाते. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केल्याने तसेच अनेक प्रसिद्ध स्पर्धा जिंकल्याने गोपीचंदकडे चांगला, वाईट खूप अनुभव आहे. हा अनुभव त्याला नवी पिढी घडवताना उपयोगी पडत आहे. गोपीचंदच्या अ‍ॅकॅडमीत केवळ शिकणा-यासाठी शिस्त नाही. शिकणा-यांसह प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफनेही शिस्त आणि नियमाचे पालन करणे, आवश्यक आहे. गोपीचंद अ‍ॅकॅडमीत पहाटे ४.३० ते सकाळी सहा तसेच सायंकाळी ४.३० ते सहा अशा दोन सत्रात सराव केला जातो. वर सांगितल्याप्रमाणे गोपीचंद यांनी स्वत:लाही शिस्त लावली आहे. ते स्वत: पहाटे साडेचार वाजता अ‍ॅकॅडमीत हजर होतात. त्यानंतर दिवसभर आपल्या शिष्यांना धडे देतात. शिस्तप्रिय गोपीचंदकडून अशा अनेक चांगल्या गोष्टी त्याच्या शिष्यांनी घेतल्यात. अ‍ॅकॅडमी चालवणारे आणि त्या मार्गे पैसे उकळणारे अनेक आहेत. मात्र गोपीचंद यांनी गुणी आणि प्रतिभावंत बॅडमिंटनपटू घडवण्याचे व्रत घेतले आहे.

अ‍ॅकॅडमीत प्रवेश घेतल्यानंतर तुमचा पाल्य राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकेल, असा खोटा आत्मविश्वास बाळगू नका, असे गोपीचंद प्रत्येक पालकाला आवर्जून सांगतात. ‘‘यश मिळवण्याचा कुठलाही ‘शॉर्टकट’ नाही. माझे बॅडमिंटनपटू सध्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकत आहेत. हे अनेक वर्षे केलेल्या परिश्रमाचे फळ आहे,’’ असे गोपीचंद अभिमानाने सांगतात. प्रत्येक मुलामध्ये एक ‘स्पार्क’ असतो. त्यातील हा गुण हेरण्यात गोपीचंद हे कमालीचे तरबेज आहे. पी. व्ही. सिंधूबाबतचा हा अनुभव सर्वासोबत ‘शेअर’ करण्यासारखा आहे. आठ वर्षाच्या सिंधूला घेऊन तिचे वडील रामण्णा हे गोपीचंद अ‍ॅकॅडमीत आले. सिंधूचा खेळ पाहून गोपीचंद म्हणाले की, ‘‘रामण्णा, सिंधू तुमची मुलगी आहे, हे विसरून जा. यापुढे ती माझी मुलगी आहे. मी तिला प्रशिक्षण देईन.’’ १८ वर्षीय सिंधूने कारकीर्दीच्या सुरुवातीलाच मिळवलेले उल्लेखनीय यश पाहता गोपीचंद यांनी आपला शब्द खरा करून दाखवला. मात्र सायना असो किंवा सिंधू, गोपी सरांप्रमाणे त्यांनीही खूप मेहनत घेतली. त्या मेहनतीमुळे सायनाने ऑलिंपिकमध्ये तसेच सिंधूने जागतिक स्पर्धेत पदक मिळवण्याची करामत साधली. चीन, इंडोनेशियाच्या तुलनेत भारताचे बॅडमिंटनपटू मानसिकदृष्टया कमकुवत असतात. बॅडमिंटनसारख्या वैयक्तिक खेळात सहजासहजी पराभव स्वीकारायचा नसतो. त्यासाठी तुम्ही मानसिकदृष्टया सक्षम असले पाहिजे. गोपीचंद यांनी आपल्या शिष्यांना मानसिकदृष्टया कणखर बनवले आहे.

गोपीचंद यांच्या अ‍ॅकॅडमीचे जेवढे कौतुक होत आहे, तितकीच त्यांच्या नावाने बोटेही मोडली जात आहेत. गोपीचंद हे राष्ट्रीय प्रशिक्षक असल्याने त्यांच्या अ‍ॅकॅडमीतील बॅडमिंटनपटूंनाच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राधान्य दिले जाते, असाही आरोप त्यांच्यावर झाला आहे. मात्र गोपीचंद हे कुणाला प्रत्युत्तर देण्याच्या भानगडीत पडलेले नाहीत. आपले काम चोख करणाला ते आजही प्राधान्य देतात. सायना किंवा सिंधू, माझे नाणे खणखणीत आहे, हे अवघ्या जगाला दिसले आहे, असे अप्रत्यक्षरित्या त्यांना टीकाकारांना सांगून द्यायचे आहे. नुकत्याच झालेल्या पहिल्यावहिल्या इंडियन बॅडमिंटन लीगने (आयबीएल) भारतीय बॅडमिंटनसह जागतिक स्तरावर एक ठसा उमटवला आहे. या लीगमुळे भारतीय बॅडमिंटनपटू लखपती, करोडपती झाले. ही लीग यशस्वी करण्यात गोपीचंद यांचा अप्रत्यक्षरित्या मोठा वाटा आहे. या लीगमुळे भारताच्या बॅडमिंटनपटूंना आर्थिक फायदा झालाच. मात्र त्यापेक्षा महत्त्वपूर्ण म्हणजे त्यांना अन्य देशांच्या आणि अव्वल बॅडमिंटनपटूंशी दोन हात करायला मिळाले. हा अनुभव त्यांना भविष्यात उपयोगी पडू शकतो.

गोपीचंद यांनी त्यांच्या अ‍ॅकॅडमीसह भारताच्या राष्ट्रीय प्रशिक्षकपदाची धुरा समर्थपणे सांभाळली आहे. मात्र पत्नी आणि माजी ऑलिंपियन पी. व्ही. व्ही. लक्ष्मीसह जवळचे नातलग निम्मगड्डा प्रसाद आणि आंध्र प्रदेश सरकारच्या पाठबळामुळेच त्यांना मोठी झेप घेता आली. तसेच यशस्वी प्रशिक्षक बनता आले. त्याबाबतच्या गोपीचंद यांच्या आठवणी अविस्मरणीय आहे. अ‍ॅकॅडमीची उभारणी प्राथमिक अवस्थेत असताना प्रसाद हे गोपीचंद यांच्या मदतीला धावले. त्यांनी एके दिवशी दोन कोटींचा धनादेश गोपीचंद यांना दिला. या पैशांची परतफेड मी करू शकत नाही, असे गोपीचंद यांनी त्यावेळी प्रसाद यांना सांगितले. त्यावेळी प्रसाद त्यांना म्हणाले की, ‘‘माझ्या पैशांची परतफेड करण्याची आवश्यकता नाही. भारताला ऑलिंपिकमध्ये एक सुवर्णपदक मिळवून दे.’’ भारताला अद्याप ‘सुवर्ण’ मिळाले नसले तरी सायनाच्या कांस्यपदकानंतर गोपीचंद यांनी शब्द पाळला, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. प्रसाद यांनी त्यानंतर गोपीचंद अ‍ॅकॅडमीसाठी आणखी तीन कोटी दिले. २००३ मध्ये आंध्रप्रदेश सरकारने गोपीचंद अ‍ॅकॅडमीसाठी पाच एकर (दोन हेक्टर) जमीन ४५ वर्षाकरिता मामुली भाडेतत्वावर दिली आहे.

गोपीचंद यांनी हैदराबादनंतर अन्यत्र अ‍ॅकॅडमी उघडावी, असे अनेकांना वाटते. मात्र आपल्या कार्याबाबत समाधानी असल्याचे गोपि सर म्हणतात. ‘‘माझ्या बॅडमिंटनपटूंनी जागतिक स्पर्धात पदके मिळवलीत. आणखी काय हवे. सायना किमान ६-७ तसेच सिंधू किमान नऊ वर्षे चांगले बॅडमिंटन खेळतील. एखादे पदक मिळाल्यानंतर मी त्यांना एकटे सोडू शकत नाही,’’ असे गोपीचंद यांनी सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version