Home टॉप स्टोरी आरोपींची ‘इन-कॅमेरा’ सुनावणी

आरोपींची ‘इन-कॅमेरा’ सुनावणी

0

दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पाच आरोपींना सोमवारी साकेत न्यायालयात हजर करण्यात आले.

२३ वर्षीय युवतीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाचा खटला याच साकेत न्यायालयात चालवण्यात येत आहे.

नवी दिल्ली– दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पाच आरोपींना सोमवारी दुपारी दोन वाजता साकेत न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणातील सहा आरोपींपैकी दोघांनी माफीचे साक्षीदार होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. चार आरोपींची १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर त्यांना रविवारी महानगर न्यायदंडाधिकारी ज्योती क्लेर यांच्या चेंबरमध्ये हजर करण्यात आले. त्यावेळी शिक्षेतून सवलत मिळवण्यासाठी दोघांनी सरकारी बाजूने साक्ष देण्याचा प्रस्ताव ठेवला.

यावेळी आरोपींना कायदेशीर मदतीची माहिती देण्यात आली, त्यावेळी पवन गुप्ता आणि विनय शर्मा यांनी वकील घेण्यास नकार देऊन माफीचा साक्षीदार होण्याची इच्छा जाहीर केली. राम सिंग आणि त्याचा भाऊ मुकेश यांनी मात्र कायदेशीर मदतीची मागणी केली. दरम्यान, चारही आरोपींची न्यायालयीन कोठडी १९ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली असून त्यांना पुन्हा सोमवारी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. पाचवा आरोपी अक्षय ठाकूरलाही सोमवारी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. सहावा आरोपी अल्पवयीन आहे की नाही याची वैद्यकीय खातरजमा केली जात आहे. त्याची सुनावणी तूर्तास बालगुन्हेगारी न्यायालयात होईल.

मात्र, दिल्लीमधील भयानक गुन्ह्यासारख्या घटनांमधील आरोपींना, शिक्षेतून सवलत मिळवण्यासाठी माफीचा साक्षीदार होण्याची संधी मिळणार नाही असे कायदेतज्ज्ञांना वाटते. ज्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांना पुरावे गोळा करण्यात अडचणी येत असतील अशा गुन्ह्यांमध्ये ते गुन्हेगारांना माफीचा साक्षीदार होण्यास सांगू शकतात. त्याबदल्यात गुन्हेगाराला किरकोळ शिक्षा होते किंवा होत नाही.

या प्रकरणाची पुढील सुनावणी दहा जानेवारी रोजी होणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version