Home महामुंबई आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू

0

डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत महालक्ष्मी आश्रमशाळेतील चौथीच्या वर्गात शिकणा-या एका आदिवासी विद्यार्थ्यांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याच्या संशयास्पद घटनेने सरकारी आश्रमशाळेच्या बेजबाबदार कारभाराचे पितळ उघडे पडले आहे.

डहाणू – डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत महालक्ष्मी आश्रमशाळेतील चौथीच्या वर्गात शिकणा-या एका आदिवासी विद्यार्थ्यांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याच्या संशयास्पद घटनेने सरकारी आश्रमशाळेच्या बेजबाबदार कारभाराचे पितळ उघडे पडले आहे. मयुर रामचंद्र सातवी (१०) असे या विद्यार्थ्यांचे नाव असून, महालक्ष्मी आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू होण्याची आठवडाभरातील ही दुसरी घटना आहे. विद्यार्थ्यांच्या संशयास्पद मृत्यूंमुळे आश्रमशाळेत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत पालकांत साशंकता निर्माण झाली आहे.

सरकारी आश्रमशाळांतील मुला-मुलींना अंघोळीसाठी नदीनाले अथवा ओढय़ांवर पाठवू नयेत, असे सरकारचे सक्त आदेश आहेत. मात्र सरकारी आश्रमशाळांकडून या नियमांना हरताळ फासला जात आहे. या शाळांतील विद्यार्थ्यांना केवळ कागदोपत्रीच सुविधा पुरवण्यात येत आहेत. शिक्षक-कर्मचा-यांनीही मुख्यालयी राहणे अनिवार्य असताना, या नियमांचेही उल्लंघन होताना दिसत आहे. दरम्यान, जेवण करण्यासाठी घरी जातो, असे सांगून शुक्रवारी मयुर बाहेर पडला होता. मात्र मधल्या सुट्टीत बाहेर पडलेल्या मयुरचे कपडे विहिरीच्या कठडय़ावर व मृतदेह पाण्यात आढळल्याने त्याच्या आईवडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. आदिवासी आश्रमशाळांत विद्यार्थ्यांसाठी जेवणाची व्यवस्था असताना मयुर घरी गेलाच कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांनी पोलिसात विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची तक्रार केली असली तरी मयुरच्या आईवडिलांनी मयुरचा मृत्यू संशयास्पद असल्याचे म्हटले आहे.

महालक्ष्मी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूची एकाच आठवडय़ातील ही दुसरी घटना आहे. बुधवारी याच आश्रमशाळेत सातवी इयत्तेत शिकणाऱ्या हितेश कान्या खेवरा (१२) या विद्यार्थ्यांचा मृतदेह जंगलात सापडला होता. शिक्षकांच्या म्हणण्यानुसार, सर्पदंशाने त्याचा मृत्यू झाला होता. मात्र वैद्यकीय अधिका-यांनी विष खाल्ल्याने हितेशचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली होती. या मृत्यूचे गूढ उकलत नाही, तोच मयुरचा मृत्यू झाल्याने संशयाला वाव निर्माण झाला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version