Home टॉप स्टोरी सांगली जिंकली

सांगली जिंकली

2

सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत ७८ पैकी ४० जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवणा-या काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना-भाजप आणि इतर विरोधी पक्षांना निर्विवाद मात दिली आहे.

सांगली- संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत ७८ पैकी ४० जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवणा-या काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना-भाजप आणि इतर विरोधी पक्षांना निर्विवाद मात दिली आहे. आगामी निवडणुकांमध्ये जनतेचा कौल विकासालाच मिळेल हे काँग्रेसच्या या विजयामुळे निश्चित झाले आहे.

या निवडणुकीत काँग्रेसने राष्ट्रवादीचा धुव्वा उडवला. ४५ जागा मिळवण्याचा दावा करणा-या राष्ट्रवादीला केवळ १८ जागांपर्यंत मजल मारता आली. भाजपप्रणीत स्वाभिमानी विकास आघाडीला आठ तर अपक्षांना नऊ जागा मिळाल्या. मनसेने या निवडणुकीत एक जागा मिळवत खाते उघडले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांनी येथे घेतलेल्या प्रचार सभांमध्ये राष्ट्रवादीची पोलखोल करत विकासाला कौल देण्याचे आवाहन केले होते. मतदारांनी या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद दिल्यामुळे काँग्रेसचे उमेदवार बहुतेक ठिकाणी पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होते.

महापालिका निवडणुकीत ३८ प्रभागांतील ७८ सदस्य निवडीसाठी ४२२ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यापैकी प्रभाग क्रमांक २२ मधील काँग्रेसचे उमेदवार शामराव मुळके यांच्या निधनामुळे या प्रभागाची निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने स्थगित केली. सलग पाच वेळा निवडून येणारे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष विरोधी पक्षनेते मुन्ना कुरणे यांना रिपाइंचे जगन्नाथ ठोकळे यांनी पराभूत केले. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपप्रणीत स्वाभिमानी विकास आघाडी, शिवसेना,मनसे अशी बहुरंगी लढत होती.

‘करावे तसे भरावे’

सांगली महानगरपालिकेत जनतेने काँग्रेसच्या बाजूने दिलेला कौल हा २०१४ मध्ये होणा-या निवडणुकीच्या निकालांची नांदी आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीतही सांगली महानगर पालिकेप्रमाणे मतदार कौल देतील व त्या निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसचे जास्तीत जास्त खासदार व आमदार निवडून येतील, असा विश्वास राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे. ‘करावे तसे भरावे’ या उक्तीप्रमाणे राष्ट्रवादीला मतदारांनी झिडकारले असल्याची प्रतिक्रिया त्यांनी या निकालानंतर व्यक्त केली.

मिरवणुका व जल्लोष

काँग्रेसकडे कल दिसून येताच सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात जोरदार मिरवणुका निघाल्या. काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून विजय साजरा केला.

जयंत पाटील तोंडघशी

विद्यमान महापौर इद्रिस नायकवडी यांच्या पत्नी आयेशा नायकवडी,आई हसीना नायकवडी, मुलगा अतहर नायकवडी असे तिघेजण निवडून आले. नायकवडी कुटुंबातील एकही व्यक्ती महापालिकेत दिसणार नाही अशी गर्जना करणारे राष्ट्रवादीचे नेते ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यामुळे तोंडघशी पडले आहेत.

हे हरले..

गट नेते किरण सूर्यवंशी,विरोधी पक्षनेते मुन्ना कुरणे, विजय हाबळे, शीतल पाटील, माजी उपमहापौर शेखर इनामदार, लक्ष्मण नवलाई, नंदकुमार देशमुख, महमंद मणेर, अजित दोरकर, मकरंद देशपांडे, अश्विनी कुलकर्णी माजी नगरसेवक शेखर माने, भारती दिगडे, जयश्री कुरणे

हे जिंकले..

हसीना नायकवडी, आयेशा नायकवडी, सुरेश आवटी, आशा शिंदे, राजेश नाईक, उपमहापौर युवराज बावडेकर, बाळासाहेब गोंधळी, शेठजी मोहिते

[EPSB]

सांगली महापालिका निवडणुकीत ६३% मतदान

सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरासरी ६३ टक्के मतदान झाल्याची माहिती राज्याच्या निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली आहे.

[/EPSB]

2 COMMENTS

  1. सांगली महानगरपालिका काँग्रेसकडे
    सांगली-मिरज कुपवाड महानगर पालिकेच्या निवडणूकीत काँग्रेसने बाजी मारली आहे. काँग्रेसने ४० जागांवर विजय मिळवला. तर राष्ट्रवादी काँग्रेसला १८, स्वाभिमानी विकास आघाड़ीला आठ, अपक्षांना नऊ जागांवर समाधान मानवे लागले.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक जागा जिंकून या निवडणूकीत खाते उघ़डले तर शिवसेनेला भोपाळाही फोडता आला नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version