Home प्रतिबिंब आश्वासनांमध्ये आठवलेंना गोठवले!

आश्वासनांमध्ये आठवलेंना गोठवले!

1

मागील २५ वर्षे आघाडीसोबत सत्तेची ऊब घेणा-या रिपाइंच्या आठवले गटाने शिवसेनेची कास धरत महायुतीत सामील झाले खरे, परंतु, ज्या हेतूने आठवले शिवसेनेसोबत आले, त्यांचा हेतू सफल होणं तर दूरच, रिपाइंच्या महापालिकेतील जागाही युतीच्या पदरात न पडल्याने लोकसभेत काय होणार, हेच आता आठवले कंपूला कळेनासं झालंय.

लोकसभेसाठी मोर्चेबांधणी करण्यासाठी आठवलेंनी दिवाळीपूर्वीपासूनच ‘आपटी बार’ फोडण्याचा प्रयत्न केलाय खरा, मात्र पदरात काय पडेल याची शाश्वती त्यांना स्वत:लाच नाही. त्यामुळे आठवलेंची स्थिती आता ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी झाली आहे. आज ना ते पुन्हा आघाडीकडे परतू शकत, ना ते महायुतीतून बाहेर पडू शकत.. आठवलेंना महायुतीने गोठवलं, हेच खरं !

‘एटीएम’ म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते डेबिट-क्रेडिट कार्ड वापरून पैसे काढण्याची मशिन. मात्र, सध्या या एटीएम मशिनलाही ग्रहण लागलंय. डेबिट आणि क्रेडिट कार्डचं क्लोनिंग करून स्किमिंगच्या आधारे आपल्या खात्यातील पैसे आता भलतीच माणसं काढू लागली आहेत. आपल्याला लुटलं गेलंय, हे बँकेकडून आलेल्या मेसेज किंवा ई-मेलनंतरच लोकांच्या लक्षात येतं. पण तोपर्यंत हॅकर्स मंडळी आपले खिसे कापून मोकळी झालेली असतात.

सध्या महाराष्ट्रातील राजकीय ‘एटीएम’बाबतही यापेक्षा वेगळं काही घडेल असं वाटतं नाही. हे एटीएम म्हणजे ‘आठवले, ठाकरे आणि मुंडे’! शिवशक्ती-भीमशक्तीचा नारा देत महायुती बनली. आठवलेंकडील दलित व्होट बँकेच्या डेबिट कार्डाचे क्लोनिंग करून युतीचे नेते निवडणुकीत ‘एटीएम’चा वापर करून, दलित मतं स्वत:च्या खिशात घालून सत्ता मिळवण्याची स्वप्नं बघत आहेत. आणि, त्यासाठी आठवलेंना केंद्रीय मंत्रिपदापासून विविध गाजरं दाखवली जात आहेत. मात्र, प्रत्यक्षात जागावाटपावेळी जी मंडळी एटीएम भक्कम असल्याचे दावे करताना दिसत आहेत, ती सर्व मंडळी रिपाइंसाठी किती जागा सोडतील, याची खात्री कुणालाच नाही. आणि हे सर्व होत असताना आठवले मात्र ‘एटीएम’ भक्कम असल्याचा राग केवळ आश्वासनांच्या गाजरावर आळवत बसले आहेत.

मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी रिपाइंच्या आठवले गटाने शिवसेनेची आणि पर्यायाने युतीची कास पकडली. २५ वष्रे ज्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीबरोबर संसार करून खासदारकी, मंत्रिपद आणि इतर पदे मिळवणा-या रामदास आठवलेंनी या संसारात आता रस नसल्यामुळे दुसरा जोडीदार निवडला. शिवसेना-भाजपचे हिंदुत्व दलितांना मान्य नसतानाही हा संसार थाटला गेला. आठवलेंनी जेव्हा शिवसेनेची सोबत केली, तेव्हा त्यांना राज्यसभेची जागा आणि लोकसभेच्या तीन जागा असा सौदा केल्याचे सांगितलं जातं. राजकारणात अशा सौद्यांचे लेखी करार होत नसल्याने हे सगळं होतं ते तोंडीच.

महापालिकेच्या जागावाटपात त्याची चुणूक आठवलेंना आलीच आहे. त्यातच, आठवलेंच्याच तक्रारीनुसार, सेना-भाजपने त्यांना अजून जो ‘कॉमन मिनिमम प्रोग्रॅम’ द्यायला हवा तोच दिलेला नाही. त्यामुळे, आगामी लोकसभेच्या मैदानात रणांगणात वीरश्री दाखवेपर्यंत आठवलेंना झुलवत ठेवण्याचं तंत्र वापरलं जाणार असंच दिसतंय. नुकत्याच जोगेश्वरीत बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअरच्या उद्घाटनावेळी गोपीनाथ मुंडेंनी आठवलेंचे गोडवे गात त्यांच्यावर विविध आश्वासनांची खैरात केली.

दिल्लीतील मंत्रिपदापासून विविध मधाची बोटं दाखवतानाच जागांचा हट्ट सोडावा, अशी सूचक चपराकही त्यांनी जाहीरपणे दिली. गेल्या काही दिवसांपासून आठवले लोकसभेच्या तीन जागांसाठी अडून बसले असून या जागा सुटल्या नाहीत तर वेगळा विचार करावा लागेल, असा नाराजीचा सूर आळवत आहेत, हेच त्यामागचे मुख्य कारण असावे. आता आठवलेंना जे काही मिळणार ते सेनेच्या कोटयातून. त्यामुळे मुंडेंनी जाहीरपणे आठवलेंना आश्वासनं देऊन एक प्रकारे सेनेलाच गोत्यात आणलं आहे.

भाजप आठवलेंसाठी एकही जागा सोडायला तयार नाही. त्यातच, मोदींचे नेतृत्व आठवलेंना मान्य नाही. अशा स्थितीत आठवलेंची दलित व्होटबँक हवी असल्याने ‘एटीएम’ बंद पडू द्यायचं नाही, अशा कात्रीत महायुतीचे नेते सापडले आहेत. त्यातच, भाजपने तर ‘आम्ही आठवलेंना केंद्रीय मंत्रिपद देऊ’ असं सांगतानाच जागावाटपात मात्र एकही जागा देणार नाही, असा पवित्रा घेतल्याने आठवलेंना आता सेनेबरोबरच भांडत राहावे लागणार आहे. म्हणजेच, जे पूर्वी आघाडीत व्हायचं, ते आता महायुतीत होतंय. एकूणच काय तर, या ‘एटीएम’मध्ये काहीतरी गडबड आहे, हे स्पष्ट आहे. हे मशिन सध्या जरी कार्यरत असलं तरी त्यातून ‘नोटा’ बाहेर पडताना बराच खडखडाट होतोय. त्यातच, आता बाळासाहेब नसल्याने ‘तिस-या डोळ्याची नजर’ही ‘एटीएम’च्या व्यवहारांवर राहिलेली नाही.

खरं तर हिंदुत्व, स्वतंत्र विदर्भ, आरक्षण अशा अनेक मुद्दय़ांवर आठवलेंचे सेनेबरोबर मतभेद आहेत. तरीही, किमान महापालिका निवडणुकीच्या माध्यमातून मुंबईत जम बसवू म्हणून त्यांनी महायुती केली. पण महापालिकेच्या निवडणुकीत २३पैकी केवळ एकच उमेदवार आठवलेंना निवडून आणता आला. मात्र, ज्या शिवसेनेची सत्ताच जाणार होती, ती सेना-दलित मतांमुळे पुन्हा महापालिकेतील सत्ता वाचवू शकली. आता तरी ‘एटीएम’चा फायदा जाणणारे आपल्याला दुखावणार नाहीत, असा अंदाज बांधून आठवलेंनी दक्षिण मध्य-मुंबई, कल्याण, पुणे, सातारा आणि वर्धा असे पाच पर्याय ठेवून लोकसभेच्या तीन जागांची मागणी रेटली. परंतु जागा दिल्या की त्यासाठी लागणा-या पैशांचीही मागणी होणार आणि त्याचं ओझं वाहायचं कुणी, यावरून युतीत खल सुरू झालाय. म्हणूनच ‘वापर करून वा-यावर सोडायचे’ ही जुनी ‘पँथर’साठी वापरलेली नीतीच सेनेकडून अवलंबली गेल्यास आश्चर्य वाटणार नाही.

खरं तर, आज दलित व्होट बँकेच्या जोरावर महापालिका निवडणुकीत संघटनात्मक बांधणी करून आक्रमक व कुशल नेतृत्वाच्या जोरावर नगरसेवक निवडून आणले जाऊ शकतात. परंतु आठवलेंनी आजवर मिळणा-या खासदारकीतून तसंच दोन-चार बगलबच्च्यांना मिळणा-या कोणत्या तरी पदांची खिरापतीतून स्वार्थच पाहिला. ज्या दलित जनतेने त्यांना निवडून दिले, नेतृत्व म्हणून विश्वास टाकला, त्यांना आठवलेंनी काय दिलं, हा प्रश्न तसा अनुत्तरितच आहे. तरीही, बाबासाहेबांना मानणारा हा समाज ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ हा पक्ष म्हणून आठवलेंचं नेतृत्व मान्य करतो. आजही आठवलेंनी या लोकांना संघटित करून नेतृत्व सिद्ध केलं, तर त्यांना आघाडी किंवा महायुतीच्या संसाराची गरजही लागणार नाही.

सत्तेत नाही तर किमान सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवणारा ताकदवान विरोधी पक्ष असावा म्हणून बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षाचे स्वप्न पाहिलं होतं. परंतु, आज रिपाइंचे झालेले विविध तुकडे पाहता रिपब्लिकन ऐक्य तर दूरच किमान स्वत:ची छाप उमटवणारा, बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणारा पक्षही कुठेच दिसत नाही. आधी सत्तेच्या वळचणीला राहणारा रिपाइंचा आठवले गट सध्या विरोधकांच्या वळचणीला गेलाय आणि तोही उद्या सत्तेत येण्याच्या दिवास्वप्नावर, एवढाच काय तो फरक!

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version