Home संपादकीय अग्रलेख आसा(कसा मूर्ख)राम

आसा(कसा मूर्ख)राम

1

अध्यात्म्यांच्या नजरेतून स्त्री-पुरुषांना समान मानणारे, समजणारे तथाकथित भोंदू बाबा, बुवा आणि परमपूज्य बापू वेळ येताच व्यवहारातील सामान्य पुरुषांपेक्षाही अतिसामान्य भूमिकाच मांडताना दिसतात. अध्यात्मात स्त्री-पुरुष एकच आहे. ते एकच तत्त्व आहे, असे मानणारे आसाराम बापूसारखे भोंदू प्रत्यक्षात मात्र शेवटी स्त्रीने पुरुषाचीच दासी बनून राहण्याची हीन ‘शिकवण’ देतात. बलात्कार आणि बलात्कारविरोधी कायद्याबाबत रान उठत असताना या दोन्हींसाठी स्त्रियाच जबाबदार असतात, टाळी एका हाताने वाजत नाही, अशी बेताल वक्तव्ये करून बापूने तथाकथित भोंदू बाबांची परंपराही कायम ठेवली आहे.         
आपला संबंध नसलेल्या ठिकाणी नाक खुपसणा-या, विचारले नसताना सल्ला देणा-या अतिविद्वानांना, अतिशहाण्यांना ग्राम्य भाषेत खूप छान शेलकी संबोधने आहेत. सर्वसाधारणपणे त्यांना उंटावरचे शहाणे वगैरे संबोधून त्यांच्या बाष्कळ बडबडीकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र समाजात अशा उंटावरच्या शहाण्यांची नव्हे, बेताल बडबडणा-या मूर्खाची संख्या वाढत चालली आहे आणि त्यांना डोक्यावर घेऊन नाचणा-या अज्ञानींचीही कमी नसावी, हे धोकादायक आहे. दिल्लीतील सामूहिक बलात्कारानंतर १३ दिवस मृत्यूशी झुंज देऊन अखेरीस मरण पावलेल्या ‘निर्भया’वर ओढवलेल्या परिस्थितीनंतर देशात सर्वत्र उसळलेला जनमताचा क्षोभ आजही थंडावलेला नाही. याच वेळी बालिश बहू बडबडला. अशा वाचाळवीरांनाही ऊत यावा हे संतापजनक आहे. सरसंघचालकांनी त्यांच्या बेताल बडबडीमुळे या वाचाळवीरांचे नेतृत्व स्वीकारल्याचे दिसत असतानाच संतशिरोमणी प. पू. आसाराम बापू यांनी सरसंघचालकानांही मागे टाकणारी हीन वक्तव्ये करून ते संतशिरोमणी नव्हे तर मूर्खशिरोमणी असल्याचे सिद्ध केले आहे. आसाराम बापू यांनी राजस्थानमधील भरतपूर येथे या सामूहिक बलात्कारांसंदर्भात केलेली वक्तव्ये पाहता ते ज्ञान आणि अकलेच्या बाबतीत परमपूज्य नव्हे तर ‘बिग झिरो’ अर्थात अकलेच्या बाबतीत शून्य असल्याचेच म्हणावे लागेल. ‘दिल्लीतील बसमध्ये सामूहिक बलात्काराची शिकार बनलेल्या या तरुणीने देवाचं नाव घेतलं असतं, या बलात्का-यांपैकी कुणाचा तरी हात धरून, त्याच्या पाया पडून त्याला भाऊ मानलं असतं, त्याला तिच्या अब्रूचं रक्षण करायची विनंती केली असती तर तिच्यावरचा प्रसंग टळला असता. आणि गलती एक तरफ से नहीं होती है, टाळी कधी एका हाताने वाजत नाही’, असे अकलेचे तारे या आसारामने तोडले आहेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर अर्थातच प्रसारमाध्यमांकडे संतप्त प्रतिक्रियांचा पाऊस पडला असून, आसाराम नव्हे हा तर ‘आसा(कसा मूर्ख)राम’ आहे, अशी या बापूची संभावना सुरू झाली आहे. ‘बलात्काराच्या शिक्षेसाठी कठोर कायदे करून काहीही फायदा नाही, हुंडाबळीच्या प्रकरणांमध्येही कठोर कायद्याने काहीही साध्य झालेले नाही, येथेही तेच होईल, या कायद्यांचा गैरवापर होईल आणि शेवटी दु:खी कोण होणार, या आरोपींच्या माता-भगिनीच म्हणजे महिलाच’, अशीही मुक्ताफळे समाजाला दिशाहीन करणा-या या बापूंनी उधळली आहेत. बसमध्ये पद्धतशीरपणे एका तरुणीच्या अब्रूवर घाला घालू पाहणा-या मद्यधुंद, वासनेने आंधळ्या झालेल्या कामांधांवर तिने केलेल्या, ‘भैया आप तो मेरे भाई है’, या विनवणीचा परिणाम झाला असता, तिचा आर्त आक्रोश त्यांच्या पत्थरदिल हृदयापर्यंत पोहोचला असता, असे आसाराम सांगू पाहत आहेत. बलात्काराला बळी पडलेल्या कुणाही असहाय्य महिलेचा आक्रोश कामांधांचे डोळे उघडू शकत नाहीत, विकृतीच्या थैमानाला आवरू शकत नाहीत, याची शेकडो उदाहरणे आहेत आणि दुर्दैवाने दररोज देशाच्या कानाकोपऱ्यात त्याची कुठे ना कुठे पुनरावृत्ती सुरू आहे. पण समाजाला ज्ञानामृत पाजण्याच्या नावाखाली मूर्ख बनवणा-या आसाराम बापूसारख्या बोलभांडांना हे कधीही खुपत नाही. म्हणूनच या तरुणीने तिच्यावर बलात्कार करणा-यांना भाऊ मानून विनंती केली असती तर तिची अब्रूही वाचली असती आणि जीवही वाचला असता, असे अजब तर्कट आसाराम मांडून मोकळे होतात. हे अकलेचे दिवे त्यांनी कुठल्या आधारावर पाजळले आणि ‘टाळी एका हाताने वाजत नाही.’ यातून आसाराम यांना नेमके काय सूचित करायचे आहे, याचा जाब त्यांना त्यांची भक्तमंडळी कधीच विचारू शकणार नाहीत. महिला या जन्मजात अपवित्र असतात, कारण त्यांना मासिक धर्म येत असतो, असे यापूर्वी त्यांनी म्हटल्यावरही मोठा गदारोळ झाला होता. पण त्यांची ही शेरेबाजी महिलांविषयी अतिशय हीन दृष्टिकोन व्यक्त करणारी आहे, असा विचार बापूंचा भक्तसंप्रदाय कधीच करणार नाही. कारण या बापू मंडळींना देवत्व बहाल करून या भक्तजनांनी त्यांच्या ज्ञानेंद्रिये, सदसद्विवेकबुद्धीची कवाडे सारे काही कधीचेच बंद करून घेतले आहे. यामुळेच त्यांच्या कच्छपी लागलेल्या भक्तगणांचा मतिभ्रम करून देशभरात थैमान घालणारी ही बापू मंडळी स्वत:चे उखळ पांढरे करून घेत असतात. याचवेळी या बापू, महाराज आदी मंडळींच्या आश्रमात होणारे गैरप्रकार, बलात्कार, हत्या हे मात्र बेमालूम लपवले जातात. या बापू मंडळींनी नादावलेले भक्तही असे पढतमूर्ख की, त्यांच्या डोळ्यांदेखत बापूलीला सुरू असतानाही ही जनता या गैरकृत्यांना, चाळ्यांना ‘देवत्व’ कसे बहाल करते, याची अनेक उदाहरणे आहेत. खुद्द आसाराम बापू यांच्या आश्रमात घडलेली अनेक गैरकृत्ये उजेडात आली आहेत, काही प्रकरणांमध्ये तक्रारी, गुन्हेही दाखल झाले आहेत. मात्र हे सारे लपवून या मंडळींची बुवाबाजी आणि समाजप्रबोधनाचा ढोंगीपणा त्यांना देवत्व बहाल करणा-या भक्तजनांच्या पाठबळावर सुखनैव सुरू असतो. आसाराम बापू यांना देव मानणारी मंडळीही कमी नाहीत. या बापूंचे देश-विदेशात दौरे सुरू असतात. मध्यंतरी एका दौ-यादरम्यान त्यांचे हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे वा तांत्रिक बिघाडामुळे हवेत डगमगले होते. कोसळण्याच्या बेतात असलेले हे हेलिकॉप्टर चालकाने कौशल्याने सुखरूप खाली आणले. त्याबद्दल या हेलिकॉप्टरच्या चालकाला धन्यवाद देण्याऐवजी बापूंची भक्तमंडळी, बापू कसे देवस्वरूप आहेत नव्हे देवच आहेत, म्हणूनच त्यांनी हेलिकॉप्टर सुखरूप खाली आणले आणि इतरांचा जीव वाचवला, त्यांना तर साधे खरचटलेही नाही, अशा सुरस आणि रंजक कहाण्या पसरवून मूढमतींचा भ्रम आणखी वाढवत असतात. संपूर्ण देशाला हादरवणा-या या बलात्कार प्रकरणाची सुनावणी सोमवारी सुरू झाली असतानाच आसाराम यांनी त्यांचा मूर्खपणा असा जगजाहीर केल्यावर त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक होते. या प्रतिक्रियांमधून जाहीर निर्भर्त्सना आणि छी: थू झाल्यावर एका दैनिकाकडे पाठवलेल्या खुलाशात आसाराम बापू याने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. या तरुणीने सारस्वस्त्य मंत्राची दीक्षा घेतलेली असती आणि बलात्कारी गुंडांमध्ये माझ्या सत्संगी पंथातील एक जण जरी असता तरी तिने विनवणी केल्यानंतर त्याने नक्कीच तिचे संरक्षण केले असते, असे या निवेदनात म्हटले आहे. हे सगळे ऐकल्यावर, वाचल्यावर मराठी समाज ज्ञानदेव-तुकोबा माऊलींचे रोखठोक दृष्टांत विसरून अशा बापू-महाराजांच्या भजनी लागल्याबद्दल अतीव खंत वाटते आणि भवितव्याविषयी चिंताही वाटते. गेले काही दिवस महिलांविषयी अतिशय असंस्कृत वक्तव्ये करणा-या सरसंघचालक मोहन भागवत, विश्व हिंदू परिषदेचे अशोक सिंघल यांची तळी उचलून धरणा-या भारतीय जनता पक्षाने आसाराम यांच्या वाचाळपणाने व्यथित व्हावे, यासारखा दैवदुर्विलास दुसरा नसावा. ‘विवाह हा पती-पत्नीमधील सामाजिक करार असतो. तू घराकडे बघ, माझे समाधान कर. मी तुझ्या गरजा भागवीन आणि तुझे संरक्षण करीन’, असे पती या करारात पत्नीला सांगतो, असे अकलेचे तारे तोडणा-या भागवत यांचा निषेध करावा तितका थोडाच आहे. अशा भंपक व्यक्तींमुळे समाजस्वास्थ्य डळमळीत झाले असताना चित्त भ्रमू न देता सावध राहणे यातच समाजहित सामावलेले आहे, हेच तूर्तास विचारी मनांनी ध्यानी ठेवायला हवे.

[EPSB]

‘लक्ष्मणरेषा’ ठरवताना..

गाय, धन यांच्याबरोबरच स्त्रीलाही संपत्ती मानणा-या काळात स्त्रियांवर बंधने बरीच होती. मनुष्य असूनही तिचे रूपांतर एखाद्या निर्जीव क्रयवस्तूसारखे झाले होते. त्यामुळेच साहजिकच ‘ती’चे संरक्षण ‘मालकाच्या’ हाती सोपवण्यात आले. अशा परिस्थितीत बलात्कारासारखी एखादी दुर्घटना ‘तिच्या’ बाबतीत घडली तर सगळा दोष तिच्याच माथी मारला जात असे. मात्र, आता आधुनिक जगात समानतेचे तत्त्व मानलेल्या सुसंस्कृत समाजातही तिचे ‘असणे’ […]

[/EPSB]

1 COMMENT

  1. म्हात्रे साहेबांचे कौतुक आणि अभिनंदन! खूप छान लिहिलं. अशा बापूंची पूजा कशी करायची हे खेटरांच्या दुकानात जावून कळेल!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version