Home संपादकीय तात्पर्य इराकमधील यादवीची भारताला झळ

इराकमधील यादवीची भारताला झळ

0

इराकमध्ये सध्या सुरू असलेल्या यादवीची झळ प्रत्यक्षपणे भारताला जाणवत आहे. इराकमधला संघर्ष असाच सुरू राहिला तर खनिज तेलाचा पुरवठा कमी होईल आणि पेट्रोल महाग होईल, पेट्रोलचा पुरवठा कमी होईल, अशा सा-या शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. अमेरिका हा संघर्ष शमवू शकते; पण अमेरिकेला त्यात फार रस नाही. कारण अमेरिकेच्या अर्थकारणावर आता इराकचा फार परिणाम होण्याची शक्यता नाही. पेट्रोलच्या बाबतीत अमेरिका इराकवर फार कमी अवलंबून आहे. त्यामुळे हा संघर्ष संपवण्याच्या बाबतीत अमेरिका रस घेणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीत महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारपुढे महागाईचे पहिले आव्हान इराकमुळे निर्माण होणार आहे. हा झाला अप्रत्यक्ष परिणाम. पण इराकमध्ये विविध सेवा क्षेत्रात अनेक भारतीय असल्याने भारतासाठी ही चिंतेची बाब आहे. बुधवारी पहाटे बैजी तेलशुद्धीकरण प्रकल्पावर सुन्नी दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात दोन सुरक्षारक्षक ठार झाले. त्यामुळे हा प्रकल्प बंद आहे. शियापंथीय, सरकारी सुरक्षारक्षक आणि लष्करावरील हल्ले करण्याबरोबरच आता सुन्नी दहशतवाद्यांनी तेल शुद्धीकरण प्रकल्पांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. इराकमधील सर्वात मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प हा बैजीत आहे. मोसूल शहर हे ‘आयएसआयएस’ या दहशतवादी संघटनेच्या ताब्यात आहे. या पुढे मोसूल शहरातील तेल शुद्धीकरण प्रकल्पाला लक्ष्य करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे तेथून इराकी नागरिक मोठया प्रमाणात स्थलांतर करत आहेत. चिंतेची बाब म्हणजे ‘आयएसआयएस’ या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी मोसूल येथील सरकारी प्रकल्पातील ४० भारतीय बांधकाम मजुरांचे अपहरण केले आहे. विशेष म्हणजे त्यांना कुठे ओलिस ठेवले आहे, याचा ठावठिकाणा कोणालाही लागलेला नाही. भारताचे इराकमधील माजी राजदूत सुरेश रेड्डी यांना भारत सरकारतर्फे इराकमध्ये पाठवण्यात आले आहे. मुळातच ‘आयएसआयएस’ या संघटनेनेच त्यांचे अपहरण केलेले आहे की नाही, या विषयीसुद्धा निश्चित माहिती मिळालेली नाही. वास्तविक पाहता या मजुरांना गेल्या आठवडयात सुरक्षित ठिकाणी हलवण्याची गरज होती. कारण कोणत्याही क्षणी दहशतवादी संघटना इराकमधील परदेशी व्यक्तींचे अपहरण करण्याची शक्यता जास्त होती. या मजुरांना सुरक्षित ठिकाणी हलवायला सुरुवात झाली होती. पण ही कारवाई सुरू असतानाच त्यांचे अपहरण करण्यात आले. भारतात नव्याने सत्तेत आलेल्या मोदी सरकारसमोर उभे राहिलेले हे पहिलेच आंतरराष्ट्रीय संकट आहे. हे संकट आणखी गहिरे होण्याची शक्यता दिसत आहे. तिक्रित या शहरामध्ये विविध रुग्णालयांमध्ये कार्यरत असलेल्या ४२ भारतीय परिचारिकाही अडकून पडल्या आहेत. त्यांची सुटका कशी करायची, हा एक गहन प्रश्न आहे. तिथल्या संघर्षाची तीव्रता ओळखून या ४२ पैकी १४ परिचारिकांनी भारतात परत जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु त्यांनाही सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेले नाही. इराकमधील यादवीची झळ तेथे राहणा-या भारतीयांबरोबरच इंधनाच्या तुटवडयाच्या स्वरूपात भारतालाही थेट बसणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version