Home मध्यंतर सुखदा ती ताई आहे म्हणूनी

ती ताई आहे म्हणूनी

2

प्रत्येकाच्याच घरात असं एक माणूस असतं ज्यामुळे त्या घराचं घरपण जपलं जातं. ती व्यक्ती त्या घरची कर्ती-धर्ती आहे म्हणूनच ते घर सुखदु:खाच्या प्रत्येक हिंदोळ्यावर भक्कम उभं असतं. माझ्याही घरात असाच एक भक्कम आधार देणारी व्यक्ती आहे, माझी ताई. वयानं मोठा असणारा मी तिच्या प्रत्यक्षातल्या मोठेपणाने, माणुसकीने तिच्यापुढे कायमच छोटा होतो. अशा माझ्या या ताईविषयी..

शालेय पाठय़पुस्तकात एक धडा होता. ‘पाडवा गोड झाला’ असं त्याचं शीर्षक होतं. या धडय़ामध्ये एका गरीब घरातली ताई रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या चपात्यांचे लाडू करते व आपल्या सर्व भावडांचं तोंड गोड करते. अशी एक छोटीशी कथा या धडय़ात सांगण्यात आली होती. आजपासून कित्येक वर्षापूर्वीची वाचलेली ही कथा आजही मनाच्या खोल कोप-यात घर करून आहे. त्याला कारण आहे आमची ताई. तीचं व्यक्तिमत्त्व कायम आमच्या घरासाठी अशाच प्रकारचं राहिलं आहे. ती माझ्यापेक्षा दोनेक वर्षानी लहान आहे. मात्र घरात ती मोठी व मी लहान असं काहीसं वातावरण आहे. अमूक अमूक व्यक्तीनं घर सांभाळलं, सावरलं, घरातल्या लोकांसाठी खस्ता खाल्ल्या अशा प्रकारची वाक्यं आपण नेहमीच ऐकत असतो.

आमच्या घरात त्या सा-या वाक्यांचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ताई. माझे वडील आजारी होते त्यावेळची गोष्ट. त्यांची काळजी करत आम्ही सगळे जण बोलत बसलो होतो. त्यावेळी आमच्या ताईने आमच्याकडून एक वचन घेतलं होतं. ती म्हणाली होती की, आपल्या वडिलांनी आपलं जीवन स्वाभिमानानं घालवलं. त्यांचं जाणंही अशाच स्वाभिमानानं झालं पाहिजे. कुणीही वडील आजारी आहेत, असं सांगून कार्यालयातून सुटी घ्यायची नाही. कोणाकडून कसलीही मदत घ्यायची नाही.

ज्या सन्मानाने ते जगले त्याच सन्मानाने ते गेले पाहिजेत. ती माझ्यापेक्षा लहान आहे. मात्र तिच्यात त्यावेळी इतकं धैर्य कुठून आलं माहीत नाही. बहुधा ते तिच्या व्यक्तिमत्त्वात होतं. ती अशीच घरातल्या प्रत्येक लहान-मोठय़ा प्रसंगी धीरोदात्तपणे उभी राहिली होती. घरातल्या केवळ दु:खाच्या प्रसंगीच ती सगळय़ांच्या पाठीमागे उभी राहते असं नाही. तर घरात लहान-मोठे आनंदही साजरे व्हावेत यासाठी सतत झटत असते. आमच्या वडिलांच्या अखेरच्या दिवसांत तिने त्यांची केलेली सेवा तर मी कधी कोणत्याही पुस्तकातही वाचलेली नाही. आपल्या वडिलांची सेवा करताना कधीही तिच्या चेह-यावर काही विशेष करण्याचा अभिनिवेश नसायचा. जे करायचं ते आनंदाने, असा तिचा एक वेगळाच स्वभाव आहे. माणूस कधी कधी चिडतो, रागावतो. तिच्यामध्ये मात्र आपला सगळा राग, वैताग लपवण्याचं एक जबरदस्त असं कौशल्य आहे. ते कौशल्य अशा पातळीवरचं की त्याचा हेवा वाटावा. मला वाटतं, वडिलांच्या मृत्यूसमयी तिनं हेच कौशल्य वापरून स्वत:चा ताण लपवून आम्हाला त्या प्रसंगातून बाहेर काढलं.

आजही तिने वडिलांच्या नंतर आईला सांभाळून तिनं माहेरचं घर तर सांभाळलं आहेच शिवाय तिच्या सासरीदेखील तिचं काटेकोर लक्ष असतं. कोणाला नेमकं काय हवं आहे याचे, तिचे ठोकताळे अगदी निश्चित असतात. त्यात कधी पैशाची मदत असते, कधी सल्ल्याची तर कधी समोरच्या माणसाला आवरण्याची व कधी कधी सावरण्याची.. मी घरात कमी वेळ असतो, मात्र तरीही आमच्या सर्व कुटुंबाची जबाबदारी घेणारं एक माणूस आपल्या घरात आहे याची जाणीव बाहेर काम करताना फारच उपयोगी पडते.

अशा प्रकारची ताई ही प्रत्येक घरात असावी. एका गोष्टीची मात्र खंत आहे. ती कधीच काही मागत नाही. कोणत्याही गोष्टींसाठी ती कधी रागावून बसत नाही. आला तरी तो मनात ठेवत नाही. सगळय़ांसाठी सगळं काही करताना तिच्या स्वत:च्या इच्छा-आकांक्षा काय आहेत याचा तिलाच विसर पडलेला दिसतो. मात्र तिचं वागणं, तिचं असणं आम्हा सगळय़ांसाठी खरोखरच वंदनीय आहे.

2 COMMENTS

  1. आणि आता आमच्या डायमंड ८६ *८७ या व्हात्स उप ग्रौप्द्वारे दहावीच्या वर्गातील सर्व बहिणींचे मला शुभ्भावना व शुभकामना सतत मिळत राहतात हे देखिल माझे भाग्यच म्हणावे लागेल ओम शांती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version