Home महामुंबई उत्तर मुंबईत प्रचाराची रणधुमाळी

उत्तर मुंबईत प्रचाराची रणधुमाळी

0

उत्तर मुंबईच्या सहा विधानसभा मतदारसंघांत प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सगळ्याच उमेदवारांनी मतदारराजावर आपली छाप पाडण्याचा प्रयत्न केला.

मुंबई- उत्तर मुंबईच्या सहा विधानसभा मतदारसंघांत प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सगळ्याच उमेदवारांनी मतदारराजावर आपली छाप पाडण्याचा प्रयत्न केला. प्रचार शिगेला पोहोचल्याने वातावरण ढवळून निघाले.

दहिसर मतदारसंघात शीतल म्हात्रे (काँग्रेस), शुभा राऊळ (मनसे) आणि शिवसेनेचे उमेदवार विनोद घोसाळकर यांनी आपापल्या कार्यकर्त्यांसोबत प्रचार फे-या काढल्या. भाजपच्या उमेदवार मनीषा चौधरी यांनी निरनिराळ्या हाऊसिंग सोसायट्यांमधून प्रचार केला.

बोरिवली मतदारसंघात काँग्रेसचे अशोक सुत्राळे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसमवेत मतदारसंघात गाठीभेटी घेतल्या. तसेच अशोकनगर, परांजपे स्कीम, बाभई या भागात रोड शो केला. बोरिवलीचे मनसेचे उमेदवार नयन कदम यांनी कार्यकर्त्यांसह भव्य मोटरसायकल रॅली काढली होती. चारकोप, गोराई भागात कदम यांना मतदारांनी शुभेच्छा दिल्या.

प्रचाराच्या अखेरच्या दिवशी बोरिवली मतदारसंघात शिवसेनेचे उत्तम अग्रवाल यांनी रोड शो केला. भाजपचे उमेदवार विनोद तावडे यांचा पाडाव करण्यासाठी शिवसेनेने शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. सेना-भाजप युती संपुष्टात आली आहे. तावडे यांच्याबद्दल आम्हाला मैत्रीची भावना असण्याचे कारण नाही. सेनेसमोर जो कोण आहे त्याला पाडण्याचे आम्ही ठरवले आहे, असे विनोद घोसाळकर यांनी सांगितले.

प्रचाराच्या अखेरच्या दिवशी भाजपचे उमेदवार विनोद तावडे मतदारसंघात फिरकले नाहीत, त्यामुळे बोरिवलीकरांनी नाराजी व्यक्त केली. कांदिवली मतदारसंघातही रमेशसिंह ठाकूर, मनसेचे अखिलेश चौबै यांनी ठिकठिकाणी प्रचारसभा घेतल्या.

कांदिवलीतल्या बहुसंख्य उत्तर भारतीयांवर सगळ्याच पक्षांची भिस्त आहे. काँग्रेसच्या रमेशसिंह ठाकूर यांनी मात्र प्रचारात आघाडी घेतल्याचे सांगण्यात येते.

चारकोप मतदारसंघात काँग्रेसचे भरत पारेख यांनी मतदारसंघात आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह प्रचाराचा धूमधडाका लावला. तर मनसेच्या दीपक देसाई आणि शिवसेनेच्या शुभदा गुडेकर यांनी रोड शो केला. मालाड मतदारसंघात काँग्रेसचे अस्लम शेख यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या राम बारोट यांच्यापेक्षा प्रचारात बरीच आघाडी घेतली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version