Home संपादकीय विशेष लेख उत्सवात सद्यस्थितीचेही भान हवे!

उत्सवात सद्यस्थितीचेही भान हवे!

0

सध्या श्रावण महिना सुरू आहे. श्रावण महिन्यापासून कार्तिक महिन्यापर्यंत विविध सण मोठय़ा उत्साहात साजरे केले जातात. श्रावण महिन्यात नागपंचमीपासून या उत्सवांना सुरुवात होते. उत्सवाच्या निमित्ताने सर्वजण एकत्र येतात. हे जरी खरे असले तरी असे उत्सव साजरे करताना अलीकडे त्यातील धार्मिक, सामाजिक भावना लोप पावत असून, त्यांना सार्वजनिक स्वरूपापेक्षा राजकीय महत्त्व अधिक दिले जाते, अशा भावना त्यांचे स्वरूप पाहताना सामन्यांच्या मनात निर्माण होतात.

कोणतेही उत्सव साजरे करताना माणुसकीच्या भावना जपल्या गेल्या तर ते साजरे करताना सर्वानाच एक वेगळा आनंद मिळतो. ते साजरे करताना रूढी-परंपरा आणि त्या मागील भावना याची आजच्या पिढीला माहिती होणे आवश्यक आहे. हजारो वर्षापासून साप माणसाचा मित्र आहे तरीही आपण त्याला शत्रू मानतो. साप दिसला की त्याला मारलाच पाहिजे, अशा भावना सर्वसामान्यांच्या मनात दिसतात. पण हाच साप आपल्या शेतातले उंदीर, किडे, खाऊन शेतीचे रक्षण करतो म्हणून नागपंचमीला सापाची पूजा करतात. मुंबई, ठाणे, पुणे येथे गोकुळ अष्टमीला उंच हंडय़ा बांधल्या जातात, यावेळी आपल्या दहीहंडी पुढे अधिक गर्दी जमावी म्हणून कलाक्षेत्रातील मोठमोठय़ा व्यक्तींना निमंत्रित केले जाते. उंच हंडी फोडणा-या गोविंदा पथकांना रोख रकमांची मोठमोठी पारितोषिके दिली जातात. अनेकदा हंडी फोडणा-यांचे थर कोसळतात, त्यात गोविंदा जखमी होतात. काहींना कायमचे अपंगत्व येते, अशा वेळी सुरक्षेची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेशोत्सवाला धार्मिकतेबरोबर भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाची चांगली गौरवाची पार्श्वभूमी आहे. गणपती पूजनाला सार्वजनिक स्वरूप देऊन लोकमान्य टिळकांनी लोकजागृती केली. तसा उद्देश आजच्या गणेशोत्सवात दिसत नाही.

मुंबई, पुण्याच्या बरोबरीने कल्याणातही सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. सुभेदारवाडा सार्वजनिक गणेशोत्सवाला लोकमान्य टिळकांनी भेट दिली. त्यामुळे तो शहरातील गावकीचा प्रातिनिधिक उत्सव मानला जातो. पण आता तशी परिस्थिती राहिली आहे का? ठरावीक विचारांच्या व्यक्तींची मंडळेच व्यवस्थापनात दिसतात. एक स्मरणिका, विशिष्ट कार्यक्रम एवढेच अलीकडे सुभेदारवाडा मंडळाचे स्वरूप दिसते. याला गावकीचा गणेशोत्सव म्हणायचा का? रामबागेत शिवसेनेचे विजय साळवी यांचा गणपती उत्सव वादग्रस्त देखाव्यांमुळे नेहमीच चर्चेचा विषय होतो. विजय साळवी यांनी आपल्या सजावटीचे वैशिष्टय़ कायम राखले आहे ते म्हणजे, देखाव्यात शिवकालीन राजकीय प्रसंग घेतात. अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील विषयांवरील किवा सध्याच्या राजकारणातील प्रसंग जर दाखवले तर त्यात वावगे काय आहे? शिवकालीन इतिहासातील सत्य कितीही कटू असले तरी त्याची माहिती आजच्या पिढीला होणे गरजेचे आहे, ते जर शासनाला मान्य नसेल तर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे जी व्याख्याने देतात किंवा जो सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात, त्यामुळे धार्मिक भावना दुखावत नाहीत का? असा विचार कुणीच करत नाही. कल्याणात पूर्वी वाडा संस्कृती असताना मुलांचे मेळे निघत लहान मुले टिप-या घेऊन वाडय़ातील गणपतींपुढे गाणी म्हणत. मध्यंतरीच्या काळात सार्वजनिक गणपतीबरोबरच घरगुती गणपतीपुढे सजावटी करीत त्यात दत्तुदादा लोहार (पिंपळे) बाळू परदेशी, देवजीशेट मगर, प्रकाश साउंड सव्‍‌र्हिसचे जाधव बंधू, हजारे अशी मंडळी निरनिराळे विषय घेऊन सजावतील मूर्तीच्या हालचालींतून धार्मिक प्रसंग सादर करीत. ते पाहण्यासाठी कर्जत, कसारा, ठाणे तसेच ग्रामीण भागातून मोठय़ा संख्येने भाविक येत. रात्रभर सजावटी पाहण्याचा आनंद घेत.

कल्याणात पूर्वी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची मेळा संघ ही संस्था होती. आजही ती आहे, पण त्यात फक्त सात ते आठ गणपती असून त्यांचे एकादशीला विसर्जन होते. त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त नेमावा लागतो. आज या मेळा संघाची खरोकर गरज आहे का? सार्वजनिक गणपती महासंघ ही दुसरी संस्था सध्या चांगल्या प्रकारे कार्यरत असून त्यात शहरातील सर्वच सार्वजनिक मंडळे मोठय़ा संख्येने दिसतात. त्यांचे अनंत चतुर्दशीला गणेश घाटावर विसर्जन होते. गणेश घाटावर विसर्जनासाठी कोळी समाजातील मंडळी तसेच कल्याण अग्निशामक दल, विविध महाविद्यालयांतील छात्रसेनेचे विद्यार्थी यांचे मोठे सहाय्य होते. उल्हास नगरात गणेश विसर्जनाची स्वतंत्र व्यवस्था नसल्याने तेथील गणपतीही कल्याणात येतात, त्यातील काहींच्या बेशिस्त वागणुकीमुळे गणेश विसर्जनात व्यत्यय येतो, शिवाय कायदा-सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होतो. आपसात वाद निर्माण होतात.

गणेशोत्सवात अलीकडे ज्या सजावटी केल्या जातात किवा शाडूच्या ऐवजी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवतात, त्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे, यामुळे गणेशोत्सव साजरा करताना या गोष्टींचे सर्वांनीच भान राखले पाहिजे.

कल्याणातील सर्वच रस्ते खड्डेमय आहेत. पाऊसही अद्याप पूर्णपणे थांबलेला नाही. शहरातील, ग्रामीण भागातील रस्ते बुजवण्याचे नाटक महापालिका प्रशासन उत्तम प्रकारे पार पाडीत आहे अशीच एकूण स्थिती पाहता म्हणता येते. महापालिका प्रशासनाची आणि नगरसेवाकांचीही तशी मानसिकता दिसत नाही. शिवाय रस्त्यात गणपती मंडप बांधणे, धार्मिक कार्ये, भांडाराच्या नावाने महाप्रसादाचे वाटप करण्यासाठी रस्ते बंद करणे, यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होते. त्याचा सामान्य नागरिकांनाच त्रास होतो. सध्या सर्वत्र दहशतीचे वातावरण आहे. निरनिराळ्या कारणांनी आंदोलने होत आहेत. याची सर्वानी दखल घेतली पाहिजे. गणेशोत्सव साजरा करताना त्यात धर्म, पंथ, पक्ष, जात-जमातीचे बंधन न ठेवता तो ख-या अर्थाने धर्म रक्षण करणारा, माणुसकी जपणारा व प्रबोधन करणारा कसा होईल, याची काळजी घेतली तर केवळ गणेशोत्सवच नव्हे तर सर्व उत्सव साजरे करण्याचा सर्वाना आनंद घेता येईल.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version