Home महामुंबई मेट्रो आली

मेट्रो आली

1

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावरील प्रस्तावित मुंबई मेट्रोची गेल्या काही वर्षापासून सुरू असलेली प्रतीक्षा अखेर संपली आहे. रविवारी आठ जूनपासून गारेगार एसी मेट्रो दुपारी बरोबर एक वाजता प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल.

मुंबई– वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावरील प्रस्तावित मुंबई मेट्रोची गेल्या काही वर्षापासून सुरू असलेली प्रतीक्षा अखेर संपली आहे. रविवारी आठ जूनपासून गारेगार एसी मेट्रो दुपारी बरोबर एक वाजता प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल, असे ‘मुंबई मेट्रो वन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय मिश्रा यांनी शनिवारी जाहीर केले.

विविध रंगांचा साजल्यायलेली ही मेट्रो वसरेवा ते घाटकोपर हे १२ किमीचे अंतर अवघ्या २१ मिनिटांत कापणार आहे. त्यामुळे रोजच्या लोकलच्या गर्दीतून दिलासा मिळण्यापेक्षाही पूर्व-पश्चिम उपनगरांसाठी आणखी एक ‘सेतू’ आणि बेभरवशाच्या बेस्टवर अवलंबून राहणे काही अंशी तरी कमी होणार आहे. त्याचबरोबर, जगातील अनेक मोठया आणि भारतातील मोजक्याच शहरांच्या बरोबरीने आता मुंबईतील मेट्रो ओळखली जाईल.

प्रवासाचा वेळ झाला कमी

पूर्वी घाटकोपरवरून अंधेरीला जाण्यासाठी बस किंवा इतर कोणत्याही वाहनाने तब्बल एक ते दीड तास लागत होता. मात्र, मेट्रो रेल्वेने केवळ २१ मिनिटांत हे अंतर कापता येणार असल्याने प्रवाशांच्या वेळेची मोठी बचत होणार आहे.

सकाळी १० वाजता उद्घाटन झाल्यानंतर दुपारी एक वाजता ही गाडी प्रवाशांच्या सेवेत येईल. सकाळी साडेपाच ते रात्री १२ वाजेपर्यंत मेट्रो धावणार आहे. सुरुवातीला एका महिन्यासाठी या गाडीचे तिकीट १० रुपये असेल. मात्र एका महिन्यानंतर प्रवाशांना १० ते ४० रुपये मोजावे लागण्याची शक्यता आहे. पत्रकार व मुंबई मेट्रो कंपनीच्या अधिकारी-कर्मचा-यांच्या कुटुंबीयांनी शनिवारी मेट्रोची सफर केली. डीएननगर स्थानकावर उभ्या असलेल्या विविध रंगांतील मेट्रोचे स्वयंचलित दरवाजे बरोबर १२.४५ वाजता उघडताच या बहुप्रतीक्षित सफरीसाठी सज्ज असलेल्या पत्रकारांनी आपापल्या जागा पकडल्या. हॉर्न वाजला आणि मेट्रो घाटकोपरच्या दिशेने निघाली. छायाचित्रकारांचे कॅमेरे, पत्रकारांचे मोबाइल क्लिक झाले. मेट्रोच्या खाली वसलेल्या वसाहतीतील रहिवाशांनीही हात उंचावून मेट्रोचे स्वागत के ले. पत्रकारांनी मेट्रोच्या पहिल्या प्रवासातले फोटो कॅ मेराबंद करताना त्यांच्या चेह-यावरचा उत्साह स्पष्ट दिसून येत होता.

मेट्रोचे तिकीट दर वादात

मेट्रो अ‍ॅक्ट लागू होण्यापूर्वी राज्य सरकारने मेट्रोचे दर बेस्टच्या दीडपट म्हणजे ९ ते १३ रुपयांपर्यंत ठरवले होते. मात्र मेट्रो अ‍ॅक्ट लागू झाल्यानंतर तिकीट दर ठरवण्याचे अधिकार मुंबई मेट्रो कं पनीला असल्याने यात वाढ करणार असल्याचे संकेत मेट्रो कंपनीने दिले होते. साधारणत: १० ते ४० रु पयांपर्यंत हे दर मेट्रोने ठरवलेही होते. मात्र, राज्य सरकारला हे महागडे दर मान्य नव्हते. तरीही मुंबई मेट्रो कं पनी मेट्रो अ‍ॅक्टचा आधार घेत सुरुवातीचे दर आम्हीच ठरवणार यावर ठाम राहिली. शुक्रवारी रेल्वे बोर्डाने प्रमाणपत्र दिल्याने मुंबई मेट्रो कंपनीने एका रात्रीत दर ठरवून उद्घाटनाचीही तयारी केली.

उद्घाटन कोण करणार?

शनिवारी मेट्रो सुरू होणार हे जाहीर करताना या प्रकल्पातील प्राधिकरण म्हणून महत्त्वाचा भाग असलेल्या एमएमआरडीए व राज्य सरकारला मुंबई मेट्रोने दूर ठेवले. सरकारने ठरवलेले ९ ते १३ रुपयेच दर असावेत अन्यथा उद्घाटनाला येणार नाही, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितल्यावरही मुंबई मेट्रो कंपनी आपल्या मतावर ठाम राहिली. अखेर वाद वाढेल असे लक्षात आल्यावर पहिल्या महिन्यासाठी १० रुपये त्यानंतर दर कधीही वाढू शकतात असे मुंबई मेट्रोने जाहीर केले. उद्घाटनासाठी मुख्यमंत्री आले नाहीत, तरी मेट्रोची सुरुवात होईल, असाच सूर मुंबई मेट्रो कंपनीच्या अधिका-यांचा होता. दरम्यान, मेट्रोचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार का, या पत्रकारांच्या प्रश्नाला कं पनीच्या अधिका-यांनी शेवटपर्यंत उत्तर देण्याचे टाळले. त्यामुळे उद्घाटन कोणाच्या हस्ते हा प्रश्न अधांतरीच राहिला.

किरीट सोमय्यांची श्रेयासाठी धडपड

मुंबई मेट्रो कंपनी शनिवारी मेट्रोच्या प्रारंभाबाबत घोषणा करणार असल्याचे माहीत असूनही किरीट सोमय्या यांनी आपण स्वत: घाटकोपर स्थानकात मेट्रोचे उद्घाटन करणार असल्याचे सांगत सुटले होते. दरम्यान, सोमय्यांकडून बेकायदा उद्घाटन केले जात असल्याची माहिती मिळताच घाटकोपरमधील काँग्रेसचे नगरसेवक प्रवीण छेडा यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी त्यांचा तीव्र विरोध केला.

अशी असेल मेट्रो

>प्रत्येक गाडीला चार डबे
>प्रत्येक डब्याला आठ स्वयंचलित दरवाजे
>स्टेनलेस स्टीलचे डबे
>गाडी चालवण्यासाठी ६२ पायलट
>त्यामध्ये आठ महिलांचा समावेश
>आपत्कालीन प्रसंगात हॉट लाइनची सोय
>डब्यात व स्थानकांत सीसीटीव्ही कॅमेरे
>प्रत्येक स्थानकावर सुरक्षेसाठी विशेष सुरक्षारक्षक व श्वानपथक
>स्थानकांवर लिफ्ट आणि सरकत्या आणि साध्या जिन्यांची सोय
>एकूण प्रवासी क्षमता – १५००
>एका डब्यात – ३७५
>आसनक्षमता – प्रत्येक डब्यात ४८
>सरासरी वेग – ताशी ३३ किमी.
>महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव आसन व्यवस्था

1 COMMENT

  1. पहिला नक्की करा कि अंबानी कोणाचा जावाई आहे तो ! त्यानंतर ठरवा लोकांकडे जायचे कि कोर्टात ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version