Home कोलाज उपचारासाठी जयंती साजरी करणारे आपण सर्वच..

उपचारासाठी जयंती साजरी करणारे आपण सर्वच..

1

बाबासाहेबांच्या जन्माला येत्या मंगळवारी १३४ वर्षे होतील. एका प्रकांड पंडिताचा हा जन्मदिवस १४ एप्रिल १८९१. काळ झपाटय़ाने निघून गेला. पण काळावर पाय देऊन जे चिरंजीव झाले, त्यात या देशात छत्रपती शिवाजी, त्यानंतर महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर.

बाबासाहेबांच्या जन्माला येत्या मंगळवारी १३४ वर्षे होतील. एका प्रकांड पंडिताचा हा जन्मदिवस १४ एप्रिल १८९१. काळ झपाटय़ाने निघून गेला. पण काळावर पाय देऊन जे चिरंजीव झाले, त्यात या देशात छत्रपती शिवाजी, त्यानंतर महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर.

जगात मार्टिन, लुथर किंग, राजा राममोहन रॉय, नेल्सन मंडेला काळाच्या ऊरावर पाय देऊन आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारी अशी माणसे थोडी असतात. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी हे दत्तात्रेय या देशाचे मानबिंदू. घटना त्यांनी बनवली. एका व्यक्तीला एक मत त्यांनी दिले. जग थक्क होईल, अशी प्रकांड पांडित्याची भेट बाबासाहेबांची. प्रतिकूल परिस्थितीवर मात कशी करता येऊ शकते.

धर्म आणि जातीच्या विळख्यांविरुद्ध, सगळय़ा लाटांच्या विरुद्ध पोहत या बलदंड ज्ञानपुरुषाने देशातल्या कोटय़वधी जनतेला नवा रस्ता दाखवला. कल्पना तरी करू शकतो का आपण. ज्यांचे वडील पीडब्ल्यूडीत एक साधे सेवक त्या रामजी सकपाळच्या घरात एक महाकाय भीम जन्माला येईल आणि जगाचे डोळे दीपवेल.

लहानपणी वर्गात पाटी-पुस्तक घेऊन वेगळे बसायला लागलेल्या या भीमाला सतावणारा प्रश्न होता की, मला वेगळे का बसवतात? त्या छोटय़ा मुलाचा दुसरा प्रश्न होता, गावच्या विहिरीवर सगळ्यांना पाणी मिळते मग आम्हाला पाणी का मिळत नाही?

वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी हे प्रश्न विचारले आहेत. ते प्रश्न ऐकूनच या विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेची चमक विलक्षण आहे, हे त्यांचे शिक्षक आंबवडेकर गुरुजी यांना जाणवले होते. या विद्यार्थ्यांचा बौद्धिक  कोंडमारा होत आहे आणि म्हणून याच गुरुजींनी भीमा रावजी सकपाळ हे त्यांचे नाव बदलून भीमराव रामजी आंबेडकर असे त्यांचे नवीन नामकरण केले. याच काळात त्यांचे आणखी एक शिक्षक कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांनी बुद्ध चरित्र्याचे एक पुस्तक बाबासाहेबांना भेट दिले आणि हे पुस्तक भेट मिळाले होते मॅट्रिकच्या परीक्षेत दलित समाजाचा एक विद्यार्थी प्रथम वर्गात उत्तीर्ण झाला या आनंदाने.

बाबासाहेबांनी पुढे बौद्ध धर्म स्वीकारला. त्याची मानसिक तयारी मॅट्रिकच्या परीक्षेनंतर त्यांना भेट मिळालेल्या बुद्ध चरित्रातून झालेली होती आणि इथूनच पुढे त्यांच्यातल्या प्रकांड पांडित्याची झलक जगाला दिसून आलेली आहे. बाबासाहेब एका समाजाचे नेते नव्हते. एका जातीचे नेते नव्हते. या देशाच्या पांडित्याचे ते प्रतीक होते. त्यांच्यामुळेच या देशाची घटना लिहिली गेली. ते केंद्रीय मंत्रीही होते, ही त्यांच्या कर्तृत्वाच्या दृष्टीने फार छोटी गोष्ट आहे.

भारताची घटना बाबासाहेबांनी लिहिली ही या देशाकरिता सगळ्यात मोठी अमूल्य अशी भेट आहे. ९ डिसेंबर १९४६ ला घटना समितीची पहिली बैठक झाली. या घटना समितीची एकूण अकरा अधिवेशने झाली. घटना मसुदा तयार करताना ११४ दिवस बाबासाहेबांनी खर्ची घातले.

घटना मसुद्यात ३९५ कलमे आणि आठ परिशिष्टे बाबासाहेबांनी घातली. ७ हजार ३६५ उपसूचना आल्या होत्या. त्या प्रत्येक उपसूचनेचा अभ्यास करून बाबासाहेबांनी २ हजार ४७३ उपसूचना चर्चेसाठी स्वीकारल्या. त्यातून निर्माण झालेली घटना बाबासाहेबांनी या देशाच्या हातात दिली आणि ती घटना लिहीत असताना त्यांनी दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या महत्त्वाच्या गोष्टींमध्ये व्यक्तिपूजेपासून या देशाने अलिप्त राहावे, असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. या देशाच्या राजकारणात भक्ती किंवा व्यक्ती महात्म्य ही भावना जेवढे थैमान घालते, तेवढे जगातील कोणत्याही देशात स्तोम माजवले जात नाही.

दुसरी महत्त्वाची गोष्ट बाबासाहेबांनी स्पष्टपणे मांडली आहे की, सामाजिक विषमता कायम राहिली तर हा देश उद्ध्वस्त होईल. त्या घटना समितीत बोलताना बाबासाहेबांनी किती व्यापक विचार मांडलेले आहेत. लोकशाहीचे अस्तित्व अभंग ठेवायचे असेल तर जी महत्त्वाची गोष्ट या देशाला करावी लागेल ती म्हणजे राजकीय लोकशाहीतून सामाजिक लोकशाही निर्माण करण्यासाठी या देशाला झटावे लागेल.

सामाजिक लोकशाही म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर देताना बाबासाहेबांनी सांगून टाकले आहे की, सामाजिक लोकशाही म्हणजे स्वातंत्र, समता आणि बंधुता. ही तीन तत्त्वे एकमेकांपासून अलग केली तर लोकशाहीचे जीवनसत्त्व नष्ट होईल. समतेपासून स्वातंत्र्याला अलग करता येणार नाही आणि स्वातंत्र्यापासून समतेला अलग करता येत नाही. त्याचप्रमाणे स्वतंत्रता आणि समता यांना बंधुत्वापासून अलग करता येत नाही.

बाबासाहेबांनी एक अत्यंत महत्त्वाचा इशारा त्याचवेळी देऊन ठेवला आहे. जो आज खरा झाल्यासारखे जाणवत आहे. स्वातंत्र्याच्या जोडीला समता नसेल तर नुसते स्वातंत्र्य मूठभर लोकांची सत्ता सर्वावर प्रस्थापित करू शकेल. जे आज जवळ जवळ घडत आहे. समतेच्या जोडीला स्वातंत्र्य नसेल तर नुसती समता वैयक्तिक कर्तृत्व शक्तीची ज्योत मालवून टाकेल.

बाबासाहेबांनी त्या काळात दिलेले इशारे म्हणजे समुद्रातल्या दीपस्तंभासारखे आहेत. त्यांच्या या स्पष्टवक्तेपणाने भारताच्या लोकशाहीचे जे विश्लेषण करून ठेवले आहे ते अधिक महत्त्वाचे आहे. ‘काही थोडक्या लोकांनी राजकीय सत्ता गाजवण्याची मिरासदारी पुष्कळ काळ भोगलेली आहे. बाकीचे बहुजन लोक हे सत्ताधीश लोकांच्या आज्ञेत राहून कसेबसे जीवन कंठणारे गरीब लोक आहेत.

काही लोकांच्या राजकीय मिरासदारीमुळे बहुसंख्य लोकांना आपली सर्वागीण उन्नती करून घेण्याची संधी कधीच मिळालेली नाही. सत्ताधीशांच्या टाचेखाली चेंगरलेले हे लोक आता दुस-याच्या वर्चस्वाला कंटाळलेले आहेत. बहुजन लोकांचा स्वाभिमान जागा होणार आहे. तिचे रूपांतर वर्ग कलाहात किंवा वर्ग युद्धात होता कामा नये. तसे केले तर देशात बेकी निर्माण होईल. तसे झाले तर देशाचा तो घातवार असेल.’

बाबासाहेबांनी हे जे विश्लेषण केलेले आहे. त्यामध्ये सर्वाधिक अत्यंत महत्त्वाचा असा जो भाग आहे, तो स्पष्ट करताना त्याची जाणीव करून दिली आहे की, ‘घटनेनंतर जे राज्य आपण चालवणार आहोत, ते राज्य लोकांचे आहे की लोकांनी चालवलेले आहे, हे पाहायला लोक फारसे उत्सुक नाहीत.

लोकांनी चालवलेले आणि लोकांसाठी चालवलेले राज्य या तत्त्वाची मूर्ती आपण या घटना मंदिरात प्रस्थापित केलेली आहे. ते घटना मंदिर आपल्याला जर पवित्र वातावरणात ठेवायचे असेल तर मला असे स्पष्ट सांगावेसे वाटते की, लोकांनी चालवलेल्या राज्यापेक्षा लोकांसाठी चालवलेले राज्य अधिक चांगले ठरेल.

चांगले राज्य चालवण्याचा मला यापेक्षा दुसरा मार्ग दिसत नाही.’ इतक्या स्पष्ट शब्दांत घटना समितीच्या बैठकीत बाबासाहेबांनी आपली मते मांडलेली आहेत. त्यामुळे स्वतंत्र, समता आणि बंधुता ही तत्त्वे अलग केली तर लोकशाहीचा गाभा नष्ट होईल, हे बाबासाहेबांनी आटापिटा करून सांगितलेले आहे.

एवढय़ा या महान सामाजिक क्रांतिकारकाने आपल्या आयुष्याचा होम केल्यानंतर त्यांना अपेक्षित असलेली सामाजिक समता आपण खरंच निर्माण करू शकलो आहोत का? पानवठय़ावर आज जात शिल्लक राहिलेली नाही. हॉटेलमध्ये, शाळा-कॉलेजामध्ये, प्रवासात जात विचारली गेली नाही तरी मनातून जात गेली आहे का? या प्रश्नाचे उत्तर प्रामाणिकपणे किती लोक देऊ शकतील. चवदार तळ्यातले पाणी बाबासाहेबांनी उचलले आणि ओंजळभर पाणी सामाजिक समतेचा संदेश देऊन गेले.

१९२७ साली बाबासाहेबांनी ओंजळभर पाणी उचलल्यामुळेच १९३० साली साबरमतीच्या किनाऱ्यावर महात्मा गांधींनी मूठभर मीठ उचलले. ओंजळभर उचलेले पाणी आणि मूठभर उचललेले मीठ यामधला सामाजिक आणि राजकीय समतेचा दोघांचा आग्रह नंतर राज्यकर्त्यांना किती समजला? आमच्या मनात अजून अहंकार शिल्लक आहेत की नाही? गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात घडलेल्या भीषण घटना पाहिल्या, वाचल्या आणि ऐकल्या की स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे शब्द वांझोटे वाटू लागतात.

मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या निमित्ताने आम्ही जातीय दंगल घडवू शकतो. मुस्लीम समाजाविरुद्ध दंगल करताना आम्ही हिंदू असतो आणि दलितांविरुद्ध दंगल घडताना आम्ही ‘सर्वण’ बनतो. एकाच व्यक्तीची अशी अनेक रूपे समता, स्वातंत्र्य आणि बंधुता याचा मेळ घालत नाहीत. बाबासाहेबांनी दिलेला समतेचा संदेश हा उमाळा होता. आमच्या समतेची कृती ही उबळ आहे.

व्यवहारातील जात अदृश्य होत असताना मनातल्या जातींचे धुमारे अजून विझलेले नाहीत. अजूनही निवडणुकीचे तिकीट वाटप करताना सगळे राजकीय पक्ष दोन प्रश्न विचारतात, ‘तुझ्या जातीची मते किती?’ आणि दुसरा प्रश्न असतो तो ‘तू किती पैसा खर्च करू शकशील?’ आणि हे प्रश्न विचारत असताना ‘निवडून येण्याचा निकष’ हे असे जातीभोवती फिरत राहतात.

बाबासाहेबांची १३४वी जयंती दोन दिवसांनंतर साजरी करताना, त्यांच्या फोटोला हार घालताना त्यातला उपचार किती, नाईलाज किती, दांभिकपणा किती आणि मनापासून बाबासाहेबांना आपण स्वीकारले किती याचे उत्तर मात्र मिळत नाही. जातीचे प्रश्न त्यामुळेच राहिले. अत्याचार त्यामुळेच होत राहिले. खरलांजी ते सोनई त्याच विकृतीतून घडले. प्रश्नांची उत्तरे बाबासाहेबांनी देऊन ठेवली असताना आम्हाला ती उत्तरे नको आहेत, आम्हाला फक्त उपचारासाठी जयंती साजरी करायची आहे.

* या लेखातील घटना समितीविषयीचे संदर्भ बाबासाहेबांनी घटना समितीत केलेल्या भाषणातून घेतले आहेत.    

1 COMMENT

  1. भारत देश हा मुर्ख लोकांचा देश आहे. म्हणून विदेशी लोक म्हणतात. इडियेत लोकांचा देश इंडिया त्या देशातील राजकारणी बहुसंख्य भारतीयांना मुर्ख बनवून विदेशातील भंगार खरेदी करून कमिशन खावून गब्बर झाले आहेत.शेवठी राम नाम सत्य आहे.राम नामाचा तुन्तुना वाजवून नरेंद्र मोदी विदेशी भंगार खरेदी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version