Home कोलाज एक कुत्ते की मौत

एक कुत्ते की मौत

0

वेळ रात्रीची एक दीडची. त्या हायवेवर गाडयांचीही वर्दळ कमी झालीय. दुरून कुठून तरी कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज अन् मध्येच तुफान सुसाट जाणा-या गाडयांचा आवाज.

वेळ रात्रीची एक दीडची. त्या हायवेवर गाडयांचीही वर्दळ कमी झालीय. दुरून कुठून तरी कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज अन् मध्येच तुफान सुसाट जाणा-या गाडयांचा आवाज.
हाय-वेच्या अलीकडे दाट वस्ती.
पलीकडचा भाग ओसाड. काळोखातही हा भाग जास्तच काळाकुट्ट वाटतोय.
एखादं प्रेत पडल्यागत शांत वाटतोय.
आता दोनेक तरी वाजले असावेत.
अलीकडच्या सगळ्या टॉवर्समध्ये अंधार.
जणू काही सगळ्यांनाच गाढ झोप लागलीय.
अन् अचानक हायवेवर गाडीवाल्याने करकच्चून ब्रेक मारल्याचा मोठा आवाज काळोख चिरून टाकतो. पाठोपाठ एक मोठी किंकाळी..
पुन्हा गाडी सुरू झाल्याचा आवाज..
आता गाडी दूरवर निघून सुद्धा गेली.
टॉवरवासीय अजून गाढ झोपेतच.
पाचेक मिनिटांनंतर कुणी तरी वेदनेनं कळवळतोय.
रस्त्याच्या कडेला कुणी तरी पडलंय.
किंचितशी हालचाल. त्या काळोखाला विचलित करतेय. काळोखातही त्याचा चेहरा चमकतोय.
रक्ताने माखलेला चेहरा वेदनेने पिळवटलेला.
तो कसाबसा हातावर जोर देत उठायचा प्रयत्न करतो. अन् पुन्हा कोसळतो..
कमरेपासून खाली पूर्ण मोडलेला!
गच्च डोळे मिटत तो एकेक वेदना रिचवतोय, आता तो आजूबाजूला पाहतोय.
‘‘हॅल्लो.. कुणी आहे का?’’
त्याच्या घशातून एक चिरका आवाज कसाबसा बाहेर येतो.
‘‘कुणी आहे का?.. प्लीज मला वाचवा..’’
आवाजापाठोपाठ वेदनाही पुन्हा बाहेर येते. रक्ताळलेला चेहरा तो हाताने कसाबसा पुसतो.
‘‘अहो.. इथं कुणी आहे का?’’
आता तो जरा मोठय़ानेच ओरडतो.
‘‘प्लीज मला वाचवा हो.. प्लीज..!’’
आता टॉवरमधली एक खिडकी उजेडाने पेटते.
‘‘ क.. कोण आहे?..’’
खिडकीतून पहिला आवाज येतो.
‘‘मी.. मी.. आहे.. प्लीज.. लवकर या..’’
तो कसाबसा पुटपुटतो..
‘‘मी.. मी.. कोण.. मी?
खिडकीतून सवाल केला जातो.
‘‘मी.. इथं रस्त्यावर पडलोय. गाडीनं उडवलंय मला..
प्लीज वाचवा.. जीव जातोय माझा..’’
तो आता त्या खिडकीकडे आशेने पाहत म्हणतो.
‘‘ओह.. उडवलंय.. म्हणजे अपघात..
बापरे म्हणजे पोलिसांची भानगड..’’
खिडकीतला दिवा विझतो. पुन्हा अंधार..
तो आता मोठय़ाने किंचाळतो..
‘‘अरे या कुणी तरी लवकर, मला वाचवा..
प्लीज इथं कुणी डॉक्टर वगैरे आहे का?’’
आता दुस-या मजल्यावरची एक खिडकी उजळते.
‘‘येस.. मी डॉक्टर आहे. कोण किंचाळतेय मघापासून. आम्ही झोपायचं नाही का?’’
आतून जोरदारपणे खडसावले जाते.
‘‘मला वाचवा हो.. डॉक्टर प्लीज लवकर या..’’
आता तो पुन्हा खिडकीकडे पाहत ओरडतो.
‘‘हे पाहा शांत राहा.. आरडाओरड इथं चालणार नाही. तुम्हाला काय झालंय?’’
‘‘डॉक्टर मला या हायवेवर एका गाडीनं उडवलंय..
फार लागलंय.. रक्तही खूप गेलंय..
‘‘रक्त खूप गेलंय.. मग मी आता काय करू? मला नाही वाटत काही उपयोग होईल.’’
‘‘डॉक्टर मला वाचवा.. प्लीज’’
‘‘आम्हालाही कधी ना कधी आराम हवाय ना.. दिवसभर पेशन्ट तपासायचे नि रात्रीही..’’ आम्ही डॉक्टर आहोत, यंत्रमानव नाहीत कळलं!’’
खिडकीतला दिवा झटकन विझतो!
अरे देवा, कसं होणार आता.. तो आता वेदनेने कळवळतोय.
‘‘कुणी तरी वाचवा हो मला..’’
चौथ्या मजल्यावरची एक खिडकी उजळते.
‘‘च्यायला काय कटकट आहे..’’
आतून त्रासिक आवाज.
‘‘धड झोपूही देत नाहीत.. कोण? कोण मरतंय तिथे?’’ आतून सवाल केला जातो.
‘‘अहो.. मी आहे.. फार लागलंय मला लागलंय!’’
‘‘कुणी सांगितलं होतं तिथं मरायला अन् तुम्हा लोकांना हीच वेळ मिळते का मरायला? मरायचंच होतं तर जायचं होतं रेल्वेखाली. इथे संमजस विचारी लोक राहतात. गुंड-मवाली नाही कळलं का.. मिस्टर मरनेवाले..’’
‘‘अहो माझा काय दोष नव्हता हो.. रस्ता ओलांडत होतो.’’
आता बाजूच्या एका खिडकीतला बल्ब पेटतो.
‘‘महाशय रात्रीचे दोन वाजून गेलेत. ही वेळ काही रस्ता ओलांडायची नसते. कोण आहात तुम्ही?’’
त्यावरची एक खिडकी उजळते. आतून आवाज येतो.
‘‘कोण आहे तो माझी झोपमोड करणारा? पहाटे पाचला मला स्पेशल डय़ुटी आहे. झोपमोड करणा-याला खरे तर पोलिसांच्या हवाली करायला हवं.’’
बाजूची खिडकी पेटते. आतून एका स्त्रीचा आवाज.
‘‘अहो स्पेशल डय़ुटीवाले.. माझे मिस्टरही पोलिस खात्यात आहेत. त्यांनी काय चोवीस तास डय़ुटी करायची.’’
रस्त्यावरचा पुन्हा कळवळतो म्हणतो,
‘‘अहो तुम्ही नंतर भांडा, आधी मला वाचवा, फार लागलंय मला..’’
आणखी एक खिडकीतला बल्ब पेटतो..
आतून आवाज येतो..
‘‘महाशय फार लागलंय म्हणातय तुम्ही मला. एक सांगा लागलं तेव्हा नेमकी वेळ काय होती?’’
‘‘अहो मी काय त्या वेळी घडय़ाळ्यात पाहत नव्हतो, पण आधी खाली या आणि मला वाचवा.’’
त्याच खिडकीतून आवाज पुन्हा येतो.
‘‘तेच तर म्हणतोय मी.. नक्की वेळ कळली असती तर तुमचं काय होणार, हे मला सांगता आलं असतं. ओके ते जाऊ द्या. तुमचा मंगळ कुठल्या स्थानात आहे ते ठाऊक आहे का तुम्हाला?’’
वरची एक खिडकी उजळते, आतून आवाज येतो..
‘‘म्हणे मंगळ! आधी आपल्या कन्येचा मंगळ तपासा.. अजून लग्न होत नाहीय..’’
मंगळवाल्याच्या खिडकीतला बल्ब झटकन विझतो!
‘‘अहो कुणी तरी या लवकर.. प्लीज..’’
आता त्याचा आवाज क्षीण होतोय..
आता तिस-या मजल्यावरची एक खिडकी उजळते.
‘‘च्यायला कोण किंचाळतंय..? धड झोपायलाही देत नाहीत. कोण तडमडलंय आता?’’
‘‘प्लीज मला वाचवा हो..
‘‘म्हणे वाचवा, महाशय आताच कुठे पडलोय मी.. एक तर इटलीची टीम हरलीय. माझा आधीच मुड गेलाय.’’
‘‘प्लीज या लवकर हो..’’
‘‘काय लवकर या.. त्या फुटबॉलच्या मॅच आधीच उशिरा रात्री सुरू होतात. दिवसा झोपा काढून रात्री पाहाव्या लागतात. आता कुठे डोळा लागला नि कोण हा तडमडला..’’
‘‘माझा जीव जातोय हो’’
शेजारची आणखी एक खिडकी पेटते..
‘‘तुझा जीव जातोय.. आणि आमचा काय राहतोय.. ते लोक पुन्हा पेट्रोल दरवाढ करणार आहेत. कुणाला परवडणार गाडी? सांगा मिस्टर कुणाला परवडणार?’’
‘‘तुमची गाडी असेल तर प्लीज मला लवकर हॉस्पिटलमध्ये न्या हो..’’
अचानक ती खिडकी विझते.. अंधार होतो.
‘‘एक गोष्ट मला कळेल का?’’
पलीकडल्या एका खिडकीतून आवाज येतो.
‘‘मला असं विचारायचं आहे की तुला गाडीनं उडवलं. पण त्याच वेळी नेमकं तुला काय आठवलं. मला म्हणायचंय तुला कुठला जवळचा चेहरा प्रथम आठवला?’’
‘‘प्लीज मला वाच.. वा!..’’
‘‘हे बघ तुला कळलेलं नाहीय की तू किती महत्त्वाची गोष्ट सांगणार आहेस. दु:खद प्रसंगी आपल्याला सर्वप्रथम आपली पत्नी किंवा आपली मुलं नजरेसमोर येतात. मी एक मोठी लेखिका कवयित्री आहे. म्हणून मला ते जाणून घ्यायचे आहे. मानवी नातेसंबंधांची एक उकल व्हावी. कोण जवळचं असतं आपल्या? मुलं की पत्नी? तू जरा लवकर सांग.. कारण एक दीर्घ काव्य मला स्फुरतेय..’’
‘‘माझा.. जीव जातोय.. प्ली.. ज!’’
आता तिथं डझनभर खिडक्या उजळल्यात.
‘‘काय कटकट आहे.. साला धड झोपताही येत नाही.’’
‘‘प्लीज.. वा..च..वा..’’
‘‘म्हणे वाचवा.. थांब आम्ही येतोय..’’
इमारतीतून दोघे जण बाहेर येतात.. एक त्याची तंगडी पकडतो अन् एक त्याचा हात धरतो. दोघेही त्याला उचलतात आणि रस्त्याच्या मधोमध नेऊन टाकतात. निघून जातात. पाचेक मिनिटांत तिथून एक मोठा ट्रक वेगाने जातो.
एक मोठी किंकाळी त्या अंधाराला चिरून टाकते.
पाठोपाठ टॉवरमधल्या सगळ्याच खिडक्या विझतात. सर्व काही शांत होतं..
सकाळी त्याच रोडवर काही शाळकरी मुलं जात असतात. अचानक त्यातला एक जण रस्त्याकडे बोट दाखवतं ओरडतो. ‘‘वो देखो, कुत्ते की मौत!’’ सगळी मुलं तिथं पाहतात.. ओरडतात, ‘‘कुत्ते की मौत..’’ रस्त्याच्या मधोमध एक मांसाचा लगदा असतो. सपाट झालेला. रक्त सुकून गेलेला, काळपट लगदा. चिखलासारखा दिसणारा!

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version