Home कोलाज दमलेल्या तुमची आमची कहाणी!

दमलेल्या तुमची आमची कहाणी!

1

‘काम हीच पूजा’ हा मंत्र एके काळी लोकप्रिय होता, परंतु सध्या नोकरदारांवर कामाचं इतकं ओझं असतं की, त्याखाली ते दबून-पिचून जातात. घरोघरी दिसणारे ‘दमलेले बाबा’ हे खरोखर दयनीय दृश्य असतं.

परवा मला माझा एक जुना मित्र भेटला. तो परदेशात राहातो, सध्या इथे भारतात आला होता. गेली अनेक वष्रे तो परदेशात होता, त्यामुळे अर्थातच तिथल्या अनेक गोष्टी त्याला सांगायच्या होत्या आणि मला त्या ऐकायच्या होत्या. असाच गप्पांचा विषय नोकरी आणि तिथली माणसं, तिथलं वातावरण, संस्कृती, या बाबींकडे वळला. साधारणपणे आपलं हेच मत असतं की, तिथे म्हणजे परदेशात आरामाचं आयुष्य असतं, वेळच्या वेळी घरी येता येतं, शनिवार-रविवार फिरायला जाता येतं, भरपूर वेळ मिळतो, इत्यादी. परंतु त्याच्याकडून जे ऐकायला मिळालं ते विचलित करणारं होतं.

नोकरी कशी आहे, असं विचारलं असता नाखूश दिसलेला तो म्हणाला की, ‘खूप काम आहे रे! वैताग येतो. वेळेचा पत्ता नसतो. रात्री-रात्रीपर्यंत ऑफिसात बसून कामं करायला लागतात आणि पर्सनल लाइफ असं वाटतंच नाही काही. शनिवारीसुद्धा अनेकदा जावं लागतं. कठीण झालंय सगळं. पैसे देतात म्हणून फक्त करायचं सहन.’ मी न राहवून प्रश्न केला, ‘तू फॉरेनमधेच राहतोस ना?’ ‘हो अर्थात!’ तो म्हणाला. ‘कारण तू हे जे सगळं सांगतोयस ती आणि तशी परिस्थिती इकडे आहे भारतात!’ मी म्हणालो. ‘एके काळी असेल. आता आपल्याच लोकांनी बाहेर जाऊन आपल्या इथलं घाणेरडं कल्चर तिथे पसरवलंय, त्यामुळे देश असो की परदेश, घरोघरी मातीच्या चुली’.

‘कमाल आहे!’ असं म्हणत असतानाच मी भारतात राहणा-या आणि नोक-या करणा-या लोकांशी झालेल्या चर्चा, त्यांचे किस्से आठवायला लागलो. ‘आनेका टाइम फिक्स है जानेका नही’, ‘गद्दी-चद्दर लेकेही ऑफिस जाते है’, ‘ऑफिस खाली होने के बाद अच्छा काम होता है’, ‘वर्क हार्ड पार्टी हार्डर’ अशी अनेक वचनं मला आठवली. या उक्त्या गमतीत किंवा उपहासाने घेतल्या जात असल्या तरीही त्या शब्दश: ख-या आहेत. मुळात नोकरी आणि गुलामगिरी यातील फरक फार थोडासा उरला आहे आता.

स्पर्धा वाढली. चढाओढ वाढली. त्यामुळे कंपन्यांना आपली उत्पादनं जास्तीत जास्त विकण्याची अपरिहार्यता आली. त्यातून कर्मचा-यांना अवास्तव टारगेट्स आली. पैसे वाचवण्यासाठी माणसं कमी केली गेली आणि एकेक माणूस दोघा-तिघांचं काम करू लागला. लोकसंख्येमुळे नोक-या सहज मिळेनाशा होत्याच, त्यात काम नाही केलं तर आहे ती नोकरी जाण्याची पाळी येईल या भीतीने आणि पैशाच्या भुकेपोटी माणूस ढोरासारखं काम करू लागला. याचा त्रास सगळ्यांनाच होत असावा, असं गृहीत धरलं तरी त्याला फारशी वाचा फोडली गेली नाही. त्याला कारण मानवी प्रवृत्तीच झाली. अमूक एकाने विरोध केला तर तो वाईट ठरेल, त्याचबरोबर आपण न बोलता काम केलं तर पुढे आपल्यालाच जास्त पैसे मिळतील, या लाचार आशेवर आणि विचारहीन ईर्ष्येपोटी माणसं आपल्या दिवसातला अध्र्याहून जास्त वेळ नोकरीला देऊ लागली आणि हळूहळू ही संस्कृती बनत गेली.

कुणी तरी एकदा असं म्हणालेलं मला आठवतं की, ‘मी सहा वाजता वेळेवर ऑफिसमधून निघालो की, ‘हाफ डे जा रहा है क्या? घर जा के क्या करने का है तेरे को?’ असं विचारतो माझा बॉस.’ मला प्रश्न पडतो की हे असं म्हणणा-यांना घरं नसतात का? बायको, मुलं, मित्र, नातेवाईक नसतात का? पैसे मिळवतात पण ते खर्च कधी करतात? आवडी निवडी, छंद ही माणसं कधी जोपासतात? की जोपासतच नाहीत? आणि यांना जर या कशातही स्वारस्य नसेल तर ते दुस-याला आपल्या पंगतीत का बसवतात? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे न आवडूनही लोक हे सहन का करतात? मला खरंच कीव करावीशी वाटते या ‘घर जा के क्या करने का है’वाल्यांची.

हे चित्र बदललं पाहिजे. कारण यामुळे अनेक दृश्यादृश्य समस्या माणसांच्या मागे लागत आहेत, ज्या कठीण आहेत. स्ट्रेस, टेन्शन, अनेक आजार हे सगळं या अतिरिक्त कामामुळे होतं. जर व्यक्तीला आठ, नऊ तास ठरलेलं काम करून उरलेला वेळ स्वत:साठी मिळाला नाही तर त्याचं पर्यवसान स्ट्रेस आणि टेन्शनमध्ये होतं. कुठे तरी या बदलाची सुरुवात झाली पाहिजे आणि त्याला सर्वाची जोड मिळाली पाहिजे. अनेक गोष्टी आहेत करण्यासारख्या ज्यांचा लोकांना विसर पडलाय. फेसबुकवर आणि व्हॉट्सॅप्पवर ‘गेले ते दिवस’ आणि ‘बेस्ट डेज ऑफ लाइफ’ सारखे मेसेज पाठवण्यापुरत्या त्या गोष्टी मर्यादित राहायचं काही कारण नाही. ‘दमलेला बाबा’ आणि तत्सम गाण्यांवर केवळ हळवं होण्यापेक्षा ‘कारण नसताना मी जास्त वेळ ऑफिसात थांबणार नाही’ असं ठामपणे ऑफिसात सांगितलं तर जास्त बरं नाही का? एकाने नाही तर प्रत्येकाने हे केलं तर कदाचित ही क्रांती होईल आणि मग अजूनही अनेक परदेशांत असलेली ‘नाइन टू फाइव्ह’ची आदर्श संस्कृती आपल्याकडेही रुजेल.

1 COMMENT

  1. खूपच सुंदर आहे. खरच आपण
    भारतीयच आपल्या सवयी बदलायला तयार
    नाही. चांगभलं मधील
    लिखाण आजच्या तरुणाईचा विचार अतिशय सोप्या भाषेत व्यक्त करत आणि म्हणून मनाला भावत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version