Home कोलाज एक मराठा.. लाख मराठा

एक मराठा.. लाख मराठा

0

स्पर्धात्मक युगात नोकरीचा प्रश्न बिकट झाला, सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे आणि म्हणूनच या मराठा मूक मोर्चाच्या निमित्ताने या महाराष्ट्रात जी क्रांती झालीय ती सत्कारणी लागेल ही खात्री आहे.

एक मराठा, लाख मराठा.. हे वाक्य प्रत्येक मराठी माणसाच्या मनात भरलेलं आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या या लाखो समुदायाच्या मूक मोर्चाने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा हातात घेऊन मराठी बांधव आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे.

आतापर्यंत हा मराठा बांधव कधीही आरक्षणासाठी एवढा उत्स्फूर्तपणे कधीही उतरला नव्हता. आज पक्षभेद विसरून स्वत:च्या अस्तित्वाची लढाई शांततेच्या मार्गाने लढत आहे. यामागे प्रेरणा आणि आदर्श आहे तो शिवछत्रपतींचा. लिहा पण असं लिहा मुडद्याच्या माथ्याला घाम आला पाहिजे, दगडांची राख झाली पाहिजे व पाण्याला आग लागली पाहिजे, आणि जो वाचेल तो फक्त आणि फक्त महाराजांच्या विचारांचा वाघ झाला पाहिजे. ही विचारांची लढाई आहे. हक्काची लढाई आहे. तिही शांततेच्या मार्गाने.

अनेक वर्षे ज्या समाजाने न्यायासाठी रस्त्यावर येण्याचा विचारही केला नाही. त्या समाजाला आता आरक्षण मिळवण्यासाठी संघर्ष का करावा लागला हा प्रश्न मनात येणं साहजिकच आहे. किंबहुना मराठय़ांना आरक्षणाची गरज काय, असेही काही राजकारणी मंडळींनी आपली मते मांडली याला या मराठा मोर्चाने उत्तर मिळालं आहे. सर्व जातीधर्मातील लोकांना नोकरी, शिक्षण यामध्ये आरक्षण मिळालं.

घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिताना सकारात्मक विचार करून गरीब दलितवर्गाला न्याय दिला. पण मग आज गरज आहे मराठा समाजाला आरक्षणाची, नोकरी, शिक्षण यामध्ये इतरांना मिळणारी सवलत मराठा समाजाला नाही. नोकरीमधील वयोमर्यादेत इतरांना शिथिलता मराठय़ांना का नाही? मूठभर लोकांचा निकष सर्वसामान्य गरीब मराठय़ांना का? हा समाज आर्थिकदृष्टय़ा मागासलेला राहिला, शिक्षणासाठी सवलती नाहीत, भरमसाट भरावी लागणारी फी आणि उच्चशिक्षण घेऊनही नोकरीसाठी भटकंती, मराठा समाजाकडे मोठय़ा प्रमाणात शेती व्यवसाय होता.

मात्र काही जमिनी ज्यांना कसायला दिल्या. त्या १९६०च्या जमीन महसूल कायद्यान्वये ‘कुळकायदा’ म्हणजे कुळाने मालकी हक्क प्रस्थापित होऊन ‘कसेल त्याची जमीन’ हा कायदा अमलात आला. त्यामुळे जमिनीचे विभाजन झाले.

आघाडी सरकारच्या कार्यकाळात मा. मुख्यमंत्र्यांनी या आरक्षणाच्या वाढत्या मागणीचा विचार करून मा. नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय समिती नेमली. यासाठी अनेक हरकती आल्या, विधिज्ञांची मदत घेऊन इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता राणे समितीने मराठा आरक्षण जाहीर केले, याचे सर्व स्तरातून कौतुक झाले. मात्र प्रत्येक चांगल्या निर्णयाला कुणी तरी विघ्न आणतेच तसे हा विषय कोर्टात गेला.

मराठय़ांना आरक्षण द्यावंच लागेल. हा संपूर्ण मराठा समाज एकत्र झाला तर? याची सरकारने धास्ती घेतली. हा कुठल्या एका पक्षाचा मोर्चा नाही, इथे कुणा राजकीय पुढा-याची भाषणबाजी नाही, तर इथे आहे सर्व स्तरातील मराठा मावळा. तरुणवर्ग जो नोकरी आणि शिक्षणात केवळ आपण जात ‘ओपन’ असल्याने प्राधान्य मिळत नाही याची खंत असलेला. आज दिवसेंदिवस लाखोंचा उच्चांक गाठणारा हा मराठा मूक मोर्चा हा ऐतिहासिक ठरला आहे.

‘‘जिंकून देखील दुनिया सारी
औरंगजेब रडला होता, कारण
दरबारात आवाज चढवून त्याला
शिवाजी राजा नडला होता.

हा इतिहास आहे मराठय़ांचा, मराठा एक झाल्यावर इतिहास घडवतो, आणि एवढी प्रचंड शक्ती आहे या मराठा क्रांती मोर्चामध्ये. कधी नव्हे तो मराठा एका मागणीसाठी एकत्र आला. मराठा समाजातील आर्थिक दुर्बलता कमी व्हावी, शिक्षणात प्राधान्य मिळावे, अशा मागण्या या समाजाच्या आहेत.

अजूनही आम्ही डिग्रीची सर्टिफिकेट घेऊन वणवण का भटकायचे? उच्च पदस्थ अधिका-यांमध्ये किती मराठा आहेत? त्यांच्याकडे गुणवत्ता नाही? कौशल्य नाही? याचा विचार आज क्रांतीमध्ये आला. स्पर्धात्मक युगात नोकरीचा प्रश्न बिकट झाला, सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे आणि म्हणूनच या मराठा मूक मोर्चाच्या निमित्ताने या महाराष्ट्रात जी क्रांती झालीय ती सत्कारणी लागेल ही खात्री आहे, मात्र ही उत्स्फूर्त चळवळ, एका विचारांची चळवळ महाराष्ट्रात झाली त्याचा सार्थ अभिमान आहे.

समस्त मराठा क्रांती मोर्चात सहभागी झालेल्यांना मन:पूर्वक धन्यवाद. एक मराठा, लाख मराठा.. हाच आहे शूर मराठा..जय भवानी..जय शिवाजी..

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version