Home कोलाज ‘एच-टू-ओ’चे पुस्तकी गुणगान

‘एच-टू-ओ’चे पुस्तकी गुणगान

1

‘सगळे कळते पण वळत नाही,’ हा भारतीयांचा स्वभाव आहे. पाण्याबाबत सर्वसामान्य लोकांना आपुलकी असते; पण जलसाक्षरता नावालाही नसते.

‘सगळे कळते पण वळत नाही,’ हा भारतीयांचा स्वभाव आहे. पाण्याबाबत सर्वसामान्य लोकांना आपुलकी असते; पण जलसाक्षरता नावालाही नसते.

याबाबत शहरी आणि ग्रामीण भागाची मानसिकताही एकसारखी असते. शहरी आणि ग्रामीण भागाला दोघांनाही शिस्त नाही. यात निर्माण होणारी पाणीटंचाई ही दोघांच्याही वाटयाला येते.

पाऊस पडला नाही तर शहरी भागाला शहराबाहेरची धरणे, तलाव आठवतात तर ग्रामीण भागाला विहिरी, बोअरवेल आठवतात.

पण हेच जर जलव्यवस्थापन केले तर पाण्याची उपलब्धता बाराही महिने होऊ शकते. भारत हा कृषीप्रधान देश पण त्याला लागणा-या पाण्याचे कोणत्याही प्रकारचे नियोजन ना सरकार करत ना शेतकरी.

पाण्याबद्दलचे नियोजन नसल्यामुळेच शेती आणि शेतकरी दोघेही नेहमीच अडचणीत येतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी मासिकातून ‘पाणी’ या विषयावर या आधीही विशेषांक काढून पाण्याचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवले होते. तसाच एक प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसने पुस्तकरूपाने पुन्हा केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्य पातळीवर आयोजित केलेल्या ‘जलसाक्षरता’ निबंध स्पर्धेतील विजेत्या आणि काही निवडक निबंधांचे संपादन करून हे पुस्तक तयार केले आहे.

यात राज्य आणि देश पातळीवर सुरू असलेल्या विविध जल व्यवस्थापनाचे, जल गैरव्यवस्थापनाबद्दल कुतूहलमिश्रित माहिती आहे. मात्र, भारतीयांनी आपली मानसिकता बदलायला पाहिजे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे.

तहान लागली की, विहीर खणावी, ही भारतीयांची मानसिकता आहे. त्याला छेद देणारी काही उदाहरणे यात आहेतच पण त्याचबरोबर सर्वसामान्य व्यक्तीला पाण्याबद्दल काय वाटते, याचेही प्रतिबिंब यात आहे.

आधुनिक म्हणवून घेणारा भारत सामाजिक मूल्य आणि विज्ञानमूल्य मानायला आणि स्वीकारायला तयार नाही. विज्ञान-तंत्रज्ञानाने अधिक जीवन जगणे सोपे झाले असले तरी त्याचा वापर प्रत्यक्ष जीवनात आणण्याच्या मानसिकतेचा अभाव भारतीयांमध्ये आजही आहे.

एकाच विषयाला धरून अनेक निबंध असल्यामुळे मुद्दय़ांची पुनरावृत्ती मोठया प्रमाणात झाली आहे. निबंध माहितीपर आहेत पण त्यातून तोचतोचपणा डोकावत राहतो. ढोबळ मानाने लोकांनी मिळवलेल्या, वाचलेल्या आणि शोधून लिहिलेल्या माहितीच्या आधारे पुस्तकाचे संपादन केले आहे.

या निबंध स्पर्धेत गृहिणी, विद्यार्थी, नोकरदार सहभागी झाल्यामुळे प्रत्येकाने आपल्या वकुबाप्रमाणे लिहिले आहे. पुस्तक वाचल्यावर त्यात नवीन काहीच सापडत नाही. पाण्याचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करणा-या या पुस्तकात किमान राज्य आणि देशपातळीवर पाण्याशी संबंधित संस्था, संघटना, गट आणि जलतज्ज्ञ, भूगर्भतज्ज्ञांची माहिती देणे खूप फायदेशीर ठरले असते.

वर्षा जल संचयन (रेन वॉटर हार्वेस्टिंग) करणा-या व्यक्ती, संस्था आणि त्याचा पत्ता, फोन नंबरही या पुस्तकाचे मोल वाढवू शकले असते. पक्षीय पुस्तकाला वाचनमूल्यही लाभले असते. पण या पुस्तकात जीवनावश्यक ‘एच टू ओ’चे कोरडे, पुस्तकी गुणगान आहे.
जलसाक्षरता :

संपादन : हेमराज शाह

रेखा प्रकाशन

पाने : ३५२,  किंमत : ३५०

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version