Home महाराष्ट्र कोकण मेवा ऐका रवळनाथाची कहाणी

ऐका रवळनाथाची कहाणी

0

पेडणे (गोवा), चंदगड (कोल्हापूर), ओटवणे (सावंतवाडी) येथील रवळनाथांच्या मूर्तीत कमालीचे साम्य आहे. या तिन्ही स्थळांवरील देव आपापसात संवाद साधत असतात, अशी भक्तांची श्रद्धा आहे. ही तिन्ही देवालये भौगोलिक दृष्ट्या पहाता दोन राज्यात तीन जिल्ह्यात आहेत. तिन्ही देवालयामधील अंतर सुमारे १५० किमी आहे. असही म्हणतात तिन्ही मंदिरांना नकाशावर जोडण्याचा प्रयत्न केला तर समांतर त्रिकोन तयार होतो.  तीन देवांपैकी एकावेळी दोन देव भक्तांच्या न्यायनिवाडयाचे काम करतात. यावेळी एक देव विश्रांती घेत असतो.असे हे आलटून पालटून चालते.

श्री देव रवळनाथ ही दक्षिण कोकणची वैशिष्टय़पूर्ण देवता आहे. अत्यंत जागृत स्थान म्हणून ख्याती असलेल्या रवळनाथाची दक्षिण कोकणात मोठया प्रमाणात मंदिरे आहेत. जसजसे उत्तरेकडे जावे तसतसे या मंदिरांची संख्या कमी होत जाते. जिल्ह्यातील आठ तालुक्यांत सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले परिसरात रवळनाथाची २११ मंदिरे आहेत. गोवा राज्यातही रवळनाथ देवालयांचा प्रभाव आहे.

जिल्ह्याच्या सीमावर्ती गावात रवळनाथाची जागृत स्थाने पहायला मिळतात. गोवा राज्यात रवळनाथाची एकूण ५० मंदिरे आहेत. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात रवळनाथ देवालयांची संख्या ३१० हून अधिक आहे. असेही सांगतात की, पेडणे (गोवा), चंदगड (कोल्हापूर), ओटवणे (सावंतवाडी) येथील रवळनाथांच्या मूर्तीत कमालीचे साम्य आहे. या तिन्ही स्थळांवरील देव आपापसात संवाद साधत असतात, अशी भक्तांची श्रद्धा आहे. या तीन देवालयांच्या स्थापनेचाही इतिहास अनोखा आहे.

या तिन्ही मंदिरांची भौगोलिक रचना पहाता आणि विद्यमान स्थिती लक्षात घेत पूर्वजांची त्रिकोणी संकल्पना अश्चर्यकारक वाटते. या तिन्ही मंदिरांना एकमेकांशी जोडण्याचा प्रयत्न करता निर्माण होणारा त्रिकोन हा समृध्द प्रदेश मानला जातो. या देवालयांची स्थापना एकाच वेळी झाली असावी, असे सांगितले जाते.

तीन देवांपैकी एकावेळी दोन देव भक्तांच्या न्यायनिवाडयाचे काम करतात. यावेळी एक देव विश्रांती घेत असतो. समजा ओटवणेचा रवळनाथ आणि पेडणेचा रवळनाथ यांच्याकडे कौलप्रसाद सुरू असतील तर चंदगडच्या रवळनाथाला कौल लागत नाही. चंदगड आणि ओटवणेचा देव न्यायनिवाडा करत असेल तर पेडणेचा देव शांत असतो.

ओटवणेचे श्रद्धास्थान तर सर्वत्र प्रसिद्ध आहे. त्या देवाच्या परवानगीशिवाय येथे कोणतीही गोष्ट केली जात नाही. अंतरित वसलेल्या देवाला ‘अहो देवा’ असे कोणी म्हणत नाही. त्याच्यात आणि भक्तात अंतरच उरत नाही. मग विविध नावांनी देवाला संबोधले जाते. नावात काय आहे? असे कोणीही विचारले, पण नावातच बरेच काही असते. हे अनेक देवस्थानांच्या महतीवरून सिद्ध होते.

गोव्यात रवळनाथांच्या विविध रुपांना भक्त वेगवेगळया नावांनी संबोधतात. आसगावच्या रवळनाथास ‘थोटा रवळनाथ’ किंवा ‘गारुडी रवळनाथ’ म्हणतात. तर माशेल येथील रवळनाथास ‘पिसो रवळू’ असे नाव पडले आहे. काही ठिकाणी रवळोबा असे नामकरण झाले आहे. वेंगुर्लेच्या रवळनाथाला ‘बंदरी’ रवळनाथ असेही म्हणतात. रवळनाथाची सत्ता सागरावर चालते. म्हणून मच्छीमारीसाठी अथवा सागरी प्रवासासाठी निघालेले बांधव बंदरी रवळनाथासमोर नतमस्तक झाल्यानंतर पुढे रवाना होतात.

खानोली गावातील रवळनाथास भक्त ‘मोडका देव’ म्हणून साद घालतात. मालवणी मुलखाचा मार्मिकपणा येथे प्रकर्षाने जाणवतो. या मार्मिकतेतून या मुलखातला भक्त देवालाही वगळत नाही. मोडक्या या नावामागे असलेली गंमतीदार कथाही तेवढीच अनोखी आहे.

तेंडोली कुडाळमध्ये आणि खानोली गाव वेंगुर्ले तालुक्यात येत असले तरी भौगोलिक स्थान पाहता एका डोंगराच्या अंतरावर ही गावे आहेत. तेंडोलीचे रवळनाथ पंचायतन सर्वदूर प्रसिद्ध आहे. रवळनाथाच्या प्रांगणात सातेरी तसेच गणपती व अन्य देवस्थाने आहेत. या मंदिराच्या परिसरात भक्कम तटबंदी आहे. तेंडोलीच्या रवळनाथाला आपटयाची पाने ५२ ठिकाणी लावून कौल घेतले जातात.

खानोली आणि तेंडोलीच्या रवळनाथामध्ये शेकडो वर्षापूर्वी भांडण झाले. दोन्ही रवळनाथ समोरासमोर आले. या भांडणाला तेंडोली येथे आलेली देवी निमित्त ठरली. या देवीचेही मंदिर सीमेवर पहायला मिळते. येथेही वार्षिकोत्सव होत असतात. वर्षातून देवांची स्वारी सन्मानाने या देवीच्या स्थळावर पोहोचते.

तेंडोलीत आलेली देवी मागे परतेना हे संघर्षाचे कारण होते, असे भक्तगण सांगतात. या रागातून मंदिराच्या बाहेरील तटबंदीवर खानोलीच्या रवळनाथाने लाथ मारली. तटबंदी कोसळून गेली. यावेळी झालेल्या संघर्षाचे पडसाद आणि निर्माण झालेल्या प्रथा परंपरा आजही दोन्ही गावांत जपल्या जात आहेत. देवाने लाथ मारलेली तटबंदी दुरुस्त करण्याचा गेली अनेक वर्ष प्रयत्न सुरू होते.

मात्र, काही केल्या तटबंदी मजबूत होत नव्हती. याला ‘जकात तट’ असे म्हणतात. दहा वर्षापूर्वी रवळनाथाला कौलप्रसाद लावत क्षमायाचना करून संपूर्ण तटबंदी नव्याने बांधण्याचा प्रयत्न झाला. सर्व तटबंदी बांधण्यात आली. आता तटबंदी उभी असली तरी प्रतिवर्षी चुकी-समजीचे गाऱ्हाणे आणि परंपरागत विधी केल्या जातातच.

दोन देवांमध्ये झालेल्या लढाईत खानोलीच्या रवळनाथाने लाथ मारून तटबंदी तोडली. मात्र, यावेळी त्याचा पाय दुखावला. त्या दिवसापासून खानोलीच्या रवळनाथाला भक्तगण मोडका देव असे म्हणतात. भक्त आणि देवांचे अंतर जेव्हा श्रद्धेने कमी होते तेव्हा देवाला एकेरी नावाने संबोधले जाते. खानोलीच्या रवळनाथाला भक्त जेव्हा अंत:करणातून हाक मारतात तेव्हा मोडका देव म्हटले तर अधिक पावतो अशी ख्याती आहे.

आपल्यावर कोसळलेले संकट देवाला सांगायचे असल्यास ‘मोडक्या माझ्यावर इलेला अरिष्ट तूच निवारण कर’ असे जेव्हा भक्त सांगतात तेव्हा काही मिनिटांतच त्यांना प्रचिती येते. अशी गाववाल्यांची श्रध्दा आहे. खानोलीचे हे देवस्थान जागृत देवस्थान समजले जाते. कोणत्याही स्थानावरून भक्ताने देवाला साद घातली तर संकटे आपोआपच बाजूला होतात, असा अनेक भक्तगणांचा विश्वास आहे. खानोलीच्या मंदिराची रचनाही अनोखी अशी आहे. ११ व्या शतकातील लाकडी दरवाजा येथे पाहायला मिळतो.

खानोली – तेंडोली गावातील परंपरा या टोकाच्या आहेत. या दोन्ही गावांतील मंडळींमध्ये परस्परांमध्ये लग्न अथवा अन्य कार्य केली जात नाहीत. दोन्ही गावांतील माणसे एकमेकांच्या गावात येण्यास शक्यतो टाळतात. कसल्याशा कारणाने येणे झालेच तर सूर्यास्तापूर्वी त्या गावाच्या सीमेबाहेर जाण्याचा ग्रामस्थांचा प्रयत्न असतो.

काही वर्षापूर्वी तेंडोलीतील काही मंडळींनी खानोलीच्या परिवाराशी सोयरीक जुळविण्याचा प्रयत्न केला. त्या परिवाराला सुख मिळाले नाही. संसार अपयशी ठरले, यामुळे देवाच्या मर्जीविरुद्ध जाणे नको असे प्रत्येकाला वाटते.दोन्ही गावांतील मंडळी एकमेकांपासून जरा सावधच असतात. आणि ग्रामदेवतेचा विषय येतो तेव्हा तो अधिकच संवेदनशील असतो.

रवळनाथाची ख्याती अगाध आहे. सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यात ५३, वेंगुर्लेत २६, तर कुडाळमध्ये ३१ मंदिरे आहेत. त्या तुलनेत मालवण, देवगड आणि कणकवलीमध्ये रवळनाथ देवालयांची संख्या कमी आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version