Home कोलाज कचरा वेचणा-या महिलेची जिद्द

कचरा वेचणा-या महिलेची जिद्द

1

ठाण्यातील वीर सावरकर रोड रस्त्याच्या पुढे खाडीचा परिसर, तिथे एक छोटीशी झोपडी, आजूबाजूला सगळा कचरा, गोळा केलेले भंगार.. हे आहे कचरा वेचक इंदुबाई सोमनाथ मोरे यांचे घर. घर कसलं १० बाय १० ची लहान खोलीच ती.. दररोज पहाटे ५ वाजता घराबाहेर पडून शहर चकाचक करण्यासाठी गल्लीबोळातला कचरा वेचणा-या आणि उचलणा-या बायकांमधल्या इंदुबाई एक आहेत.

इंदुबाई यांची आई व आजी कचरा वेचायच्या. घरची परिस्थिती तशी बेताचीच असल्याने त्यांना शिक्षण घेता आले नाही. लहानपणापासूनच इंदुबाई यांनी कामाला सुरुवात केली होती. कधीतरी परिस्थिती सुधारेल या आशेनेच त्या मेहनत करत राहिल्या. लग्नानंतर तरी सुख पदरात पडेल अशी आशा होती. पण ती सुद्धा फोल ठरली. पतीची नोकरीही कायमस्वरूपी नसल्याने श्रीमंतीचे सुख कधी अनुभवताच आले नाही.

सुरुवातीपासूनच आयुष्यात कष्टच लिहिलेले आहेत, त्याला कोण काय करणार असे इंदुबाई सांगतात. रस्त्यावर एक महिला कचरा वेचताना पाहून त्यांना अनेकांनी हिणवले. एकाने म्हटलंसुद्धा की ‘कष्ट करून काही व्हायचं नाही, नशिबात जे लिहिले आहे तेच होणार’. त्यावर खचून न जाता त्यांना उत्तर देताना त्या म्हणाल्या की, ‘कदाचित नशिबात लिहिले असणार की कष्ट केल्यानेच सर्वकाही मिळेल.’ इंदुबाईचं हे वाक्य साधं सरळ असलं तरी या उत्तरातून बरंच काही शिकण्यासारखं आहे, हे विसरून चालणार नाही.

कचरा वेचणं म्हणजे कचरा कुंडीतील कच-यातील कागद, काच, प्लास्टिक आणि लोखंडाच्या वस्तू या वेगळ्या करायच्या आणि त्या भंगारवाल्याला विकायच्या. त्याच्या विक्रीतून जे पैसे मिळतील त्यातून उदरनिर्वाह करायचा. इंदुबाईंचं शिक्षण झालं नसल्याने कचरा वेचण्याचं काम करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. पण हे काम करताना त्यांना कधी कमीपणाही वाटला नाही. कचरावेचक अशीच आणि एवढीच इंदुबाईंची ओळख आहे असं मुळीच नाही, तर ठाणे शहर स्वच्छ राहण्याची जबाबदारी जितकी पालिकेची आहे, तितकंच योगदान त्यांचंही आहे. पण या महिलेच्या कर्तृत्वाची अद्याप कोणीही दखल घेतलेली नाही. इंदुबाईंसारख्या अनेक कचरावेचक महिलांना मुख्य प्रवाहात आणून पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावण्याबाबत मुंबई महानगरपालिका पाऊल उचलत आहे. मात्र, गेल्या ३० वर्षापासून ठाण्यात कचरा वेचून आपल्या संसाराचा गाडा पुढे चालविणारी महिला मात्र, याबाबत अनभिज्ञ आहे.

इंदुबाई सोमनाथ मोरे असे या महिलेचे नाव असून जळगाव येथील भडगाव, तालुका चाळीसगाव येथे त्या राहणा-या आहेत. कुटुंबात स्वत:, पती, चार मुलं असा परिवार आहे. गावी राहात असताना घराची परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने काम मिळविण्याच्या उद्देशाने इंदुबाई आणि त्यांचे पती मुंबईला आले. सुरुवातीला ते ब्राह्मण सोसायटी येथे ठेकेदारांचे काम करत होत्या. हे काम पूर्ण झाल्यानंतर त्या मुंबईतच स्थायिक झाल्या. दिवसाला जे पैसे मिळायचे त्यातून त्या घर चालवायच्या. एकीकडे पतीचा त्रास तर दुसरीकडे मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी अशी दुहेरी मन:स्थिती त्यांची होती. मात्र, ठेकेदाराच्या कामामुळे कधी इंदौर, भोपाळ, सायन, वज्रेश्वरी, कल्याण यांसारख्या विविध ठिकाणी जावे लागत असल्याने नकळत मुलांच्या शिक्षणावर त्यांचा परिणाम व्हायचा. त्यामुळे हे काम सोडून त्यांनी कचरा वेचण्याचं ठरवलं.

रस्त्यावर डम्पिंग गाऊडवर जमा झालेल्या कच-यातून भंगारात विकले जाणारे कागद, बाटल्या, लाकूड, लोखंड इत्यादी सामान विकून त्यातून मिळालेल्या पैशातून घर आणि मुलांचे शिक्षण पूर्ण केले. आता दोघांची दहावी झाली असून एक मुलगी दहावीची परीक्षा देत आहे. मुलगा पुण्यातील सह्याद्री पॉलिटिकल महाविद्यालयातून आभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. इतकंच नव्हे तर मुलांच्या शिक्षणासाठी पैसे कमी पडत असल्याने इंदुबाईंनी लोकांच्या घरची धुणीभांडी, तसेच लग्न, साखरपुडय़ात साफसफाई करण्याची कामेही त्या करू लागल्या. त्यातून त्यांना दिवसाला ४००-५०० रुपये अधिक मिळायचे. या मिळालेल्या पैशातून त्यांचे घर चालायचे, तसेच उरलेले पैसे त्यांनी बाजूला काढून कसेबसे मुलांचे शिक्षण पूर्ण केले.

याशिवाय इतकी र्वष मुंबईत राहूनसुद्धा स्वत:चे घर नसल्याची खंत देखील इंदुबाईंनी यावेळी व्यक्त केली. तसेच अनेक व्यक्तींनी आम्हाला येथून हाकलण्याचे प्रयत्न केले. मात्र, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी खूप मदत केली. त्यांना जेव्हा मुलांच्या शिक्षणाबद्दल सांगितले तेव्हा त्यांनी आम्हाला येथे राहण्याची परवानगी दिली, असेही इंदुबाईंनी सांगितले. याशिवाय पूर्वीच्या खडतर आयुष्याच्या मानाने आजचं जगणं जरा बरं असलं तरी आपल्या आयुष्यातल्या सर्व चढ-उतारांना कच-यानेच सोबत केल्याचे इंदुबाई अभिमानाने सांगतात.

1 COMMENT

  1. अशा व्यक्तींना खरतर महानगरपालिकेने भरती केले पाहीजे ज्यांना त्या कामाची लाजही नाही वाटनार व प्रामाणिकपणे काम करतील. ह्यासाठी अापली गरज अाहे. त्याचा पाठपुरावा करा, धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version