Home संपादकीय तात्पर्य कर्नाटकी द्वेषाचा कळस

कर्नाटकी द्वेषाचा कळस

0

कर्नाटक सरकारने बेळगावमधील मराठी भाषक आणि मराठी भाषा यांचा द्वेष प्रकट करण्याचे विक्रम नोंदवण्याचा निर्धार केलेला दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी या सरकारने महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याविरुद्ध प्रक्षोभक भाषण केल्याचा गुन्हा नोंदवला. त्या घटनेला बरेच दिवस उलटून गेल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. त्यावरून कर्नाटक सरकारला या कारवाईचा निवडणुकीच्या दृष्टीने उपयोग करून घ्यायचा आहे, असे दिसते. भारताच्या इतिहासामध्ये एखाद्या राज्य सरकारने दुस-या राज्याच्या विद्यमान गृहमंत्र्यावर अशा प्रकारचा खटला भरण्याची ही पहिलीच वेळ असेल. अर्थात गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आरोपाला चोख उत्तर दिले असून, सरकार नराश्येच्या भावनेतून अशा कारवाया करत आहेत, असे उत्तर दिले आहे. कर्नाटक पोलिसांची ही दांडगाई निवडणुकीच्या निमित्ताने आणि निवडणूक डोळ्यांसमोर ठेवूनच सुरू आहे. याचा एक पुरावा त्यांच्या दुस-या कारवाईतून दिसून आला. गुरुवारी बेळगावमधल्या मराठी भाषक जनतेने गुढी पाडव्याच्या निमित्ताने लोकांना शुभेच्छा देणारे डिजिटल फलक लावले होते. असे फलक लावण्याची जुनी परंपरा आहे. अशाच प्रकारचे फलक कन्नड भाषिकांनीसुद्धा कन्नड भाषेतून लावले होते. जुन्या परंपरेनुसार मराठी भाषिक फलकांवर भगवा ध्वज फडकवलेला होता आणि फलकावर मराठी भाषिकांना शुभेच्छा, असे म्हटलेले होते. ‘आम्ही मराठी, आमची मराठी’ अशा घोषणा त्यावर होत्या. कन्नड भाषिकांनी कन्नड भाषेतून शुभेच्छा फलक लावले तर ती कृती तिथल्या पोलिसांना राजकीय वाटत नाही. परंतु मराठी भाषकांनी मराठी भाषेत फलक लावल्यास मात्र त्यांना ते राजकीय वाटतात. गुरुवारी मराठी भाषकांच्या पाडव्याच्या शुभेच्छांवर आचारसंहितेचा बडगा उगारून चांगल्या दिवशी अपशकुन करण्याचा प्रयत्न केला. आचारसंहितेचा कोणताही नियम शुभेच्छांच्या आडवा येत नाही. बेळगावमधले मराठी भाषक हा काही राजकीय पक्ष नाही. तेव्हा मराठी भाषिकांनी परस्परांना शुभेच्छा दिल्या तर तो आचारसंहितेचा भंग ठरण्याचे काहीच कारण नाही. पाडवा सर्वाना सारखाच आहे. पाडव्यामध्ये भाषिक भेद नाही. कन्नड भाषकांसाठी तो पाडवाच आहे आणि मराठी भाषकांसाठीही पाडवाच आहे. परंतु या सणामध्येसुद्धा कर्नाटकाच्या पोलिसांना भाषेचा वास यावा, यामध्ये त्यांची मराठी द्वेषी दृष्टीच व्यक्त झालेली आहे. मराठी भाषकांनी गेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत बेळगाव महानगरपालिकेवर भगवा झेंडा फडकवला आणि कन्नड अभिनिवेशाचा तोरा उतरवला. मात्र, कर्नाटक सरकारने शुभेच्छापत्रांच्या निमित्ताने आपला राग काढण्याची संधी सोडली नाही. रागाचे रूपांतर केव्हाच द्वेषात झालेल्या कानडी मनाने आता द्वेषाचाही कळस गाठला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version