Home मध्यंतर भन्नाट लुईझा सुळक्यावर सॅकची धुळवड

लुईझा सुळक्यावर सॅकची धुळवड

1

होळी-धुळवडीच्या दिवशी सगळे रंग खेळण्यात एकमेकांना भिजवण्यात दंग झालेले असताना सॅकने (सह्याद्री अ‍ॅडव्हेंचर क्लबने) माथेरानच्या एको पॉइंटजवळचा लुईझा सुळका सर केला.लुईझा सुळक्याची चढाई यशस्वी करून सॅकच्या महिला मोहिमेचा पायंडा पाडला.

दरवर्षीप्रमाणे यंदाही होळीचा उत्सव निराळ्या पद्धतीने साजरा करण्याचं ठरवलं. चढाईसाठी निवडला माथेरानच्या एको पॉइंटजवळचा लुईझा हा सुळका. हा सुळका तसा सराईत गिर्यारोहकांना चढाईसाठी सोपाच. टीममध्ये सराईत गिर्यारोहक असताना चढाईसाठी इतका सोप्पा सुळका का बरं निवडला? याचं कारणंही तसंच होतं. महिला गिर्यारोहकांनी स्वतंत्रपणे सुळका सर करायला लावण्याची सॅकची ही पहिलीच वेळ होती.

नमिता, मेघना, महादेव, तुळशीदास, संतोष रॅपलिंग करून सुळक्याच्या पायथ्याशी पोहोचले. नामिताकडे प्रथम चढाईची सूत्रं होती. सध्या ती बृहन्मुंबई महानगरपालिकेत महिला सुरक्षा दलात आहे. सुळक्याच्या बेसला एक पिटोन आणि एक एक्सपान्शन बोल्ट वापरून सुरक्षा दोरीसाठी एक अँकर बनवण्यात आला. त्या अँकरने चढाईस सुरुवात केली. तिची सुरक्षा दोरी मेघना हिच्या हातात असून ती महादेवच्या निदर्शनाखाली होती. क्लायंबिंग सुळका सर करण्यास प्रथम चढणा-या व्यक्तीबरोबर त्याला सुरक्षा दोरी पुरवणारी व्यक्तीचं कौशल्य महत्त्वाचं असतं. क्लायंबिंगला सुरुवात होताच आमच्या आजूबाजूला मधमाश्यांचा वावर असल्याचं लक्षात आलं. त्यामुळे प्रत्येक पाऊल सावकाश आणि विचारपूर्वक उतरावं लागणार असल्याचं लक्षात आलं. नमिताने पहिला क्लायंबिंचा टप्पा पिच होल्ड पकडत पार केला. आम्हा सर्वाना तिचं कौशल्य आवडलं. तिथे पोहोचताच तिला एक एक्सपान्शन बोल्ट आढळला. तिने त्यातून आपली सुरक्षा दोरी काढली आणि ती पुढच्या टप्प्याकडे वळली. आता तिला पंच्याहत्तर अंशाचा कोन असलेल्या ढासळणा-या मातीचा सामना करायचा होता. तो टप्पा पार करण्यासाठी तिने पेग (लोखंडी सळीपासून टोकदार असं मातीत घुसवण्यासाठी बनवलेला एक साहित्य) घेतला आणि बघता-बघता तोही पार केला. नमिता तिला व्यवस्थित उभं राहता येईल, अशा ठिकाणी पोहोचली.

त्याच वेळेत मेघनानेसुद्धा तिची सुरक्षा दोरी लॉक करून थोडा वेळ विश्रांती घेतली. नमिताने सुळका क्लायंबिंगच्या दुस-या भागाला सुरुवात केली. आता यापुढे क्लायंबिंग भरपूर सांभाळून करावं लागणार होतं. कारण तिथे भरपूर सुटे दगड, ढासळणारी माती आणि त्यात भरीस-भर म्हणून दोन मोठय़ा दगडांच्या मधे तयार झालेली एक चीरही होती. नमिताने घसरणा-या मातीचा भाग सहज पार केला होता. तिने क्लायंबिंगला सुरुवात केली. महादेव आणि दत्तू शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नमिताने दगडांची चीर पार करण्यास सुरुवात केली, पण तिथे थोडी निसटण्याची भीती असल्यामुळे तिने दोन पिटोन आणि आधीच मारलेल्या एका एक्सपान्शन बोल्टचा वापर करत त्यातून सुरक्षा दोरी ओवून घेतली. भरपूर आत्मविश्वासाने तिने तो टप्पाही सर केला. एव्हाना तिची दमछाक झाली होती. कारण ऊन वाढले होते. हा टप्पा पार करताना खूप वेळा शरीराचं वजन हाताच्या नि पायाच्या बोटांवर पेलावं लागलं होत. उरलेला २० टक्के सुळक्याचा भाग हा पूर्ण सुटलेल्या दगडांनी भरलेला होता. तिला तिचं प्रत्येक पाऊल महत्त्वाचं होतं. संतोष निगडे आणि दत्तू शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तिने एक अँकर ठोकला. पुढच्या क्लायंबिंगला सुरुवात केली. आता तिच्या पायाखालून भरपूर दगड निसटत होते. तरीही तिने स्वत:चा थोडासाही तोल न जाऊ देता तो टप्पाही हळूहळू पूर्ण केला. आता माथ्यावर फक्त २० फुटांचं होतं. ते या चढाईच्या अनुभवापेक्षा जास्त भीतीदायक नव्हतं. याच वाटेवरचं शेवटचं अंतर भरपूर महत्त्वाचं होतं. ते मनाचा तोल ढळू न देता पूर्ण करायचं होतं. शेवटचं अंतर सोपं जरी असलं तरी ते काळजीपूर्वक हाताळणं गरजेचं असतं. अखेर तो क्षण आला. बघता-बघता नमिताने सुळक्याचा माथा सर केला.

या मोहिमेचं नेतृत्व संतोष निगडे आणि दत्तू शिंदे यांनी केलं. मोहिमेच्या छायाचित्रीकरणाची बाजू विनायक वाडेकर, रंजन गावडे, रवींद्र खुळे यांनी सांभाळली तर भाबल, अरिवद पोळ, मारुती यांनी सपोर्ट टीमची जबाबदारी चोख पार पाडली. एकंदर मोहीम म्हटली की टीमवर्क आणि त्यात सॅकची टीम नेहमीच चोख असते. या मोहिमेचं यश पाहता सॅकच्या महिला क्लायंबिंगला प्रोत्साहन देण्याचं ठरलं.

1 COMMENT

  1. Great work… namita and meghna… purushyanchya khandyala khande lavun aaj chi mahila kam karatach ahe… tumhi dongranchya khandyanvar chadun sulkyanche mathe sar karat ahat…. creditable… teach ur skills to new climbers..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version