Home संपादकीय अग्रलेख काँग्रेसमुक्त नव्हे, संघमुक्त

काँग्रेसमुक्त नव्हे, संघमुक्त

1

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भाजपाचा पराभव करण्याचे सूत्र नेमके सापडलेले आहे. पक्षीय अभिनिवेश न बाळगता, या देशातले जे जे राजकीय पक्ष भाजपाच्या विरोधात आहेत त्या त्या सर्व पक्षांनी भाजपाविरोधातील लढय़ासाठी एकत्र येण्याची तीव्र गरज आहे. तसे झाले नाही, तर येत्या पाच वर्षात या देशाच्या मूळ संकल्पनेला, सर्वधर्मसमभाव आणि परस्पर सर्व धर्माचा आदर या संकल्पनेला फार मोठा धक्का बसणार आहे.

हातात सत्ता मिळाल्यानंतर भाजपाचा घोडा चौखुर उधळलेला आहे. धर्मजातीचे राजकारण आणि भावनात्मक मुद्दय़ाला हात घालून या भाजपावाल्यांनी देशाचा मूळ ढाचा उचकटून टाकण्याचा चंग बांधलेला आहे. सत्ता मिळविण्यासाठी भाजपा धर्म वापरतो, जात वापरतो, देवही वापरतो आणि नंतर मोठी फसवणूक करतो, हे राममंदिराच्या निमित्ताने सिद्ध झालेले आहे. केवळ राममंदिराच्या आश्वासनाचे भांडवल करून सत्तेवर बसलेल्या भाजपाने राममंदिर विषय टोलवून लावलेला आहे. आता जेव्हा उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका येतील तेव्हा या रामाला वनवासातून पुन्हा राजकारणात आणण्याचा प्रयत्न होईल. एकीकडे देवधर्माचा वापर आणि दुसरीकडे घटनेची मूलभूत चौकट मोडून-तोडून टाकण्याचा कार्यक्रम भाजपाने पद्धतशीरपणे हातात घेतला आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात भाजपा पुरस्कृत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा पराभव झाल्यानंतर जो धिंगाणा घालण्यात आला, त्यामुळे सोयीची असेल तर लोकशाही, नाही तर ठोकशाही ही भाजपाची विचारधारा आता लपून राहिलेली नाही. हाणा, मारा, ठोका हीच आता भाजपाची भूमिका स्पष्ट झालेली आहे. ज्या भ्रष्टाचाराच्या विरोधात भाजपा सत्तेवर आला तो भ्रष्टाचारही आता खुलेआम सुरू आहे. या सगळय़ाचा परिणाम आज देशाची सगळी सूत्रे संघाच्या ताब्यात गेली आहेत. मोदी हे कळसूत्री बाहुले आहे. दो-या संघाच्या हातात आहेत आणि संघ ही बुरसटलेली प्रतिगामी संघटना आहे. संघाने पोषाख बदलला म्हणजे त्यांच्या विचारात बदल होतो अशी स्थिती अजिबात नाही. त्यामुळे भाजपाच्या मागे छुपा असलेला संघ आणि त्या संघांची धोरणे आज देशात एक अस्वस्थता निर्माण करीत आहेत.

नितीश कुमार यांनी हा धोका नेमका ओळखलेला आहे. संघाच्या ताब्यात देश जर असाच कायम राहील तर उद्या भारतीय घटनेचे तुकडे होतील आणि या देशात एक भयानक अराजक निर्माण केले जाईल. आजच देश अस्वस्थ आहे. दिलेले कोणतेही आश्वासन पूर्ण?पाळले गेलेले नाही. एवढेच नव्हे तर प्रत्येक विषयात मोदींनी आणि भाजपाने जनतेची फसवणूक केलेली आहे. फसवणुकीच्या विरुद्धचे इंडियन पीनल कोडमध्ये ४२० हे कलम आहे. भाजपा आणि पंतप्रधान मोदींनी फसवणूक केल्याबद्दल हे कलम थेट लावता येईल. जनतेचा असा रेटा बाहेर निर्माण करण्याकरिता नितीश कुमार यांनी पुढाकार घेतला त्याचे स्वागतच व्हायला पाहिजे. जे जे संघांच्या विरोधात आहेत त्या सर्वानी एकत्र येण्याची गरज आहे. एक काळ असा होता की, देशातले सगळे पक्ष काँग्रेसच्या विरुद्ध एक होत होते. अनेक वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसने घटनेचे पावित्र्य कधीही बिघडवले नव्हते. देशातल्या सगळय़ा जातीधर्माना समान आदराने वागविले आणि या देशातील जागतिक पातळीवरची प्रतिमा ‘सेक्युलर डेमॉक्रेटिक इंडिया’ अशीच कायमची जपली. आज तोच ‘सेक्युलॅरिझम’ धोक्यात आलेला आहे आणि नितीश कुमार यांची भूमिका भारतीय लोकशाहीचे संरक्षण करणारी आहे. मोदींना काँग्रेसमुक्त भारत करायचा आहे आणि काँग्रेस संस्कृती नष्ट करायची आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे जे एकत्रितपणे लढले. त्यात हिंदू, मुस्लीम, शीख, पारसी, इसाई सर्व?जातीधर्माचे नेते होते. ती काँग्रेसची संस्कृती आहे. ती नष्ट कशी होईल? पण मोदींची घोषणा आहे की, काँग्रेसमुक्त भारत करू, ते कधीही शक्य होणार नाही. उलट देश संघमुक्त करण्यासाठी आता सर्व पुरोगामी विचार करणा-यांची आवश्यकता आहे. देशात फुटीरतावाद निर्माण करण्याचे प्रयत्न भाजपा आज जाणीवपूर्वक करीत असताना धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येण्याची कधी नव्हे ती आज गरज आहे. जातीय सलोख्यावर भाजपाचा विश्वास नाही. त्यामुळे आज देशात अस्वस्थता आहे. मोदींच्या हातात देशाची सूत्रे आहेत आणि मोदी भाषणात जे बोलतात त्याच्या नेमके विरुद्ध वागतात, त्यामुळे पंतप्रधानांवर विश्वास ठेवणे देशाचा घात होण्यासारखे आहे.

देश संघमुक्त करायचा म्हणजे नेमके काय करायचे? संघ हा दिसत नाही, तो छुपा आहे. सत्तेवर बसलेल्या भाजपाच्या धोरणात संघाची धोरणे मिसळून भाजपाकडून हव्या त्या भूमिका संघ बोलायला लावतो. संघाचे आजचे प्रमुख मोहन भागवत यांनी आरक्षणाच्या विरोधात संघाच्या मनातील खदखद व्यक्त करून टाकलेलीच आहे. कारण संघाला चातुर्वण्र्य हवाहवासा वाटतो. संघामधले सर्व पदाधिकारी उच्चवर्णीय आहेत. हेडगेवारांपासून भागवतांपर्यंत जे जे संघप्रमुख झाले त्यात समाजातल्या सामान्य जातीचा कोण? संघ हिंदुत्ववादी आहे, पण त्या हिंदुत्ववादामध्ये संघ सातत्याने ब्राह्मणवाद जपतो. त्यामुळे हेडगेवार ते भागवत असा सरसंघचालकांचा सगळा गोतावळा हा उच्चवर्णीयांचा आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी संघाने काय त्याग केला? संघाचा कोणता नेता स्वातंत्र्य चळवळीत आघाडीवर होता? आघाडीचे सोडून द्या, पिछाडीवर तरी कोण होते? एकाचे तरी नाव सांगा! हे सगळे ब्रिटिशांचे चाटू होते. कारण ब्रिटिशांना हिंदू-मुस्लीम अशी फाळणी हवीच होती. हेडगेवारांनी हिंदूंची संघटना उभी करतो म्हटल्यावर ब्रिटिशांनी त्यांना पाठिंबा दिला. हिंदू-मुस्लीम या दुहीची सुरुवात संघापासून झाली. फाळणीची बीजे संघस्थापनेच्या विचारातून झिरपलेली आहेत. हिंदूची संघटना संघ करू पाहत असेल तर त्यातूनच मुस्लीम संघटनेचा विचार पुढे आला, हा संघाचा इतिहास आहे. स्वातंत्र्य चळवळ चालू असताना १९२५ ते १९४७ , बावीस वर्षात संघ शाखेवर एकदाही ‘छोडो भारत’, ‘चलेजाव’ ही घोषणा देण्यात आलेली नाही. १५ ऑगस्ट १९४७ साली देशभर राष्ट्रध्वज फडकला पण संघ शाखेवर राष्ट्रध्वज फडकला नाही. संघाच्या ९१ वर्षात एकदाही स्वातंत्र्य मिळाल्यापूर्वी आणि नंतर १५ ऑगस्ट आणि देश प्रजासत्ताक झाल्यावर २६ जानेवारीलाही राष्ट्रध्वज फडकलेला नाही. संघाचे जे प्रात:स्मरण आहे, त्यात हेडगेवार आहेत, पण शाहू, फुले, आंबेडकर नाहीत. संघ हा प्रतिगाम्यांचा अड्डा आहे आणि म्हणून नितीश कुमार यांनी हा देश संघमुक्त करण्याचा जो आवाज दिला आहे, तो बुलंद करण्याची तीव्र गरज आहे. नितीश कुमार आगे बढो, देश तुम्हारे साथ है.

संघमुक्त भारत या कल्पनेमध्ये काँग्रेस, दोन्ही कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, जनता पक्ष, तृणमूल काँग्रेेस, ओरिसातील बिजू?जनता दल, डीएमके, एडीएमके, महाराष्ट्रातला राष्ट्रवादी असे जे जे पुरोगामी भूमिका घेणारे राजकीय पक्ष आहेत त्या सर्व?राजकीय पक्षांनी आपले व्यक्तिगत मतभेद बाजूला ठेवून, २०१९च्या निवडणुकीत किंवा त्यापूर्वी निवडणूक झाली तर, भाजपाला पराभूत करण्यासाठी सगळय़ा शक्तीने मैदानात उतरले पाहिजे. कारण संघ आणि भाजपा हा देशाचा, लोकशाही, घटनेचा आणि सर्वधर्मसमभावाचा सगळय़ात मोठा शत्रू आहे. भाजपाचा पराभव होणे म्हणजेच देश संघमुक्त होणे. जर हे घडले नाही तर, देशात पुन्हा एकधर्मीय राजवट आणण्याचा भाजपा प्रयत्न करील. एका धर्माचे, एका जातीचे, एका विचाराचे आणि एका टोळीचे राज्य या देशावर स्थापन करण्याचा हा डाव आहे. तो उधळून लावणे अत्यंत गरजेचे आहे. उद्याच्या पिढीसाठी तरी. एका धर्माचा भारत, एका जातीचा भारत हा संकुचित विचारच घातक ठरेल. तरुण पिढी जात-पात मानणारी नाही, धर्म मानणारी नाही. हे जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील निवडणुकीत विद्यार्थ्यांनीच दाखवून दिलेले आहे. त्याच विद्यार्थ्यांसाठी संघमुक्त भारत हवा आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version