Home रिलॅक्स काय भुललासी वरलिया रंगा!

काय भुललासी वरलिया रंगा!

0

देशातल्या विविध सत्तागृहांतल्या, जवळपास साडेचौदाशे सदस्य, आसनधारकांनी आपल्या निवडणूक प्रमाणपत्रांतच मुळी त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्य़ांची माहिती दिली आहे.. 

चाल : गं कुणी तरी येणार येणार गं..)
हो कुणी तरी जाणार जाणार हो,
काही तरी गमवावं लागणार हो
घरी परत जावंच लागणार हो
केल्या गुन्ह्याची शिक्षा मिळता, खुर्ची जाणार हो
काळ्या तोंडानं मान खाली घालून स्वगृही परतणार हो
हे अत्याचारी, बलात्कारी
खुनी नि भ्रष्टाचारी, जाणार जाणार हो
देशातल्या विविध सत्तागृहांतल्या, जवळपास साडेचौदाशे सदस्य, आसनधारकांनी आपल्या निवडणूक प्रमाणपत्रांतच मुळी त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्य़ांची माहिती दिली आहे.. आणि केरळस्थित थॉमस नामक एका महिलेनं, अनेक वर्षापूर्वी दाखल केलेल्या याचिकेवर १० जुलैला सर्वोच्च न्यायालयानं आपला निर्णय देताना सज्जन नागरिकांना आपल्या मुजोर, अनाचारी वागणुकीच्या जात्यात वर्षानुर्वष भरडणाऱ्या दुष्कीर्त रावणांना जॅमर लावण्याच्या दृष्टीनं टाकलेलं हे पाऊल म्हणजे सर्वसामान्य जनतेला दिलासा म्हणावा का..?
हुरळून जाऊ नका जन हो..

नुसता गुन्हा दाखल होऊन भागणार नाहीये. त्याची सजासुद्धा सर्व न्यायालयीन प्रक्रियेनंतर तपास यंत्रणांकडून साक्षीपुरावे शोधून, ते सादर करून, संशयिताला बचावाची संधी देऊन, चढत्या भाजणीतल्या प्रत्येक न्यायालयानं ते ग्राह्य धरून, संशयिताला गुन्हेगार घोषित केल्यावर.. हुश्श.. मग पदाधिकाऱ्याला संबंधित सभागृहाची सदस्यता सोडावी लागेल. यामध्ये किती र्वष जातील.. पाच.. दहा.. पंधरा.. वीस..?प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांची संख्या जमेस धरता, अखेपर्यंत, सदस्य अनभिषिक्तसम्राटासारखे आपले लोकशाहीदत्त अधिकार अनिर्बंधपणे वापरू शकणार..झाला भ्रमनिरास मित्रांनो..?

सद्यकाल हा एक वासनाकांडाधिष्ठित कालखंड आहे की काय, अशी शंका यावी इतपत बातम्या रोज, मुद्रित किंवा अन्य ध्वनी, चित्र माध्यमांतून वाचाय-ऐकाय-बघायला मिळतायत. खरंच आहे का हे.. मुळीच नाही..जेव्हापासून माणूस नावाचा प्राणी, वन्यजीवांपासून अनेक स्थित्यंतरांनंतर, उत्क्रांत होत गेला, तेव्हापासून श्वापदांच्या सगळ्या गुणावगुणांना, उत्क्रांत मेंदूस्थित बुद्धीची जोड देऊन हा प्राणी नवनवीन क्लृप्त्या शोधून त्यांचा अवलंब करायला लागला, सत्कृत्यांबरोबरच दुष्कृत्यांसाठीही!!तुम्ही जर बारकाईनं निरीक्षण कराल तर तुमच्या लक्षात एक गोष्ट येईल की, जंगलराजमध्ये पाप या संकल्पनेला स्थान नाही.

सगळ्या क्रिया उदरभरण किंवा स्वसंरक्षण किंवा प्रजोत्पादनाशी निगडित असतात. पण कारण नसताना, केवळ मनाची भूक म्हणून खोडी काढणं, चोरी करणं, विकृत वागणं, हे सर्व मर्कटांपासून माणसापर्यंत आलं. मग त्यातून आलं पाप. कारण ग्राह्य आणि निषिद्ध असे परस्परविरोधी नियम या बुद्धिप्राप्त प्राण्यानंच निर्माण केले, समूहानं जगताना, ते आवश्यक असतात म्हणून..पण हे नमनाला घडाभर तेल कशासाठी बरं!

हे आवश्यक होतं कारण आता मी जो मुद्दा उद्धृत करणार आहे तो महिलावर्गाच्या कितपत पचनी पडेल माहीत नाही..माणूस म्हटला की स्त्री-पुरुष हे दोन घटक आलेच. विकृती, मत्सर, सूड भावना हे अवगुण दोघांनाही अगदी निसर्गदत्त, पण पुरुष तुलनेनं बलवान तर स्त्री सर्वसामान्यत: नाजूक म्हणून मान्यताप्राप्त.. त्यामुळे तिला समाजाकडून सहानुभूती आणि संरक्षण स्वाभाविकरीत्या मिळत गेलं. पण त्या सहानुभूती आणि संरक्षणाच्या हक्काचा गरफायदा अगदी पुराणकालापासून स्त्रिया घेत आल्यात.

वानगीदाखल, पुराणांत सर्वश्रुत आहे त्याप्रमाणं रंभा, उर्वशी, मेनका आदी अप्सरा ऋषिमुनींचा, योग्यांचा, तापसांचा आकृतीबंधाचा उपयोग करून त्यांचा समाधीभंग करून त्यांना फशी पाडत. पुण्यात्म्याचा पापात्मा करून आयुष्यातून उठवण्याचं काम देव नावाची जमात करत असे. भस्मासुराचा वध करण्यासाठी तर देवाधिराज देव संकटविमोचक चक्रधारी विष्णुपंतांचा काही इलाज चालेना, तेव्हा चक्क मोहिनी म्हणजे आकर्षक स्त्रीरूपच धारण करायला लागलं.

आपल्या स्त्रीत्वाचा असा फायदा घेऊन पुरुषांचं शोषण करत मोकाट सुटलेल्या काही स्त्रियांचा पर्दाफाश सोनी वाहिनीवर, ‘क्राइम पॅट्रोल’मध्ये अनुप सोनीनं आणि ‘लाइफ ओके’ वाहिनीवर मोहनीश बहलनं सूत्रसंचालकाचं काम चोखपणे करताना केला.या दोन्ही सत्यघटनांवर आधारित कथांपैकी एका कथेत, विवाहोत्तर पतीवर अत्याचाराचे खोटे आरोप करीत पैसे उकळत उधळलेल्या एका सुस्वरूप स्त्रीची कृष्णकृत्य दाखवली होती. आणि असे, वरलिया रंगा भुललेले किती नवरे तर चक्क तीन.. वेगवेगळ्या शहरांमधले आणि लुटलेली रक्कम.. तब्बल दीड कोटी..

दुस-या कथेत एका सरळमार्गी डॉक्टरला पैसे-प्रतिष्ठेच्या लोभापोटी फशी पाडून, विवाहोत्तर, मधुचंद्रहेतु प्रवासादरम्यान, पतीनं चालत्या गाडीतून ढकलल्याचा कांगावा करीत, आपल्या विवाहपूर्व प्रियकराला पूर्वनियोजित ठिकाणी जाऊन भेटणाऱ्या अबले (?)च्या घृणास्पद, विकृत मनोवृत्तीचं यथार्थ दर्शन होतं.विपर्यस्त कल्पित कथा मांडणाऱ्या मालिकांपेक्षा, असं काही समाजाला सावध करणारं बघितलं की, या माध्यमाची महती कळते..

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version