Home रिलॅक्स गीता दत्त नावाचा पाऊस

गीता दत्त नावाचा पाऊस

1

पाऊस, सृष्टीला हिरवं लेणं देणारा, पाऊस ग्रीष्माची तलखी शमवणारा, पाऊस चहा-भाजीची खुमारी वाढवणारा आणि पाऊस हूरहूर वाढवणारा.. या काळातला निसर्ग सृजनशीलतेला अनुकूल; पण अशा वेळी या दुनियेतून कोणी ‘एग्झिट’ घेतली तर? हो, अशाच एका पावसाळय़ात २० जुलै १९७२ रोजी गीता दत्त नावाच्या गायिकेने या संगीतविश्वाचा, रसिकांचा आणि या जगाचा अखेरचा निरोप घेतला. मृत्यूसमयी तिचं वय होतं अवघं ४२ वर्ष. इतक्या अवेळी आणि इतक्या घाईने गीता दत्त का निघून गेली, याचं उत्तर एकच, अलौकिक कलागुणांची श्रीमंती असणा-या कलावंतांना या पृथ्वीवर फार काळ राहण्याची मुभा नाही. अल्पायुष्याचा हा शाप असलेली गीता दत्तही रसिकांच्या जीवाला चटका लावून गेली.

पावसाळय़ात दाटून येणा-या ढगांबरोबर काळजात खूप काही दाटून येतं. म्हणजे व्याकुळता गडद करणा-या अनेक गोष्टी, उदा. राज कपूरचा ‘बरसात’, मीनाकुमारीचा ‘पाकीजा’, मधुबालाचा ‘मोगले-ए-आझम’ आणि त्याचवेळी गीता दत्तचे अनवट सूर कातरता वाढवतात. लौकिक अर्थाने गीता दत्त गेली या घटनेला ४१ वर्षे उलटून गेली तरी तिच्या आवाजाची जादू कायम आहे.

ललिता पवारचे पती हनुमानप्रसाद यांनी प्रथम गीता दत्तला (त्या वेळची गीता रॉय) गाण्यासाठी पहिला ब्रेक दिला. ते साल होतं १९४६. १९४६ ते १९६६ या २० वर्षाच्या काळात गीता दत्तने अनेक प्रकारची, वेगवेगळय़ा ढंगाची, मूड्सची आणि बाजाची गाणी गायिली. मात्र तिच्या आर्ततेचं गारुड मनाला व्यापून उरतं. ओहोटीच्या लाटांनी समुद्रात आत-आत आपसूक ओढून न्यावं, तशी तिच्या आवाजातली आर्तता, विरह-वेदनेच्या डोहाकडे ओढून नेणारी, तगमग वाढवणारी तरीही हवीशी वाटणारी. ‘‘आज सजन मोहे अंग लगा लो, जनम सफल हो जाए’ हे गुरुदत्तच्या ‘प्यासा’मधलं गीत. ‘प्यासा’ शीर्षकाची तृषार्तता अधोरेखित करणारा गीताचा या कवनातला आर्जवी आवाज आजही व्याकुळ करत जातो.

ज्या अतृप्तीच्या बेहोषित गुरुदत्तने ‘प्यासा’, ‘कागज के फूल’, ‘साहेब बिबी और गुलाम’सारखे अविस्मरणीय चित्रपट काढले, त्याच अतृप्तीचा स्पर्श गीता दत्तच्या ‘मेरा सुंदर सपना बीत गया’, ‘वक्त ने किया, क्या हँसी सितम’, ‘तुम रहे ना तुम, हम रहे ना हम’सारख्या गाण्यांतून जाणवतो. हे गाणं ‘कागज के फूल’ चित्रपटात वहिदा रहेमानवर चित्रित केलं असलं तरी ते गाणं तितकंच गीता दत्तचंसुद्धा आहे. वहिदाच्या चेह-यावरचा दु:खाचा गहिरा भाव गीता दत्त अधिकाधिक गडद करते. संगीतक्षेत्रात आणि व्यक्तिगत आयुष्यात गीताच्या वाटय़ाला आलेली उपेक्षेची आच या गाण्यात थेट उमटताना दिसते.गीता दत्तच्या आवाजातला दर्द जसा घायाळ करतो, तसंच शालिनतेची डूब असलेली तिच्या आवाजातली मादकताही मनाला भावुन जाते.

‘बागी’मधलं गीता बालीवर चित्रित केलेलं ‘तदबीर से बिगडी हुई, तकदीर बना ले’हे गाणं ऐकताना गीता बालीच्या चेह-यावरचा खटय़ाळपणा अधिक मोहक की, गीता दत्तच्या आवाजातला नाद अधिक मोहक असा संभ्रम पडतो. या गाण्यात गीता बालीच्या चेह-यावरची एकेक मिष्कील रेषा गीता दत्तच्या आवाजाने टिपली आहे. गीता बालीचा चेहरा आणि गीता दत्तचा आवाज याचं एक भन्नाट कॉकटेल ‘बाजी’मधल्या या गाण्यात जमून आलं आहे. म्हणूनच त्या गाण्याची गोडी आजही अवीट आहे. गीता दत्तची किती गाणी आठवावी? ‘आँखो ही आँखो में इशारा हो गया’, ‘जाता कहाँ है दिवाने’ यातला खोडकर इशारा असो, की ‘नन्ही कली सोने चली’ या अंगाई गीतातला मृदुल गारवा असू दे, गीताच्या परिसस्पर्शाने गाण्याचं सोनं होतं. ‘बचपन के दिन भी क्या दिन थे’, म्हणताना शब्दश: फुलपाखराची नवथर थरथर गीता दत्तच्या आवाजातून जाणवायची.

‘हावडा ब्रीज’मधलं मधुबालावर चित्रित केलेलं ‘मेरा नाम चीन् चीन् चू’ असो की, ‘हूँ अभी मैं जवाँ ए दिल’सारखी उडत्या चालीची गाणी असोत. गीता दत्त गायली मोकळ्या गळ्याने. उडत्या चालीची जलद लय पकडताना आवाजातलं लालित्य तिने पणाला लावलं. तिने गाण्यातल्या भाववृत्तीला ज्या ताकदीने न्याय दिला आहे, त्यावरूनच तिच्या प्रतिमेची ओळख पटते. तिच्या आवाजात एकसुरीपणा कधीच जाणवला नाही. गीता बाली असो, मधुबाला असो वा मीना कुमारी प्रत्येक व्यक्तिरेखेची अचूक नस गीता दत्त पकडत असे. ‘साहब बिबी गुलाम’मधील ‘न जाओ ..’ गाताना पतीला भेटण्याची आतुरता मधाळपणे ठिबकते गीता दत्तच्या आवाजातून.

गीता दत्तच्या गाण्याबद्दल लिहिताना तिच्या गाण्याच्या कोणत्या पैलूबद्दल लिहावं, असा प्रश्न पडतो, तिच्या आवाजात मादकता होती, पण संयत अन् जीवघेणी. ‘बाबूजी धीरे चलना’सारख्या गाण्यांनी तर काळजाचा ठोका चुकावा, पण तोच मादक, मदिर आवाज ‘मै तो प्रेम दिवानी’, ‘मेरा दर्द न जाने कौन’ किंवा ‘घुंघट के पट खोल तोहे पिया मिलेंगे’ अशा भजनांमध्ये तितकाच लीन-तल्लीन होताना दिसतो. तिच्या भजनातली तन्मयता वियोगीनीच्या दु:खालाही भारदस्तपणा देते.

गीता दत्तने पुरुष गायकांसोबतही तितक्याच आत्मविश्वासाने गाणी गायिली. ‘खयालो में किस के इस तरह आया नहीं करते’ हे ‘बावरे नैन’मधलं गीत मुकेशबरोबर गाताना त्याच्या दमदार आवाजाला ताकदीने साथ दिली. तशीच ‘न ये चाँद होगा ना तारे रहेंगे’ गाताना हेमंतकुमारच्या भारदस्त आवाजापुढे ती दबली किंवा कोमजली नाही. ‘हम आप की आँखो को इस दिल में बसा ले तो’ या महंमद रफीबरोबरच्या गाण्याला खेळकर साथ देणारी गीता दत्त असते.

गीता दत्तने मराठी गाणीसुद्धा गायिली आहेत, हे किती रसिकांना माहिती आहे? ‘मुक्या मनाचे बोल सजना, बोल झाले फोल’ किंवा ‘जा सांग लक्ष्मणा सांग रामराजाला, म्हणावे न्या तुझा सीतेला’ ही मराठी गाणी गाणारी गीता दत्तच होती यावर विश्वास बसत नाही. इतकी विविधता लालित्य आणि फिरत तिच्या आवाजात होती. याशिवाय ‘तूने छेडी बासुरी काना’सारखी बिगर फिल्मी गीतंसुद्धा गायिली आहेत.

गीता दत्तने संगीतविश्वात आपल्या सुरांनी चौफेर सैर केली. गाण्याच्या आशयाला आपल्या वैविध्यपूर्ण सुरावटींनी न्याय दिला. आपल्या विशिष्ट आवाजाची छाप संगीतक्षेत्रात उमटवली होती. असं असूनही तिच्या वाटय़ाला फार प्रसिद्धी आली नाही. कदाचित व्यक्तिगत आयुष्यातली वादळं आणि अल्पायुष्य यामुळे ती फार काळ प्रसिद्धीच्या झोतात राहू शकली नाही. शोकसम्राट गुरुदत्तच्या नावाने आजपर्यंत सिने रसिकांनी खूप गहिवर घातला, तो अप्रस्तुत किंवा खोटा नक्कीच नाही; परंतु गुरुदत्त नावाच्या शोकांतिकेचा गीताही एक हिस्सा होती. याचा साऱ्यांना सोयीस्कर विसर पडला. ‘जिन्हे नाझ है हिंदपर वो कहाँ है’ असं म्हणणारा गुरुदत्त, स्त्रीजीवनाचं वास्तव आपल्या कॅमे-याच्या तीक्ष्ण डोळ्यांतून टिपणारा गुरुदत्त गीताला स्वत:च्या चित्रपटांखेरीज इतरत्र गाऊ देत नव्हता, हे वास्तव नाकारता येत नाही.

संगीतक्षेत्रात आणि व्यक्तिगत आयुष्यातही तिच्या वाटय़ाला उपेक्षाच आली. ज्या मधूर-मदिर आवाजावर लुब्ध होऊन गुरुदत्तने गीता दत्तशी प्रेमविवाह केला होता, त्याच गीताला त्याने वहिदा आयुष्यात आल्यानंतर दुरावलं होतं. कदाचित एकाकीपणाचा, हा उदासवाणा प्रवास तिला जलद गतीने मृत्यूकडे घेऊन गेला असावा. आजही झिम्माड पावसाचा खिडकीबाहेरचा चंदेरी पडदा चिरून जेव्हा गीता दत्तचा आवाज कानावर पडतो, तेव्हा अवघं काळीज आभाळ होतं. अशाच पावसात गीता दत्त गेली, गाण्यांचा पाऊस मागे ठेवून.

1 COMMENT

  1. आपण सुरेख लिहिला आहेत हा लेख. आवाजाचे वर्णन अतिशय योग्य रीतीने केले आहे. इतर सुद्धा लेख वाचले पण हा इतका मनाला का भावला माहित नाही. आवाजातील आर्जव,शालीनता तरी मादकता, विरहार्तता, विशिष्ट धाटणी, आवाजातील कंपने आणि काळीज चिरून जाणारा एक वेगळाच भाव, ती खोल डूब, आणि गायन अर्थात वरवरचे नसे. कुठल्याही भावनेची खोली फार होती गीता दत्त च्या आवाजात. पुन्हा आवाजाचा पोत वेगळाच. अष्टपैलुत्व असूनही गायकी अतिशय भारदस्त होती, एक फार परिपक्वता होती भावनांची, आवाजात देखील.जरी लाडिकपणा असला तरी छाचोरपणा नव्हता. आर्तता आणि गोडवा देखील कधी नाटकी/ कृत्रिम/ओढूनताणून नाही वाटली. गुरुदत्त च्या चित्रपटातील सगळीच गाणी, नय्यर सोबत ची गाणी, अनुभव, बादबान-१९५५ ची गाणी अतिशय सुरेख आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version