Home रिलॅक्स काव्यदर्शिका आणि बालदर्शिका

काव्यदर्शिका आणि बालदर्शिका

1

एकेकाळी रंगीबेरंगी कॅलेंडर्स भिंतीवर लागायची. आता ती लुप्त झाली. हल्लीच्या भाषेत ती डाऊन मार्केट झाली. अशा वेळेस मराठी काव्यदर्शिका आणि बालदर्शिका काढणं धाडसाचेच, पण मराठी साहित्य संस्कृतीचा प्रसार हेच जीवनध्येय ठरवलेल्या किशोर शिंदे या तरुणाने मात्र हे धाडस केलं. यात तो यशस्वीही झाला.

मराठी साहित्याची विलक्षण ओढ असलेल्या २८ वर्षीय किशोर शिंदे याने नेहमीच चाकोरीबाहेरची कामे केली. वयाच्या आठव्या वर्षी साहित्य वाचनाला सुरुवात केलेल्या किशोरने सोळाव्या वर्षी ‘कोसला’ वाचली तेव्हा तो भारावून गेला. मराठी साहित्य आणि कवितांवर प्रेम असलेल्या किशोरला बोरकरांपासून ग्रेसपर्यंतचे कवी मुखोद्गत आहेत. ग्रेसची काव्यं किशोरच्या खास आवडीची.

आवडीचं रूपांतर व्यवसायात करावंसं किशोरला वाटलं. पत्रकार म्हणून मुंबईत ‘तरुण भारत’ इथे नोकरी करताना नऊ वर्षापूर्वी किशोरला कवितांचे कॅलेंडर करावे ही कल्पना आली. तेव्हा किशोरने कवी ग्रेस यांना ही कल्पना ऐकवली. कवी ग्रेस यांनी तेव्हा किशोरला वडिलकीच्या नात्याने सल्ला दिला. ‘हे भलते साहस करायचे तुझे वय नव्हे. प्रथम आयुष्यात स्थिर हो.’ आर्थिक स्थैर्य असेल तरच कुठचंही साहस करण्यात अर्थ आहे. हा कवी ग्रेस यांचा सल्ला ऐकून किशोरने जनसंपर्क अधिकारी आणि मराठी चित्रपटांच्या प्रसिद्धीचा व्यवसाय सुरू केला.

अल्पावधीत मेहनती, साहित्याची जाण आणि मराठीवरील निरतिशय प्रेमाने किशोरचा यात जम बसला. तो पुण्यात स्थिरावला आणि किशोरने काव्यदर्शिका काढण्याचे स्वप्न पूर्ण केले. महिनाभरात काव्यदर्शिकेच्या दोन हजार आवृत्त्या संपल्या. मराठी रसिकांनी किशोरच्या या कल्पनेला अभूतपूर्व प्रतिसाद दिला. त्यानंतर किशोरने २०१२ साली मराठी कवयित्रींच्या कवितांची दर्शिका प्रसिद्ध केली. हौस म्हणून जरी हे त्याने केले, तरी खिशाला तोशीस लागणार नाही आणि विक्रीतून मिळालेल्या पैशातून सारा खर्च निघेल असं गणितही किशोरने उत्तम जमवलं.

भालचंद्र नेमाडे यांच्या अमृतमहोत्सवी आणि त्यांच्या ‘कोसला’च्या सुवर्णमहोत्सवी किशोरने वेगळीच कल्पना लढवली. नेमाडेंच्या संवत्सरानिर्मितीने त्याने लेखकाच्या नावाने शक सुरू केला. एक लेखक एक वर्ष- पहिल्या वर्षी नेमाडय़ांच्या कोसलातील प्रवेश नेपथ्यासहित त्याने नाटय़रूपाने बसवले. त्यांच्या देखणी कविता संग्रहातील काही कविता निवडून त्यांचे सादरीकरण केले. या दोन्ही साहित्य रूपांसाठी त्याने अनुरुप सेट तयार करून घेतला. याचा पहिला प्रयोग ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात बेळगावच्या आर.पी.डी. कॉलेजात केला. त्याचे ‘एक लेखक-एक वर्ष’ ऑक्टोबर ते सप्टेंबर असं आहे. किशोरने पुण्यात ‘सहित’ ग्रुप बनवून ‘सहित’चा एक अभिनव प्रयोग केला. त्यात कोसलातील चार प्रमुख पात्रे पांडुरंग सांगवीकर, मधुमिलिंद, गिरिधर आणि बबताबुवा यांच्या माध्यमातून कादंबरीतील प्रवेश सादर होतात.

मराठी साहित्यात काही वेगळे आणि नवे देणग्या किशोरने मग सहित प्रकाशनतर्फे नववर्षाचे स्वागत बालदर्शिकेने करावयाचे ठरवले. पहिल्यांदाच असा प्रयोग घडला. बालदर्शिका प्रकाशित झाली. या दिनदर्शिकेत कविता, गाणी, चित्रे होती. कवी मंगेश पाडगावकरांच्या हस्ते या पहिल्यावहिल्या बाल दर्शिकेचे प्रकाशन झाले. यात एक कोरे पानही होते. लहान मुलांनी यावर चित्र काढून स्वत:ची दिनदर्शिका रंगवावी म्हणून ही कल्पना वापरण्यात आली.

किशोरने पहिली काव्यदर्शिका २०१०मध्ये प्रसिद्ध केली. त्यात साठोत्तरी महत्त्वाचे कवी विं.दा. करंदीकर, मंगेश पाडगावकर, अरुण कोलटकर, शांता शेळके यांचा समावेश होता. सहितने प्रकाशित केलेल्या पुस्तकांत त्यांचे पहिले पुस्तक म्हणजे विकास सबनीस यांचे व्यंग नगरी हे पहिले
ई-बुकही आहे. सहित प्रकाशनच्या इतर पुस्तकात हिरवे गाणे, दुराशा-परिवर्तनाच्या वाटेवर मुस्लीम समाज (अस्लम जमादार) सुपरस्टार खन्ना यांचा समावेश आहे. सहितने निवडक मराठी साहित्याचे कोकणी आणि कन्नड भाषेत तसेच कोकणी आणि कन्नड साहित्याचे मराठीमध्ये अनुवाद करण्याचे काम सुरू केले आहे.

२०१६च्या सहित काव्यदर्शिकेच्या पहिल्या पानावर सुरेश भटांची कविता तर आतील पानात प्रदीप निफाडकर, इलाही जमादार, दिलीप पांढरपट्टे यांच्या गझल आहेत. तसेच प्रत्येक पानावर शेर लिहिण्यासाठी जागा आहे. ‘सहित’तर्फे विशेष ‘पोएट्री पोस्टर’ उपक्रमात भालचंद्र नेमाडे, नारायण सुर्वे, वसंत डहाके, रमेश वेळुस्कर आणि अनंत भावे यांच्या कवितांचे आकर्षक पोस्टर प्रकाशित करण्यात आले. लवकरच या उपक्रमामध्ये अजून निवडक कवींची पोस्टर्स प्रकाशित होणार आहेत. ‘सहित’च्या रंगीत काव्यदर्शिका आणि बालदर्शिका या लहानथोरांमध्ये साहित्याची कवितेची गोडी रुजवण्याचे मोठे काम करत आहेत. अशा शब्दात कवी व गीतकार गुलजार यांनी ‘सहित’च्या कामाचे कौतुक केले आहे.

1 COMMENT

  1. ‘मुस्लीम कवींची मराठी कविता’ हा शोधप्रबंध लवकरच ईबुक स्वरुपात प्रसिद्ध होत आहे.

    जयसिंगपूर (कवितासागर वृत्तसेवा) कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात अभ्यासक किशोरकुमार काशिनाथ कांबळे यांनी डिसेंबर २००९ मध्ये पीएच. डी. (मराठी) पदवीसाठी सादर केलेला व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरकडून अधिकृतरीत्या मान्यताप्राप्त झालेला शोध प्रबंध ‘मुस्लीम कवींची मराठी कविता’ लवकरच ईबुक स्वरुपात कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर मार्फत प्रसिद्ध होत आहे. अशी माहिती प्रकाशक डॉ. सुनील दादा पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. ‘मुस्लिम कवीची मराठी कविता’ या संशोधनास देवचंद कॉलेज, अर्जुननगरचे यांचे मार्गदर्शन लाभले असून सदर संशोधनातील सहा प्रकरणात खालील बाबींचा समावेश करण्यात आला आहे…

    • प्रकरण पहिले – प्राचीन मुस्लीम कवींची काव्य परंपरा: प्रास्ताविक, मुस्लिमांचे भारतात आगमन, भारतात इस्लाम धर्माचा स्वीकार, पार्श्वभूमी, मुस्लीम मराठी संतांचा उदय, मुस्लीम मराठी संत, मुस्लीम मराठी शाहीर, आणि निष्कर्ष.

    • प्रकरण दुसरे – आधुनिक मुस्लीम कवींच्या मराठी कवितेचा उदय, विकास, स्वरूप व प्रेरणा: प्रास्ताविक, मुस्लीम साहित्याची पार्श्वभूमी, मुस्लीम साहित्य संकल्पना, मुस्लीम साहित्य व्याख्या, मुस्लीम साहित्याच्या प्रेरणा, मुस्लीम साहित्य प्रवाह, मुस्लीम कवितेचे स्वरूप आणि निष्कर्ष.

    • प्रकरण तिसरे – मुस्लीम मराठी कवितेचा आशय: प्रास्ताविक, सामाजिक आशय, धार्मिक – सांस्कृतिक आशय, राजकीय आशय, आर्थिक आशय, राष्ट्रीय एकात्मता, प्रबोधन, मानवतावाद आणि निष्कर्ष.

    • प्रकरण चौथे – मुस्लीम मराठी कवितेतील सांस्कृतिक संघर्ष: प्रास्ताविक, धर्मांतर, जातीयता, मूलतत्त्ववाद, उपरेपणाचं दु:ख, राष्ट्रनिष्ठा, मुस्लीम पुढा-यांचे राजकारण, मुस्लीम स्त्रियांचे प्रश्न, आणि निष्कर्ष.

    • प्रकरण पाचवे – मुस्लीम मराठी कवितेचे वाङमयीन मूल्यमापन: प्रास्ताविक, कवितासंग्रहांची शीर्षके, कवितासंग्रहांची अर्पणपत्रिका, मुक्तछंदात्मक रचना, संवादात्मक, भाषा, प्रतिमा – प्रतीके, गझलेचा रचनाबंध, गझलेतील विषय.

    • प्रकरण सहावे – उपसंहार

    डॉ. किशोरकुमार कांबळे यांच्या ‘मुस्लिम कवीची मराठी कविता’ या संशोधनात उपरोक्त बाबींचा समावेश आहे. जवळपास ७५० – ८०० पृष्ठांचा हा समिक्षा / संदर्भग्रंथ कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर यांच्या माध्यमातून ईबुक स्वरूपात प्रसिध्द होत आहे. मुस्लिम मराठी कवींचे छायाचित्र / फोटो व त्यांच्या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ सदर ग्रंथाच्या मुखपृष्ठावर प्रसिध्द करण्याचा विचार आहे. मराठी साहित्य आणि संस्कृती समजून घ्यायला अत्यंत उपयुक्त असलेला सदर ग्रंथ इंटरनेटच्या माध्यमातून जगभर वाचला जाणार आहे. अधिकृतरीत्या आय. एस. बी. एन. नोंदणीकृत असलेला ‘मुस्लिम कवीची मराठी कविता’ हा समीक्षा ग्रंथ मराठी साहित्य विश्वातली एक अजोड कलाकृती ठरला आहे.

    संपर्कासाठी पत्ता: कवितासागर प्रकाशन संस्था, जयसिंगपूर, सुदर्शन बिल्डिंग, प्लॉट # 16, पद्मावती हौसिंग सोसायटी, बायपास रोड, नांदणी नाक्याजवळ, जयसिंगपूर – ४१६१०१, पोस्ट – जयसिंगपूर, तालुका – शिरोळ, जिल्हा – कोल्हापूर, महाराष्ट्र. मुस्लिम कवींनी आपले छायाचित्र/पासपोर्ट आयडेंटीसाईज फोटो, आपला साहित्यिक परिचय व कवितासंग्रह / कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ पाठवून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

    • पुस्तक – मुस्लीम कवींची मराठी कविता (समीक्षा ग्रंथ)
    • ISBN – 978-81-929803-4-8
    • लेखक – डॉ. किशोरकुमार कांबळे (7385218021)
    • प्रकाशक – डॉ. सुनील दादा पाटील
    • प्रकाशन – कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर
    • संपर्क – 02322 – 225500, 9975873569
    • ईमेल – sunildadapatil@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version