Home महाराष्ट्र कोकण का चुकतायत डबल डेकरची गणिते?

का चुकतायत डबल डेकरची गणिते?

1

खरं तर गाडया वाढवण्यापेक्षा एकाच गाडीने एकाच फेरीत दोन गाडयांइतके प्रवासी वाहून नेणे आणि दोन गाडयांइतके उत्पन्न मिळवण्याच्या हेतूने डबल डेकरची संकल्पना पुढे आली आणि डबल डेकर रेल्वे गाडया प्रत्यक्ष रुळावर आल्या.
रत्नागिरी- खरं तर गाडया वाढवण्यापेक्षा एकाच गाडीने एकाच फेरीत दोन गाडयांइतके प्रवासी वाहून नेणे आणि दोन गाडयांइतके उत्पन्न मिळवण्याच्या हेतूने डबल डेकरची संकल्पना पुढे आली आणि डबल डेकर रेल्वे गाडया प्रत्यक्ष रुळावर आल्या. या गाडयांची सध्याची रचना मात्र संपूर्ण वातानुकूलित डब्यांची असल्याने एक्स्प्रेस आणि जनशताब्दी गाडयांपेक्षा त्यांचा प्रवास महागडा ठरला आहे. यामुळे या गाडयांना प्रवाशांकडून लाभणा-या अल्प प्रतिसादाचा मुद्दा पुढे आला आहे. कोकण रेल्वे मार्गावर चालवण्यात येणारी डबल डेकर गाडीही याचमुळे सध्या चर्चेचा विषय बनली आहे.

याआधी भोपाळ-इंदूर या गर्दीच्या मार्गावर चालवण्यात येणारी वातानुकूलित डबल डेकर गाडीही सुरू झाल्यापासून रिकामी धावू लागल्याने पश्चिम रेल्वेने ती वर्षभर गर्दीचा मार्ग असलेल्या मुंबई-गोवा मार्गावर चालवण्यासाठी मध्य रेल्वेकडे सुपूर्द केली.

या वर्षी मे महिन्यात तिची कोकण रेल्वे मार्गावर चाचणी यशस्वी झाल्यानंतर नुकत्याच संपलेल्या गणेशोत्सवात मुंबईतील लो. टिळक टर्मिनस ते करमळी (गोवा) दरम्यान विशेष डबल डेकर गाडी चालवण्यात आली. मात्र, ती नियमित डबल डेकरऐवजी प्रीमियम विशेष गाडी म्हणून चालवली गेल्याने अवाच्या सव्वा तिकीट दरामुळे या गाडीकडे प्रवाशांनी अक्षरश: पाठ फिरवली. याचा धडा घेऊन आता दिवाळीसाठी १६ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर या कालावधीत मुंबई-गोवा मार्गावर पुन्हा डबल डेकर गाडी जाहीर करताना ती नियमित डबल डेकर म्हणूनच जाहीर करण्यात आली आहे. असे केल्याने आता या गाडीला कसा प्रतिसाद मिळतो, याच्यावर ही गाडी कोकण रेल्वे मार्गावर नियमित धावणार की नाही, याचा निर्णय रेल्वेकडून घेतला जाणार आहे.

दरम्यान, डबल डेकर गाडी चालवताना जे सध्या मुंबई- अहमदाबाद मार्गावरील डबल डेकरबाबत होतेय त्याचाच कित्ता कोकण रेल्वे मार्गावर चालवताना गिरवला जातोय, असे दिसते. याचमुळे या गाडया गर्दीच्या मार्गावर चालवल्या जाऊनही त्यांना प्रतिसाद अल्प मिळताना दिसतो आहे.

अल्प प्रतिसादाची कारणे

डबल डेकर गाडी सामान्य रेल्वे गाडीपेक्षा उत्सुकतेचा विषय असताना आणि इतर गाडीपेक्षा एकाच फेरीत अधिक प्रवाशांची वाहतूक करून अधिक उत्पन्न मिळवून देणारी गाडी असताना तिला अपेक्षित भारमान नाही, असा विषय पुढे आला आहे. प्रवाशांचा डबल डेकर गाडीला प्रतिसाद नाही, ही स्थिती कोकणातून धावणा-या गाडीची नाही तर सध्या अहमदाबाद-मुंबई मार्गावर धावणा-या गाडीचीही कित्येक आसने खालीच असल्याचे दिसून येते. त्यामुळे एक तर या गाडीचे वेळापत्रक आखण्यात चुकतेय किंवा या गाडीच्या आधी कमी तिकिटात दुसरी गाडी उपलब्ध असल्याने प्रवासी तिकडे वळत असल्याचे निदर्शनास आले आहे. कारण मुंबई-अहमदाबाद डबल डेकर गाडीच्या आधी कर्णावती एक्स्प्रेस सुटते. ती अहमदाबादला पोहोचतेही लवकर. दुसरे म्हणजे डबल डेकरच्या तुलनेत या गाडीचे तिकीटही कमी आहे. आता अशी परिस्थिती कोकण रेल्वे मार्गावरील डबल डेकर गाडीबाबत झाली आहे. या गाडीच्या आधी दादरहून मडगावसाठी जनशताब्दी सुटते. ती गोव्याला पोहोचतेही डबल डेकरच्या आधी. जनशताब्दीने गोव्याला २७० रुपयांत जाता येते तर डबल डेकरचे तिकीट १०५५ रुपयांच्या जवळपास आहे. त्यामुळे प्रवासी कमी तिकिटात गोव्याला घेऊन जाणारी ही गाडी सोडून डबल डेकरने का जातील, याचा विचार रेल्वेने केलेला दिसत नाही.

1 COMMENT

  1. डबल डेक्कर गाडीचे तिकीट दर जास्त असल्याने त्या गाडीकडे प्रवाश्यांनी पाठ फिरवली असल्याचे दिसून येते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version