Home मध्यंतर भन्नाट किल्ले जीवधन

किल्ले जीवधन

1

आपल्या महाराष्ट्रात जीवधन नावाचे दोन किल्ले आहेत. पहिला पालघर जिल्ह्यातील विरार येथे असणारा जीवधनचा किल्ला. आज तो जीवदानी देवीच्या नावाने प्रसिद्ध पावलेला आहे. हा किल्ला आज आपले अस्तित्वच हरवून बसलेला आहे आणि दुसरा किल्ला आहे पुणे जिल्ह्याच्या व जुन्नर जिल्ह्याच्या सीमेवर वसलेला ऐतिहासिक काळातील पुरातन राजमार्ग नाणेघाटाचा रक्षक किल्ले जीवधन. नाणेघाटातल्या या चढाईविषयीचा हा लेख.

राजमार्ग नाणेघाटाच्या संरक्षणासाठी या किल्ल्याची निर्मिती केलेली होती. कोकाणातील चौल, कल्याण व शुर्पारक, आत्ताचे सोपारा या बंदरांचा जुन्नर व पैठण या व्यापारी केंद्रांचा संबंध त्या काळी नाणेघाटातून केला जाई. आजही नाणेघाटात एक भलामोठा दगडी रांजण आपल्याला पाहण्यास मिळतो.

कोकणातून नाणेघाटमार्गे येणा-या मालावरील जकातीची रक्कम या रांजणात साठवली जायची असे म्हणतात. तसेच प्रत्येक गिर्यारोहकाचे एक स्वप्न असते ते म्हणजे नाणेघाटमाग्रे जीवधनगडाचा एकदातरी ट्रेक करायचाच. आम्हीही याला अपवाद नव्हतो.

आमच्या ध्येयग्रुपने भर पावसाळयात नाणेघाट, किल्ले जीवधन, लेण्या व किल्ले शिवनेरीच्या ट्रेकचे आयोजन केले होते. बावीस जणांना घेऊन शुक्रवारी दुपारी मिनीबसने विरारहून आम्ही कामण, भिवंडीमाग्रे मुरबाडला पोहोचलो. मुरबाडच्या पुढे माळशेज घाटाच्या पायथ्याशी असणा-या वैशाखरे या गावात पोहोचून दुपारी ३ वाजता आम्ही प्रथम नाणेघाट चढून जाण्यासाठी आमच्या ट्रेकला सुरुवात केली. पण त्याआधी आमच्या दोन सहका-यांना घेऊन आमचा बसचालक बस घेऊन माळशेज घाट चढून आले

फाटयावरून नाणेघाटला पोहोचणार होता. यावेळी आमच्यासोबत ट्रेकरांचे बरेच ग्रुप नाणेघाटचा ट्रेक करत होते. भुरूभुरू पाऊस व वारा आमच्या सोबतीला होताच. मात्र या वाटेवरचा ट्रेक खूपच खडतर होता. तीन तासांची वाट तुडवून पायपीट करत सुखरूप नाणेघाट चढून नाणेघाटाच्या मोठया गुहेत येऊन पोहोचलो तेव्हा संध्याकाळचे सहा वाजायला आले होते. पाहतो तर गुहेत पाय ठेवायला जागा नव्हती.

सगळी जागा ट्रेकरांनी व्यापली होती. सगळया छोटया-मोठया गुहा भरल्या होत्या. त्यातच ट्रेकरांच्या झुंडीच्या झुंडी येऊन पोहोचत होत्या. शेवटी आम्ही बसमध्येच रात्र घालवण्याचे ठरवून आमची बस आली का नाही हे पाहण्यासाठी आम्ही नाणेघाटाच्या बाहेर प्रशस्त मोकळया आवारात आलो. येथे छोटया-मोठया अनेक वाहनांचा तळ पडला होता. आमचीही बस आलेली पाहून आम्हाला हायसे वाटले. येथे पाऊस व बेफाम वारे प्रचंड वेगाने वाहात होते.

पावसाच्या धुक्याचे प्रचंड ढगच्या ढग नाणेघाट परिसरावर उतरले असल्यामुळे सभोवतालचा परिसर पांढ-या गूढ वातावरणात गडप झालेला होता. त्यातच थंडीपण जबरदस्त होती. वा-याचा जोर एवढा प्रचंड होता की लहान, मोठया वाहनांसकट आमची बसपण उभ्या उभ्या करकर आवाज करत वा-यावर होडीसारखी डोलत होती. येथली रात्र मात्र खूपच भयाण वाटली. रात्रीचा सारा प्रदेश भयाण वाटत होता. प्रचंड गूढ शांतता होती. आवाज करायची ताकद फक्त निसर्गातच होती. सोबत आणलेले खाण्याचे पदार्थ पोटात ढकलून सारी रात्र बसमध्ये बसून काढली.

सकाळी चांगले उजाडताच आम्ही बसमधून खाली उतरलो. पाहतो तर एका गाववाल्याने त्याच्या छोटया टेम्पोतच वडापाव व चहाचे हॉटेल थाटले होते. गरमागरम वडापाव व वाफाळत्या चहावर आडवा हात मारून तृप्त होऊन नाणेघाट व तेथील गुहा पाहण्यास निघालो. नाणेघाटाच्या उजव्या हाताला भलामोठा दगडी रांजण पाहण्यास मिळतो. या रांजणाच्या शेजारीच पडझड झालेल्या पुरातन भिंतीचे अवशेष पाहण्यास मिळतात.

डाव्या हाताला एका छोटया लेण्यात गणपती व लक्ष्मीची मूर्ती पाहण्यास मिळाली. येथून थोडे पुढे चालून आल्यावर डाव्या हाताला भव्य लेणी पाहण्यास मिळतात. या वेळी मात्र या लेण्या जवळजवळ रिकाम्या झाल्या होत्या. कारण सकाळ होताच पर्यटक आपल्या इच्छित स्थळी रवाना होत होते. नाणेघाटाच्या मुख्य गुहेत सर्वत्र शिलालेख खोदून लिहिलेले आहेत. सातवाहन सम्राज्ञी नागनिका हिने हे शिलालेख निर्माण केलेले आहेत. या शिलालेखात नागनिकाने केलेल्या यज्ञाची व दानधर्माची माहिती दिलेली आहे.

तसेच सातवाहन परिवारातील आठ व्यक्तींची शिल्पे येथे कोरलेली आहेत. पण काळाच्या ओघात सगळया मूर्त्यां जीर्ण होऊन झिजल्या आहेत. या गुहेच्या बाहेर पाण्याचे काही टाकं पाहण्यास मिळतात. येथून आम्ही मागे फिरून डाव्या हाताला या गुहेला लागूनच असणारा नानाचा अंगठा हा डोंगर सर करून आलो. सकाळी दहा वाजता येथील स्थानिक रहिवासी असलेल्या सागर पानसरे या तरुणाला सोबत घेऊन आम्ही जीवधन गड पाहण्यास निघालो.

नाणेघाटापासून पाऊण तासाची वाट तुडवत उजव्या हाताला नळीच्या वाटेने पुढे निघालो. येथे उजव्या हाताला कडयाला लागूनच एकांतात एक छोटेखानी बंगला बांधलेला आहे. येथून आम्ही सरळ जीवधनगडाच्या पायथ्याशी पोहोचलो.

गड दाट जंगलात लपलेला होता. वाटाडयाअभावी गडावर जाणारी वाट सापडणे अशक्य आहे. एवढे दाट जंगल आहे. वाटेत आम्हाला जंगलात कडीपत्त्याची व दालचिनीची भरपूर झाडे पाहण्यास मिळाली. गड फार उंच नव्हता. अध्र्या तासाची चढण चढून आम्ही जीवधनगडाच्या उजव्या हाताच्या कपारीखाली दगडी पाय-यांपाशी येऊन ठेपलो. गडावर जाणा-या दगडी पाय-या चांगल्या प्रशस्त होत्या. पण पाऊस पाण्याने त्या बुळबुळीत होऊन खूपच निसरडया झाल्या होत्या. पाय घसरला तर कपाळमोक्ष ठरलेलाच होता.

अक्षरश: बसत, उठत ब-याच पाय-या पार करून एकदाचे आम्ही गडाच्या जवळ पोहोचलो. पण वर जाणारी चाळीस ते पन्नास फुटाची शेवटची चढण पाहून पोटात गोळा आला. वाट अक्षरश: तोडून बिकट केली होती आणि त्यातच सोबत आणलेला रोप बसमध्येच ठेऊन आलो होतो. या वाटेवरून पावसाचे पाणी वेगाने वाहत होते. सर्वत्र बारीक बारीक दगडांचा खच पडलेला होता. काय करावे ते समजत नव्हते.

आमचा वाटाडया मात्र नुसत्या स्लिपरनिशी सरसर चढून वर पोहोचला; पण यावेळी आमच्यासोबत पासष्ट वर्षाचे आमचे ज्येष्ठ सहकारी दीनानाथ कोलवणकर काका सोबत होते. त्यांनी गडावर जाणा-या वाटेवरच्या कपारीत वर चढण्या-उतरण्यासाठी ठिकठिकाणी खोबण्या खोदून काढलेल्या होत्या.

त्या खोबण्यांमधे हाताची बोटे रोवून त्या आधारे तरुणालाही लाजवतील अशा रितीने सरसर गड चढून प्रवेशद्वारात पोहोचून आम्हाला वर येण्यास प्रोत्साहन देऊ लागले. काकांची प्रेरणा घेऊन आम्हीपण त्या खोबण्यांच्या आधारे कपारीत पाय रोवत कडेकपारीचा आधार घेत एकदाचे सर्व जण जीवधनच्या प्रवेशद्वारात येऊन पोहोचलो.

गडाच्या प्रवेशद्वाराची कमान तेवढी उभी आहे. प्रवेशद्वारात दगड, मातीचा ढिगारा कोसळून प्रवेशद्वार अध्रेअधिक गाडले गेलेले आहे. प्रवेशद्वाराची पडझड पण बरीच झालेली आहे. प्रवेशद्वाराच्या वर मधोमध कलश त्यात आंब्याची पाने व वर फळ असे वैदिक चिन्हे कोरून काढलेली आहेत. कलशाच्या उजव्या व डाव्या हाताला सूर्य, चंद्र यांची शिल्पे कोरून काढलेली आहेत. अशी भरपूर प्रमाणात वैदिक चिन्हे मला जंजि-याच्या किल्ल्यातील वास्तूंवर पाहण्यास मिळाल्या.

गडावर प्रवेश करण्यासाठी आम्हाला प्रवेशद्वारातून वाकूनच पुढे जावे लागले. गड पाऊस, वारा व धुके यांच्यात न्हाऊन निघत होता. सर्वत्र कमरेएवढे रान माजले होते. वाटाडया अभावी गड पाहणे अशक्य होते. उद्ध्वस्त वास्तूही ब-याच असाव्यात, पण बेसुमार वाढलेल्या गवतात सारे गडप झालेले होते. आमच्या वाटाडयाने जेवढे दाखवले तेवढेच पाहून परत फिरलो.

वाटाडयाने आम्हाला काही पाण्याची टाकं, शिवलिंग नसलेले उद्ध्वस्त पण देखणे असे अनेक दालने असलेले, काही खांबांवर नागराजाचे शिल्प कोरलेले सुंदर मंदिर दाखवले. तसेच गडाचे दुसरे प्रवेशद्वार पाहिले. या प्रवेशद्वारावर गजलक्ष्मीचे शिल्प कोरलेले आहे. प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताला काही लेण्या पाहण्यास मिळतात. या वास्तूचा वापर धान्य कोठार म्हणून करत असत. येथून पुन्हा आम्ही गडाच्या वर मध्यावर आल्यावर एका टाकाजवळ गडाची स्वामिनी जीवाईदेवीची मूर्ती पाहण्यास मिळाली.

वातावरण जर स्वच्छ असेल तर येथून चहूबाजूच्या प्रदेशाचे छान दर्शन घडते. या गडाचे मुख्य आकर्षण म्हणजे पश्चिम दिशेला असणारा गडाला खेटून उभा असणा-या वानरिलगी सुळक्याचे दर्शन. तसेच किल्ले ढाकोबा, पूर्वेस किल्ले चावंड, निमगिरी, शिवनेरी, लेण्याद्रीपर्यंतच्या परिसराचे सुरेख दर्शन होते. येथेच भर पावसात थोडा विश्राम करून गड चढून आलो, त्याच मार्गाने गड उतरण्यास सुरुवात केली.

गड उतरताना आम्हाला समजले की गड चढून येण्यापेक्षा गड उतरणे खूपच अवघड आहे. पण ईश्वरकृपेने सारे सुखरूपपणे गड उतरून दुपारी अडीच वाजता आम्ही नाणेघाटात आमच्या बसजवळ येऊन पोहोचलो. बसमध्येच थोडीशी पोटपूजा करून सागर पानसरेचा निरोप घेऊन आम्ही महागणपती लेण्याद्रीच्या दर्शनासाठी निघालो.

1 COMMENT

  1. खूप सुंदर लिहिलं आहे. धन्यवाद . तुमच्या लेखामुळे ट्रेक करताना नक्कीच मदत होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version