Home महामुंबई ठाणे कुत्र्यांच्या नसबंदीसाठी पालिकेला मिळेना कंत्राटदार!

कुत्र्यांच्या नसबंदीसाठी पालिकेला मिळेना कंत्राटदार!

1

पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने चार वेळा निविदा प्रसिद्ध करूनही एकाही संस्थेने कंत्राटाला प्रतिसाद दिली नसल्याची बाब समोर आली आहे. 

उल्हासनगर- उल्हासनगरात कुत्र्यांनी हैदोस घातलेला असताना पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने चार वेळा निविदा प्रसिद्ध करूनही एकाही संस्थेने कंत्राटाला प्रतिसाद दिली नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यात पालिका अयशस्वी ठरत आहे.

उल्हासनगर महापालिकेच्या चौकाचौकात कुत्र्यांचे जत्थेच्या जत्थे फिरताना दिसतात. पावसाळय़ात कुत्र्यांना रोगांची लागण झाल्याने कुत्रे पिसाळतात. पालिकेने २०१२मध्ये केलेल्या पशू जनगणनेनुसार भटक्या कुत्र्यांची संख्या ३ हजार ६३८ इतकी आहे. प्रत्येक कुत्र्याच्या निर्बिजीकरणासाठी १ हजार १९२ एवढा खर्च आला होता, मात्र त्यानंतर अद्याप कुत्र्यांची नसबंदी न झाल्याने भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ होत आहे.

सद्यस्थितीत उल्हासनगरात ५ हजारपेक्षा जास्त भटके कुत्रे असल्याचे पालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांनी केलेल्या जनगणनेत समोर आल्याचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी राजा रिझवानी यांनी सांगितले. कुत्र्यांची वाढती संख्या चिंतेची बाब असल्याने २०१४-१५च्या अंदाजपत्रकात ४० लाखांची तरतूद कुत्र्यांचे निर्बिजीकरण नसबंदी आणि रेबीज प्रतिबंधात्मक लस टोचण्यासाठी केली आहे. अशाच प्रकारची तरतूद २०१३-१४च्या अंदाजपत्रकात करण्यात आली होती. त्या वेळी पालिकेने कंत्राटदार नेमण्यासाठी चार वेळा निविदा प्रसिद्ध केल्या, मात्र या निविदांना प्रतिसाद मिळाला नसल्याचे राजा रिझवानी यांनी सांगितले.

कुत्र्यांच्या नसबंदी कार्यक्रमात कंत्राटदाराचे काम

  • पालिका क्षेत्रातील कुत्रे पकडून संस्थेच्या रुग्णालयात आणणे.
  • निर्बिजीकरण प्रक्रिया करून त्यांना रेबीज प्रतिबंधात्मक लस टोचणे.
  • आवश्यक खाद्य आणि औषध देऊन पाच दिवस सांभाळ करणे.
  • कुत्र्यांच्या कानावर ‘व्ही’ मार्क करणे.
  • कुत्र्यांना ज्या भागातून आणले आहे, त्या भागात वाहनाने सोडणे.
  • कुत्रा पकडण्यापासून सोडण्यापर्यंतच्या प्रक्रियेचे शुटिंग.

दिवसाला श्वानदंशाचे ५० रुग्ण

उल्हासनगर महापालिका क्षेत्रात वाढलेल्या भटक्या कुत्र्यांच्या संख्येमुळे कुत्र्यांनी चावा घेतलेल्या रुग्णांची संख्या मध्यवर्ती रुग्णालयात वाढली आहे. दिवसाला सरासरी ५०पेक्षा जास्त श्वानदंश झालेले रुग्ण येतात. याबाबत मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक अशोक नंदापुरकर यांना विचारले असता, श्वानदंशाची प्रकरणे वाढली असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी लागणारा लसींचा पर्याप्त साठा रुग्णालयात उपलब्ध आहे. श्वानदंश झाल्यास लस घेणे आवश्यक असते, त्यामुळे तात्काळ लस घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

1 COMMENT

  1. Are कसले शोधत बसता कंत्राटदार, ?? इथे आखाती ( गल्फ ) देशांत अशा भटक्या कुत्र्यांना ,मुनिसिपाल्ती / पोलिस दिपार्त्मेंत,गोळ्या घालून ” साफ करते ” उगीच मुंबईत घाण वाढवीत बसला आहात तुम्ही ,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version