Home रिलॅक्स कॅप्टन जॅक स्पॅरो येतोय!

कॅप्टन जॅक स्पॅरो येतोय!

1

२६ मे, २०१७… ज्यांना ज्यांना कॅप्टन जॅक स्पॅरो माहिती आहे, ‘पायरेट्स ऑफ दी कॅरेबिअन’ ही धम्माल चित्रपट मालिका माहितीय ते सर्व या तारखेची वाट पाहताहेत.

कारण सोपं आहे. याच तारखेला पायरेट्स.. चित्रपट मालिकेतील ‘डेड मेन टेल नो टेल्स’ हा नवा चित्रपट (पाचवा भाग) जगभर प्रदर्शित होणार आहे. आता हॉलिवूडच्या ज्या चाहत्यांना पायरेट्स.. चित्रपट मालिका माहिती आहे, कॅप्टन जॅक स्पॅरो माहितीय त्यांना जॉनी डेपने रुपेरी पडद्यावर या चित्रपट मालिकेसाठी घेतलेल्या या अफलातून अवताराबद्दल वेगळे सांगण्याची गरज नाही.

पायरेट्स..चा पहिला भाग ‘कर्स ऑफ दी ब्लॅक पर्ल’ २००३ मध्ये झळकला आणि कॅप्टन जॅक स्पॅरो अर्थात जॉनी डेपच्या समुद्री चाच्यांच्या भन्नाट अवताराने जगभरातील चित्रपटप्रेमींचे, त्याच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. ज्यांना जॉनी डेप म्हणजे काय चीज आहे हे त्याचे आधीचे चित्रपट पाहूनही कळले नव्हते त्यांच्यासाठी तर हे चित्रपट म्हणजे लॉटरी होती. एखादे स्पेशल कॅरेक्टर मिळाले, विलक्षण भूमिका मिळाली की जॉनी डेप त्या भूमिकेत कसा शिरतो, नव्हे ती भूमिकाच कशी जगतो हे अनुभवायचे असेल तर त्याचे एडवर्ड सिसॉरहँड्स, स्लीपी हॉलो, चार्ली अँड द चॉकलेट फॅक्टरी, एड वूड, डॉनी ब्रॅस्को हे चित्रपट पाहावेत आणि त्याच्या अभिनयाची ताकद समजून घ्यायची असेल तर याच चित्रपटांबरोबर द रम डायरी हाही एक चित्रपट नक्की पाहा.

तीनदा ऑस्करसाठी नामांकन होऊनही जॉनीला ऑस्करने हुलकावणी दिली आहे. अर्थात त्याची त्याला फारशी खंत नाही. त्याचा म्युझिक बँड आहे, तो उत्तम गिटारिस्ट आहे आणि गाणीबिणीही म्हणतो. खूश असतो गडी चांगले चित्रपट आणि फावल्या वेळात गाणी बजावणी करण्यात.

आता पायरेट्सचा पाचवा भाग येताना खूप वावडय़ा उठल्या आहेत. जॉनीच्या व्यक्तिरेखेला म्हणजे कॅप्टन जॅक स्पॅरोला त्यात फारसा भाव दिलेला नाही. तो फार कमी सीनमध्ये आहे, ओरलँडो ब्लूम तर अवघ्या एका सीनसाठी आहे वगैरे. याच चित्रपटात ओरलँडो म्हणजे विल टर्नरच्या मुलाची व्यक्तिरेखा पडद्यावर येतेय आणि त्याच्यावरच या मालिकेतील पुढच्या भागाचा रोख राहणार आहे. आधीचे चारही भाग जॉनी डेपने पेलले होते हे लक्षात घेतलं तर वॉल्ट डिस्नी असा आत्मघातकीपणा करील असे वाटत नाही. डेड मॅन्स चेस्ट, अॅट वर्ल्ड्स एन्ड, ऑन स्ट्रेंजर टाईड्स या सर्व भागांमध्ये जॉनीने कॅप्टन जॅक स्पॅरो म्हणून दाखवलेली उत्स्फूर्तता, सहजता फार कमी अभिनेते पडद्यावरील त्यांच्या वावरण्यात भासवू शकतात.

या नव्या भागात कॅप्टन सालझार (जेव्हीएर बार्डेम, जेम्स बॉण्ड फिल्म ‘स्कायफॉल’चा खलनायक) कॅप्टन जॅक स्पॅरोच्या जीवावर उठला आहे. भावाच्या मृत्यूला जॅक कारणीभूत आहे,असा सालझारचा समज आहे. त्याचे भुताळी जहाज, खलाशी भुतं घेऊन तो समुद्रावरील सर्व चाच्यांचा नायनाट करायला निघाला आहे. त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी जॅकला एका गोष्टीची गरज आहे. ‘कोन-तिकी’ चित्रपटासाठी २०१२ मध्ये विदेशी चित्रपटाचे ऑस्कर मिळवणारी जोकीम रॉनीन आणि एस्पेन सँडबर्ग ही दिग्दर्शकांची जोडगोळी या चित्रपटासाठी खपते आहे. यू-टय़ुबवर या चित्रपटाच्या ट्रेलरने मध्यंतरी सर्वाधिक प्रेक्षकसंख्या मिळवली होती.

‘ब्लॅक पर्ल’च्या डोलकाठय़ांवर तोल सांभाळणारा तलवारबहाद्दर, विक्षिप्त समुद्री चाचा कॅप्टन जॅक स्पॅरो त्याच्या एन्ट्रीसाठी सज्ज झाला आहे. बस्स. २६ मे, २०१७ चा इंतजार आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version