Home रिलॅक्स ‘नृत्य-दिग्दर्शक झाले नसते तर जिम्नॅस्टिक प्रशिक्षक झाले असते’

‘नृत्य-दिग्दर्शक झाले नसते तर जिम्नॅस्टिक प्रशिक्षक झाले असते’

0

नृत्य-दिग्दर्शक फुलवा खामकर हे नाव मराठी चित्रपटसृष्टीत सर्वांनाच परिचयाचे आहे. आपल्या दिलखेचक नृत्यासह सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी फुलवा केवळ नर्तक किंवा कोरिओग्राफर नाही, तर ती सर्वोत्कृष्ट जिम्नॅस्टसुद्धा आहे. जिम्नॅस्टिकमध्ये तिने तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतले आहे. तसेच प्रशिक्षणही दिले आहे. जिम्नॅस्टिकमधील योगदानाबद्दल तिला महाराष्ट्र सरकारतर्फे छत्रपती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. मात्र तिचा कल नृत्याकडे अधिक होता. ‘नृत्य दिग्दर्शक झाले नसते तर जिम्नॅस्टिक प्रशिक्षक झाले असते.’ असे फुलवाचे म्हणणे आहे. तिचा आजवरचा प्रवास जाणून घेण्याचा हा प्रयत्न..

स्वत:च्या कारकिर्दीविषयी फुलवा म्हणते, २००८मध्ये मी ‘झी’ टीव्हीवरील ‘एकापेक्षा एक’ या नृत्यावर आधारित कार्यक्रमात सहभागी झाले. २०१०मध्ये कोरिओग्राफर म्हणून माझी पहिली फिल्म आली ‘नटरंग’. त्यामुळे माझी कारकीर्द जेमतेम पाच-सहा वर्षाची आहे. मी छत्रपती पुरस्कार विजेती क्रीडापटू आहे. जिम्नॅस्टिक या क्रीडा प्रकारात मला हा पुरस्कार मिळाला. जिम्नॅस्टिकनंतर मी नृत्याकडे वळले. मात्र तोवर मी नृत्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले नव्हते. पोद्दार कॉलेजमध्ये अनेक नृत्यपर कार्यक्रम आणि स्पर्धामध्ये सहभाग घेतला. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना एक वेळ अशी आली की, हेच आपल्या आयुष्यात आहे, जे करायला खूप आवडते. आपल्याला काही नोकरी, जॉब जमणार नाही, हे मला ठाऊक होते. त्यामुळे नृत्यातच आपले करिअर करण्याचे नक्की केले. पदवी घेण्यासाठी मी कॉमर्स शाखा निवडली आणि शिक्षण पूर्ण केले.

माझे आजोबा शाहीर अमर शेख आणि वडील अनिल बर्वे. माझे वडील चांगले लेखक. मलाही लिहायला आवडते. मात्र लेखिका व्हायला आवडले नसते. कॉमर्समधून पदवी घेतल्यानंतर मी माझ्या गुरू आशाताई जोगळेकर यांच्याकडे कथ्थक शिकले. मग त्यानंतर नृत्याचा प्रवास सुरू झाला. माझे लग्न झाले. मुलगी झाली. १९९७मध्ये सोनी टीव्हीवर ‘बुगी वुगी’ या नृत्यपर कार्यक्रमात सहभागी झाले. भारतातील तो ‘रिअॅलिटी शो’ होता. त्यामुळे ‘बुगी वुगी’ शोचा एक वेगळा प्रेक्षकवर्ग होता. त्या शोमध्ये मी विजेती ठरले. ‘बुगी वुगी’नंतर मी सर्वाचे लक्ष वेधले. लग्नानंतर माझे जिम्नॅस्टिक सुरू होते. माझे पप्पा मला शिकवायचे. त्यावेळी जिम्नॅस्टिकचे प्रशिक्षण वर्गही सुरू केले नव्हते. माझे कथ्थक सुरू होते.

फेब्रुवारी २००० मध्ये मला अपघात झाला. त्या अपघातानंतर माझ्या पायावर शस्त्रक्रिया झाली. टेंडन फ्रॅक्चर ही मोठी शस्त्रक्रिया आहे, हे मला त्यावेळी कळले. या दुखापतीतून मी सावरले. बरी झाले. दीड महिन्याच्या उपचारादरम्यान पुढे काय करायचे, हे मी निश्चित केले. केवळ नृत्य किंवा फिल्मी डान्स शिकायचे किंवा शिकवायचे नाही तर कोरिओग्राफी करताना मुलांना कोणता फॉर्म द्यायचा, त्यांना कसे शिकवायचे, हे माझ्या सारखं डोक्यात असायचं. ऑपरेशननंतर मी काठी घेऊन हळूहळू चालण्याचा सराव केला. पूर्णपणे बरी झाली नसतानाही पायाला ‘फ्लिंट’ लावून मी २००१मध्ये हनुमान थिएटरमध्ये नृत्य प्रशिक्षण वर्ग सुरू केले. त्यावेळी ‘फुलवा स्कूल ऑफ डान्स’ असे माझ्या प्रशिक्षण वर्गाचे नाव होते, जे आता ‘फुलवा स्कूल ऑफ डान्स अँड जिम्नॅस्टिक (पीएसडीजी) आहे. माझा स्वत:चा स्टुडिओ आहे.

या दरम्यान मला मुलगी (आस्मा) झाली. त्यावेळी डान्समध्ये माझे करिअर होत नव्हते. मात्र गणेश हेगडेबरोबर काही इव्हेंट केले. आणखीही काही कार्यक्रम केले. त्यानंतर २००९मध्ये आलेल्या ‘झी मराठी’वरील ‘एकापेक्षा एक’ या मराठीतील पहिल्या नृत्यपर रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला. या शोचे परीक्षक ‘महागुरू’ सचिन पिळगावकर होते. या शोमध्ये मी विजेती ठरले. त्यानंतर दोन शोमध्ये मला परीक्षक बनण्याचा मान मिळाला. २०१३मध्ये मी ‘झी टीव्ही’वर ‘डान्स इंडिया डान्स’ या ‘मम्मी स्पेशल’ शोमध्ये भाग घेतला. या शोमुळे मी नृत्याकडे पुनरागमन केले.

दरम्यानच्या काळात मला ‘एकापेक्षा एक’साठी विचारले गेले. त्यांच्या शोसाठी नृत्य-दिग्दर्शक निश्चित झाला होता. मात्र काही कारणास्तव तो बाहेर पडला आणि माझी ‘एंट्री’ झाली. दोन दिवसांनी रिहर्सल चालू होणार होती. मात्र माझे नशीब जोरावर होते. मला चांगले स्पर्धक मिळाले. तुमचा विश्वास बसणार नाही, मात्र चिठ्ठय़ा टाकून स्पर्धक विभागण्यात आले. त्यात सॅड्रिक आणि सुकन्या माझ्या वाटय़ाला आले. मला मराठीमध्ये कोरिओग्राफर म्हणून व्यासपीठ मिळाले. सुकन्यासाठीही ती मोठी संधी ठरली. त्यानंतर लोकांना कळायला लागले की, ‘बुगी वुगी’मधील डान्सर फुलवा ही मराठी आहे. ‘बुगी वुगी’ आणि ‘एकापेक्षा एक’मुळे मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये ब-यापैकी परिचित झाले. त्यानंतर ‘नटरंग’ चित्रपट मिळाला. गेल्या सहा वर्षात ‘हॅप्पी न्यू इयर’, ‘मितवा’, ‘क्लासमेट’, ‘पोस्टर गर्ल’, ‘फोटोकॉपी’ अशा जवळपास १५ चित्रपटांमध्ये नृत्य दिग्दर्शन केले. ‘नटरंग’मधील ‘अप्सरा आली..’ गाण्यासाठी मला ‘झी गौरव’ तसेच ‘मितवा’साठी ‘मिफ्ता’ पुरस्कार मिळाला आहे. ‘झिंग चिंग झिंग’साठीही मला सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात आले.

नृत्य करताना जिम्नॅस्टिकचा खूप फायदा होतो

फुलवा चांगली जिम्नॅस्ट आहे. या खेळासाठी त्यांना राज्य सरकारचा छत्रपती पुरस्कारही मिळाला आहे. जिम्नॅस्टिकचा नृत्य करताना कितपत फायदा होतो, असे विचारले असता, ‘‘नृत्य करताना जिम्नॅस्टिकचा खूप फायदा होतो. मी फिल्मी डान्स शिकवत असले तरी मुलांना बेसिक जिम्नॅस्टिक शिकवल्याशिवाय मी पुढे जात नाही. प्रत्येक मुलाला तसे बंधनकारक करते. जिम्नॅस्टिकमुळे तुमचे शरीर लवचिक बनते. आत्मविश्वास उंचावतो. मन कणखर बनते. केवळ डान्स करून तुमचा शारीरिक विकास होत नाही. त्याला या खेळाची जोड लागते. स्पोर्ट्समनकडे पाहण्याची दृष्टी वेगळी असते. एखादी व्यक्ती खेळाशी जोडली गेली की नाही, हे त्याला पाहिल्यावर चटकन लक्षात येते. खेळामुळे स्टॅमिना वाढतो. कणखरता आणि लवचिकता येते, जी नृत्य करताना खूप उपयोगी ठरते. बॉलिवूड डान्स शिकवत असले तरी जिम्नॅस्टिकचा ‘बेस’ असल्यामुळे माझी मुले प्रभावी ठरतात. छाप पाडतात.

मुलांनी कुठला तरी एखादा डान्स शिकावा

मला वाटते की, मुलांनी कुठला तरी एखादा डान्स शिकावा. शास्त्रीय नृत्य की वेस्टर्न डान्सने सुरुवात करावी, असे काही नाही. मी २०व्या वर्षापासून ‘क्लासिकल’ डान्स शिकले. मात्र बॉलिवूड डान्स शिकायचा असेल तर ‘क्लासिकल’चा बेस आवश्यक आहे. मग ते भरनाटय़म असो किंवा कथ्थक. सुरुवातीला मी ‘फ्रीस्टाईल’ डान्स करायचे. मात्र शास्त्रीय नृत्य शिकल्यानंतर मला शिस्त लागली. केवळ नृत्य नाही तर विचारसरणी बदलली. त्यामुळे चांगला नर्तक व्हायचे असेल तर शास्त्रीय नृत्यातील एक भाग अवगत असणे केव्हाही चांगले. मुलांना योग्यप्रकारे नृत्य प्रशिक्षण मिळणेही आवश्यक आहे. केवळ फिल्मी गाण्यांवर नाचणे, याला मी नृत्य म्हणत नाही, असे फुलवाचे मत पडले.

मुलगा-मुलगी, स्त्री-पुरुष असा भेद मानत नाही

मुलगा-मुलगी, स्त्री-पुरुष असा भेद मी मानत नाही. फार दूर नको, नुकत्याच झालेल्या ‘हीरो’ चित्रपटाच्या आयटम साँगच्या शूटिंगवेळी सेटवर मी एकटीच टेक्निशियन होते. माझी असिस्टंट आणि आणखी एक महिला अशा आम्ही नेमक्याच जणी तिथे होतो. मात्र मला कधीही कुणाकडून चुकीची वागणूक मिळाली नाही. मी क्रीडापटू (स्पोर्ट्सपर्सन) असल्याने पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करायची मला खूप सवय आहे. त्यामुळे मुलगी किंवा स्त्री कुठे कमी पडेल, असे मला वाटत नाही.

मुलगी आस्माला शक्य तितका वेळ देते

शूटिंगमध्ये ‘बिझी’ असते तेव्हा मुलगी आस्मासोबत फारच कमी वेळ असते. मात्र काम नसेल तेव्हा तिला जास्तीत जास्त वेळ देते. तिलाही नृत्याची आवड आहे. हे फिल्ड तिला आवडले आहे. आस्मा आता १२ वर्षाची आहे. ती ब-यापैकी ‘इंडिपेंडंट’ आहे. तिचे टय़ुशन आणि नृत्याचे क्लास स्वत: लक्षात ठेवते. माझ्या आजवरच्या वाटचालीत पती अमर खामकर यांचेही मोठे योगदान आहे. त्यांच्यामुळे मी माझे प्रशिक्षण वर्ग आणि शूटिंगला अधिकाधिक वेळ देऊ शकते.

संगीतकार विजय प्रकाश यांच्याबरोबर एक अल्बम करतेय

काही चित्रपटांची बोलणी सुरू आहेत. मात्र सध्या ‘शेअर’ करण्यासारखे म्हणजे दाक्षिणात्य पार्श्वगायक विजय प्रकाश यांच्यासोबत मी एक अल्बम करतेय. हा अल्बम हिंदी आहे. विजय प्रकाश यांना ‘उलिडेवरु कुंदंते’ या कन्नड चित्रपटातील ‘गतिया लिईडु’ गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.

डान्स स्टुडिओ-सर्वात मोठी अचिव्हमेंट

आजवरची सर्वात मोठी अचिव्हमेंट म्हणजे माझा डान्स स्टुडिओ. प्रत्येक कोरिओग्राफरचे एक स्वप्न असते की, त्याची स्वत:ची जागा असावी. कारण नृत्याचा कार्यक्रम असेल तर तो हॉल मला भाडय़ाने घ्यावा लागतो. हॉलची वेळ ठरावीक असते. काही वेळा कार्यक्रम लांबला तर व्यवस्थापकांशी बोलून ‘मॅनेज’ करावे लागते. स्वत:चे ऑफिस असावे, असे डोक्यात होते. मात्र ऑफिसचा आम्हाला फारच कमी उपयोग होतो. मीटिंगसाठी ऑफिसचा वापर समजू शकतो. मात्र त्याव्यतिरिक्त काय? मग स्टुडिओसाठी जागा शोधत होते. घराजवळच स्टुडिओ असावा, यासाठी प्रयत्नशील होते. माहीममध्ये अपेक्षित असा स्टुडिओ उभारण्यात मला यश आले. या स्टुडिओमध्ये सध्या अनेक मुले प्रशिक्षण घेत आहेत. हा एक ‘हायटेक’ स्टुडिओ आहे. स्टुडिओतील ‘फ्लोरिंग’ही वैशिष्टय़पूर्ण आहे. ज्यामुळे गुडघ्याला आणि पाठीला कुठलीही इजा पोहोचत नाही. कुठल्याही हालचाली (मूव्हमेंट) केल्या तरी हादरा (जर्क) बसत नाही. प्रत्येक डान्स स्टुडिओची ही एक गरज आहे. जे करायचे ते चांगले. त्यामुळे स्टुडिओसुद्धा अद्ययावत असावा, असे मला वाटते. मध्यंतरी दिल्लीतील काही मंडळींनी स्टुडिओला भेट दिली तेव्हा तेही चकित झाले. हिंदीतील कोरिओग्राफर्सचे अनेक स्टुडिओ आहेत. मात्र डान्स स्टुडिओ नाही.

नृत्य दिग्दर्शित केलेले चित्रपट

झिंग चिंक झिंग, आयडियाची कल्पना, नटरंग, स सासूचा (२०१०), कुणी मुलगी देता का मुलगी (२०१२), पोपट (२०१३), पोस्टकार्ड, प्रियतमा, सांगतो ऐका, हॅप्पी न्यू इयर (२०१४), मितवा, क्लासमेट्स (२०१५), पोस्टर गर्ल, फोटोकॉपी (२०१६).

  • पुरस्कार

‘झिंग चिंक झिंग’साठी सर्वोत्कृष्ट नृत्य-दिग्दर्शक.

‘नटरंग’तील ‘अप्सरा आली..’ गाण्यासाठी ‘झी गौरव’.

‘मितवा’ चित्रपटासाठी ‘मिफ्ता’ पुरस्कार.

  • टीव्ही शो : सहभाग

बुगी वुगी (१९९७) सोनी टीव्ही.

डान्स इंडिया डान्स-सुपर मॉम्स (२०१३) झी टीव्ही.

एकापेक्षा एक (२००६) ‘झी मराठी’. २०१३ आणि २०१४मधील शोमध्ये परीक्षकाचा मान.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version