Home महामुंबई ठाणे केंद्र सरकारच्या दडपशाहीचा काँग्रेसकडून जोरदार निषेध

केंद्र सरकारच्या दडपशाहीचा काँग्रेसकडून जोरदार निषेध

0

लोकसभेत मोदी सरकारचा विरोध करणा-या काँग्रेसच्या २५ खासदारांना निलंबित करण्यात आले.

ठाणे- लोकसभेत मोदी सरकारचा विरोध करणा-या काँग्रेसच्या २५ खासदारांना निलंबित करण्यात आले. याचा निषेध करण्यासाठी गुरुवारी ठाणे शहर काँग्रेस समन्वय समितीकडून तलावपाळी येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील, काँग्रेसनेते सुभाष कानडे, मनोज शिंदे, बाळकृष्ण पूर्णेकर,नारायण पवार, मोहन तिवारी, यासिन कुरेशी यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

अलिबागमध्ये आंदोलन

भ्रष्टाचाराच्या मुद्दयांवर भाजपच्या केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचा राजीनाम्याची मागणी करणा-या काँग्रेसच्या २५ खासदारांना निलंबित करण्यात आल्याच्या निषेधार्थ गुरुवारी अलिबाग तालुका काँग्रेस कमिटीने माजी आमदार मधुकर ठाकूर यांच्या नेतृत्त्वाखाली निदर्शने करण्यात आली. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल व तहसीलदार प्रकाश सकपाळ यांना निवेदन देण्यात आले.

ललित मोदी यांना मदत केल्याप्रकरणी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे तर व्यापंम घोटाळाप्रकरणी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चैहान यांच्या राजीनाम्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा अ‍ॅड. श्रध्दा ठाकूर, जिल्हा चिटणीस सुनील जाखू पाटील, अलिबाग महिला विधानसभा अध्यक्ष मंदाताई बळी, अलिबाग तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष अनंत गोंधळी, तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा मिनाक्षी खरसांबळे, ओबीसी सेल अध्यक्ष सुनील थळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

उल्हासनगरात ‘हुकूमशाहीचा’ जाहिर निषेध

मोदी सरकारच्या हुकूमशाही कारभाराचा आणि काँग्रेस पक्षाच्या २५ खासदारांच्या निलंबनाचा उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. तसेच प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. उल्हासनगर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा अध्यक्ष डॉ.जयराम लुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्प ३ येथील पवई चौक परिसरातील उपविभागीय कार्यालयावर गुरुवारी सकाळी ११ वाजता जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आला.

कॅम्प २ येथील नेहरू चौकातील काँग्रेस कार्यालय येथून प्रांत कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोच्र्यात डॉ. जयराम लुल्ला, जया साधवानी, अजिज खान, डॉ. आझाद, अशोक ठाकूर, अमरलाल छाब्रिया, मुन्ना श्रीवास्तव, कमला मेलकुंदे, लक्ष्मीबाई यांच्यासह ४० ते ५० काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. प्रांतअधिकारी बी.जी.गावंडे यांना आंदोलनकर्त्यांनी निवेदन दिले.

कल्याणमध्ये मोर्चा  

खासदारांना निलंबित करण्याच्या दडपशाहीविरोधात कल्याणमध्येही कल्याण शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने मोर्चा काढण्यात आला.  केंद्र सरकारकडून घटनात्मक व लोकशाही अधिकारांची गळचेपी सुरू आहे. २५ खासदारांचे निलंबन हा त्याचाच भाग आहे. त्याचा निषेध करण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते तहसीलदार कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये आमदार संजय दत्त, जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, निरीक्षक संजय चौपाने, विरोधी पक्षनेते विश्वनाथ राणे, गटनेते सदाशिव शेलार, महिला अध्यक्ष लता जाधव, काँग्रेस प्रदेश प्रवक्ते ब्रिज दत्त, राकेश मुथा आदींनी भाग घेतला. त्यानंतर तहसिलदारांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.

वसईत ठिय्या

केंद्र सरकारच्या दडपशाही विरोधात वसई-विरार जिल्हा काँग्रेसच्या वतीने वसई तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली व ठिय्या आंदोलन केले. केंद्र सरकार भ्रष्टाचा-यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. काँग्रेसचे पालघर जिल्हा अध्यक्ष दत्ता नर यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन झाले. यावेळी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व जनतेने मोठा सहभाग घेतला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version