Home महामुंबई ‘केईएम’मध्ये लवकरच ‘हाता’चे प्रत्यारोपण

‘केईएम’मध्ये लवकरच ‘हाता’चे प्रत्यारोपण

0

जन्मत: किंवा अपघातात हात गमवावा लागल्याने काहींना आयुष्यभराचे अपंगत्व येते. अशा व्यक्तींवर खासगी रुग्णालयांत यावर नवीन हात बसवून घेण्यासंबंधी शस्त्रक्रिया करणारे तंत्रज्ञान उपलब्ध आहे.
मुंबई – जन्मत: किंवा अपघातात हात गमवावा लागल्याने काहींना आयुष्यभराचे अपंगत्व येते. अशा व्यक्तींवर खासगी रुग्णालयांत यावर नवीन हात बसवून घेण्यासंबंधी शस्त्रक्रिया करणारे तंत्रज्ञान उपलब्ध आहे.

मात्र यासाठी लागणारा खर्च प्रचंड असल्याने सर्वसामान्यांना तो परवडणारा नसतो. त्यामुळे रुग्ण प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यास सहज पुढे येत नाहीत.

ही सुविधा सामान्य माणसाला कमी पैशांत उपलब्ध होण्यासाठी परळमधील पालिकेच्या केईएम रुग्णालयात ‘हाता’ची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या संदर्भात निर्णय झाला असून केवळ कागदोपत्री काम शिल्लक असल्याचे रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले.

विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीद्वारे ‘जागतिक अवयवदान दिना’चे औचित्य साधून केईएममध्ये ‘हाता’च्या प्रत्यारोपणा संदर्भात एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात मेंदू मृत झालेल्या व्यक्तींचा हात दुस-या व्यक्तीच्या तुटलेल्या हातावर प्रत्यारोपण ही सूक्ष्म शस्त्रक्रिया करून त्याला नवे आयुष्य कसे देता येते, याविषयी तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले.

सध्या देशभरात अवयवदानाबाबत जनजागृतीचे काम सुरू आहे. यकृत, मूत्रपिंड, डोळे व त्वचा यांसारखे अवयव दान केल्याच्या घटना ऐकिवात आहेत. पण, ‘हाता’चे प्रत्यारोपणही करता येऊ शकते हे फारच कमी लोकांना माहीत आहे. आत्तापर्यंत हाताच्या प्रत्यारोपणाच्या दोन शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करून दोघांना नवीन आयुष्य मिळाले आहे.

यातील पहिली शस्त्रक्रिया २००२ रोजी केरळामध्ये करण्यात आली होती. एखाद्या दुर्घटनेत हात गमवावा लागल्याने अशा व्यक्ती मानसिकदृष्टय़ा खचून जातात. या व्यक्तींना दुस-या व्यक्तीचा हात बसवल्यास त्यांना जगण्याची नवीन उमेद मिळते, असे कोचीतील अंरिता इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ सायन्सच्या प्राध्यापक डॉ. सुब्रमण्यम अय्यर यांनी सांगितले.

‘हाताचे प्रत्यारोपण’ ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असून त्यासाठी टिमवर्क गरजेचे आहे. ही शस्त्रक्रिया यशस्वी होऊ शकत नाही. कारण मेंदू मृत झाल्यानंतर संबंधित रुग्णाच्या नातेवाइकांना अवयवदान करण्यासंदर्भात तयार करावे लागते.

तसेच दात्याचा ‘हात’ गरजूला बसवतात सुरुवातीला नस, रक्तवाहिन्या व हाड यांची एकत्रित जोडणी करावी लागते. त्यानंतर हात बसवावा लागतो. हात बसवल्यानंतर दोन दिवसांनंतर रुग्ण हातांच्या हालचाली सहज करू शकतो, असे, डॉ. अय्यर यांनी सांगितले.

केईएममध्ये मोठय़ा प्रमाणात जळीत रुग्ण व रेल्वे अपघातात हात गमवावा लागणारे रुग्ण येतात. अनेक दुर्घटनांत गंभीर जखमी झालेल्या रुग्णांचा तुटलेला हात अन्य व्यक्ती रुग्णालयात घेऊन येतो. हा हात रुग्णाला पुन्हा बसवता येऊ शकतो. अशा रुग्णांना नवीन जीवन देण्यासाठी आता रुग्णालयात ‘हाता’चे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरू करण्यासंबंधी विचार सुरू आहे. या संदर्भातील प्रक्रिया सुरू आहे. यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल. महापालिका रुग्णालयात पहिल्यांदाच अशाप्रकारे प्रत्यारोपण करणारी शस्त्रक्रिया होणार आहे.
– डॉ. विनिता पुरी, प्लॅस्टिक सर्जरी विभाग प्रमुख केईएम

अवयव दानासाठी ‘दाता’ नोंदणी केंद्र
ज्यांना अवयव दानासाठी ‘दाता’ म्हणून नाव नोंदणी करायची असेल त्यांना महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांत ‘दाता’ म्हणून नोंदणी करता येईल. अवयव दानासाठी नोंदणीचे ठिकाणी परळ केईएम रुग्णालयाचा ‘यूरोलॉजी’ विभाग, नायर रुग्णालयातील वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता कक्ष व सायन रुग्णालयाच्या परिसरातील विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीच्या कार्यालयात नोंदणी करता येईल.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version