Home महाराष्ट्र कोकण कोकणातील रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्हीची नजर

कोकणातील रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्हीची नजर

1

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी व रेल्वे स्थानकांवर होणा-या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कोकणातील रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरा सिक्युरिटी सिस्टीम बसवण्यात आली आहे.
लांजा– रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी व रेल्वे स्थानकांवर होणा-या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कोकणातील रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरा सिक्युरिटी सिस्टीम बसवण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच रेल्वे स्थानकांवर प्रायोगिक तत्त्वावर गुरुवारपासून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांवरील सुरक्षिततेला भक्कम आधार मिळाला आहे.

देशातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जात आहेत. प्रवाशांची सुरक्षा व रेल्वे स्थानकांवर गैरप्रकार रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हे सीसीटीव्ही कॅमेरे काळाची गरज बनली आहे. कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा प्रकारची सुविधा कोणत्याही रेल्वे स्थानकांवर नव्हती. मात्र, गणेशोत्सव कालावधीत रेल्वे स्थानकांवर होणारी प्रवाशांची प्रचंड गर्दी व त्यामुळे घडणा-या घटनांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने हंगामी स्वरुपात ही व्यवस्था सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेल्या या सुविधेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण, खेड तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, कणकवली या पाच रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. गुरुवारपासून कार्यान्वित झालेली ही सेवा वायरलेस इन्फोटेक संस्थेच्या माध्यमातून उभारण्यात आली आहे.

रेल्वे स्थानकांवर बसवण्यात आलेल्या या सिस्टिममध्ये रेल्वे स्थानकांवरील पंधरा दिवसांच्या रेकॉर्डिग बॅकअपची सुविधा असणार आहे. यामध्ये प्लॅटफॉर्म, मुख्य प्रवेशद्वार, तिकीट खिडकी आदी ठिकाणी सीसीटिव्हीची नजर असणार आहे.

चिपळूण व रत्नागिरी स्थानकांवर प्रत्येकी सोळा कॅमेरे तर उर्वरित स्थानकांवर आठ ते दहा कॅमेरे बसवण्यात आले आहेत, असे वायरलेस इन्फोटेक संस्थेचे कोकण विभागाचे मनोज सावंत यांनी सांगितले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version