Home महाराष्ट्र कोकण कोकणात जाणा-या गणेशभक्तांचे हाल

कोकणात जाणा-या गणेशभक्तांचे हाल

1

गणेशपूजनाची ओढ लागल्याने कोकणात निघालेल्या गणेशभक्तांना मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे बुजवले न गेल्याचा फटका बसला.

अलिबाग- गणेशपूजनाची ओढ लागल्याने कोकणात निघालेल्या गणेशभक्तांना मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे बुजवले न गेल्याचा फटका बसला असून, अभूतपूर्व वाहतूक कोंडी होऊन शेकडो वाहने वाटोवाट अडकून पडली आहेत. काही गणेशभक्तांनी पनवेल-महाडपर्यंतचा मार्ग उखडला गेल्यामुळे अखेर खोपोलीकडून जांभूळपाडा पालीमार्गे ४२ किलोमीटरचे जादा अंतर कापून वाकण गाठून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ वर येण्याचा प्रयत्न केला असता पाली-वाकण अरुंद मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली आहे. कोकणाकडे जाणा-या सर्वच मार्गावर गणेशभक्त तासन्तास रखडले असून कोकण रेल्वेचीही तीच स्थिती आहे.

१७ सप्टेंबरच्या आत महामार्ग क्रमांक १७ वरील सर्व खड्डे बुजवले जातील, असे आश्वासन सरकारतर्फे देण्यात आले होते. रायगडच्या पालकमंत्र्यांनी त्यासाठी एक बैठकही घेतली होती. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रायगड जिल्हा जिल्हाधिकारी प्रशासन यांच्या संयुक्त बैठकीत रस्त्यावरचे सर्व खड्डे बुजवण्याचे निश्चित जाहीर करण्यात आले होते. मात्र हे खड्डे बुजवण्याची कार्यवाही झाली नाही. त्यामुळे आपल्या मूळ गावाकडे गणेशपूजनाच्या ओढीने निघालेल्या लाखो गणेशभक्तांना बुधवारी रात्री उशिरापर्यंत वाहतूक कोंडीत अडकून त्यांचे हाल हाल झाले. त्यामुळे हे गणेशभक्त सरकारला आणि प्रशासनाला शिव्याशाप देत आहेत. काही कुटुंबांनी पैसे जमा करून एका सुमो गाडीने प्रवास करण्यचा निर्णय घेतला. त्या गाडय़ांमधील वृद्ध, मधुमेही रुग्ण, लहान मुले यांचे कमालीचे हाल झाले आहेत.

रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे प्रशासनाचे नियोजन पूर्णत: कोलमडले आहे. शिवाय वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात पोलीस बंदोबस्त लावण्यात येईल असेही प्रशासनाने जाहीर केले होते, मात्र मंगळवारी रात्री आणि प्रामुख्याने बुधवारी सकाळपासून पळस्पा फाटा ते माणगाव या परिसरात वाहतुकीची कोंडी मोठय़ा प्रमाणात झाली. राष्ट्रीय मार्ग क्रमांक १७वर गणपती उत्सवाच्या काळात ट्रक वाहतुकीला बंदी आहे. तरीसुद्धा खराब रस्त्यांमुळे वाहनांचा वेग पूर्णपणे मंदावला. शेवटी वाहतूक प्रशासनानेच पनवेलहून कोकणकडे वळणा-या वाहनांना खोपोलीकडे पिटाळून खोपोली, जांभुळपाडा, वाकण मार्गाने राष्ट्रीय मार्ग १७ क्रमांकावर जाण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे खोपोली, जांभुळपाडा, पाली आणि वाकण या अरुंद रस्त्यावर दुर्तफा वाहने घुसू लागल्यामुळे मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. यामध्येच भरीला भर म्हणून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ वर बुधवारी दोन अपघात झाले. अतिउत्साही चालक ओव्हरटेक करीत गाडय़ा पुढे दामटत असताना हे अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

गेल्या चार-पाच वर्षात या महामार्गावर गणपतीच्या वेळी प्रवाशांची वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून काटेकोरपणे नियमन केले जात होते आणि त्यामुळे वाहतूक कोंडी झाली नाही. प्रवास सुलभ झाला होता, असे अनेक प्रवाशांनी सांगितले. मात्र, यावर्षी सरकार, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक शाखा यापैकी कुणीही कोंडी होऊ नये म्हणून गांभीर्याने प्रयत्नच केले नाहीत. रस्त्यावरचे खड्डे व्यवस्थित बुजवले गेले असते तर काही प्रमाणत वाहतूक व्यवस्थित सुरू राहिली असती. रात्री उशिरा पाली वाकण, पळस्पे, माणगाव या मार्गावर वाहतूक कोंडीत मोठय़ा प्रमाणात गणेशभक्त अडकलेले आहेत.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version