Home महामुंबई ठाणे खालापुरातील २१ गावे पर्यावरण संवेदनशील!

खालापुरातील २१ गावे पर्यावरण संवेदनशील!

0

राज्यातील इको-सेन्सेटिव्ह झोनचे आलेखन करण्यासाठी माधव गाडगीळ समितीने दिलेल्या अहवालानुसार, परिसंवेदनशील क्षेत्र ठरवण्याकरता नेमण्यात आलेल्या डॉ. कस्तुरीरंजन समितीच्या अहवालानुसार रायगडमधील सात तालुक्यांत फेब्रुवारी महिन्यात जनसुनावणी घेण्यात येणार आहे.

खोपोली- राज्यातील इको-सेन्सेटिव्ह झोनचे आलेखन करण्यासाठी माधव गाडगीळ समितीने दिलेल्या अहवालानुसार, परिसंवेदनशील क्षेत्र ठरवण्याकरता नेमण्यात आलेल्या डॉ. कस्तुरीरंजन समितीच्या अहवालानुसार रायगडमधील सात तालुक्यांत फेब्रुवारी महिन्यात जनसुनावणी घेण्यात येणार आहे. या सुनावणी अहवालनुसार, इको-सेन्सेटिव्ह झोनवर केंद्र सरकार शिक्कामोर्तब करणार असल्याने खालापुरातील २१ गावांच्या जनसुनावणीस ग्रामस्थांनी मोठय़ा संख्येने सहभाग घ्यावा, असे खालापूरचे तहसीलदार दीपक आकडे यांनी सांगितले.

११ ते २५ फेब्रुवारीदरम्यान तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींतील २१ गावांत पर्यावरण संवेदनशील क्षेत्र निश्चित करण्यासाठी गावांतील सरंपचांच्या अध्यक्षतेखाली गावांचे वनरक्षक, तलाठी, कृषीसाहायक व ग्रामसेवकांच्या पाच सदस्यीय समितीसमोर जनसुनावणी (ग्रामसभा) घेण्याचे सरकारने निश्चित केले आहे. नैसर्गिक जैवविविधतेसाठी समृद्ध, भूक्षेत्र, मानवनिर्मिती भूवापर, वनक्षेत्र, तलाव, नदी-नाले, गुरचरण क्षेत्र विचारात घेऊन आलेखन केलेला नकाशा ग्रामस्थांना सरकारकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्या वेळी गावठाण क्षेत्र, अकृषिक वापराखालील भूक्षेत्र, शेतीखालील क्षेत्र, अनैसर्गिक-मानवनिर्मित भूवापर यांचा विचार करून कुठल्या क्षेत्राचा पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात समावेश करायचा, याबद्दल ग्रामस्थांनी या जनसुनावणीत द्यायचा आहे. त्यानंतर मात्र कोणताही बदल सरकार स्तरावर मान्य करण्यात येणार नसल्यानेच समाविष्ट गावांतील ग्रामस्थांनी आता होऊ घातलेल्या जनसुनावणीत सहभागी व्हावे, असे आवाहन तहसीलदार दीपक आकडे यांनी केले आहे.

खालापूर तालुक्यातील सोंडेवाडी, बोरगाव (खुर्द), ग्रामपंचायत बोरगांव (१२ फेब्रुवारी), निगडोली ग्रामपंचायत नडोदे, घोडवली ग्रामपंचायत नावदे (१३ फेब्रुवारी), जांबरूग, उबरविरा, बीड (१४ फेब्रुवारी), ग्रामपंचायत परखंडे, होराळे, तळाशी, शिरवली (१६ फेब्रुवारी), ग्रामपंचायत करबेळी, उजळोली, गोर्ह, खरीवली (१८ व २० फेब्रुवारी), ग्रामपंचायत तोंडली, नंदनपाडा, तुकसई, खांबेवाडी, उंबरे (२१ फेब्रुवारी), ग्रामपंचायत वरोसेतर्फे वनखळ, वरोते, नढाळ, चौक (२३ फेब्रुवारी), ग्रामपंचायत चावणी, आडोशी (२४ फेब्रुवारी), ग्रामपंचायत तळवली, वडगाव (२५ फेब्रुवारी) सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत समितीने निश्चित केलेल्या ठिकाणी त्या त्या गावांत सभा आयोजित करण्यात येणार आहेत. या जनसुनावणीचा अहवाल राज्य सरकारमार्फत केंद्र सरकारला सादर केला जाणार आहे.

खालापुरातील २१ गावांसह, कर्जत ४५, महाड ६८, माणगाव ४७, पोलादपूर ३६, रोहा ८६, सुधागड ५२ अशा एकूण जिल्ह्यातील ३५६ गावांत पश्चिम घाट परिसंवेदनशील क्षेत्राची सीमा आणि वर्णनानुसार क्षेत्रपडताळणी करण्यात येणार आहे.

राज्यातील एकूणच पश्चिम घाट क्षेत्राकरता रायगडसह अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, धुळे, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदूरबार, पुणे, सांगली, ठाणे या १२ जिल्ह्यांतील ५६ तालुक्यांतील २२००गावांचा समावेश पश्चिम घाट क्षेत्रात करण्यात आलेला आहे. त्यातील रायगडमध्ये १९२७ चौ. किमी क्षेत्राचा समावेश होणार आहे. खालापूरमध्ये १३३ चौ. किमी क्षेत्राचा समावेश आहे. त्यामुळे पुढील होणा-या जनसुनावणीस खालापूरसह रायगडची जनता अभिप्राय नोंदवण्यासाठी काय भूमिका घेणार आहे? याकडे पर्यावरणतज्ज्ञांचे लक्ष आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version