Home मध्यंतर भन्नाट खिडकीपल्याडचं पक्षी दर्शन

खिडकीपल्याडचं पक्षी दर्शन

0

एक साधी संसारात मग्न असलेली गृहिणी. परंतु चांगलं काहीतरी कार्य करावं अशी तिची आंतरिक इच्छा…

एक साधी संसारात मग्न असलेली गृहिणी. परंतु चांगलं काहीतरी कार्य करावं अशी तिची आंतरिक इच्छा. एक दिवस सहज म्हणून मुलांचा छोटा डिजीटल कॅमेरा त्या हाताळत होत्या. त्याच वेळेस खिडकीसमोरच्या काटेसावरीवर कोतवाल नावाचा पक्षी बसलेला दिसला. मुलगी म्हणाली, ‘‘काढ बरं फोटो, पाहुया येतोय का?’’ मग त्यांनी नेम धरून कॅमेरा क्लिक केला. उत्सुकतेने फोटो पाहिला तर पक्षी गायब! क्लिक करायला व पक्षी उडायला एकच वेळ साधली गेली होती. तो पक्षी पुन्हा तिथेच येऊन बसला. मग मात्र नीट नेम धरला व परत क्लिक केलं, या वेळेस मात्र तो उडाला होता, पण उडतानाचा, पंख पसरलेला सुंदर फोटो कॅमेरात बंद झाला होता. त्यातून त्यांना पक्षांचे फोटो काढायचा नादच लागला. खिडकीसमोर एक लालबुड्या बुलबूल येऊन बसायचा. त्याने फोटोसाठी पोज द्यायला सुरवात केली व फोटोग्राफीची रीतसर सुरुवात झाली.

गेल्या वर्षभरात सीमा राजेशिर्के यांनी, आपल्या ब्रम्हांड, ठाणे येथील घराच्या खिडकीतून साठ विविध प्रकारच्या पक्षांचे निरीक्षण करून त्यांची नोंद ठेवली आहे. तसंच चाळीस विविध पक्षांचं छायाचित्रण केलं आहे. त्यासाठी सलिम अली, ग्रिमिट, सतीश पांडे यांच्या पुस्तकांचा त्यांना खूप उपयोग झाला. विशेष म्हणजे, क्रेक म्हणजे चित्रांग, लाल पानलावी, जांभळी पानकोंबडी आदी दुर्मीळ होत चाललेल्या महत्त्वाच्या पक्षांनाही त्यांनी घराच्या खिडकीतून कॅमे-यात टिपलेलं आहे. खिडकीत ठेवलेले चिऊताईसाठीचे दाणे खायला साळुंखी, कबुतर येतंच, पण केळं खाण्यासाठी किंवा फोटो काढण्यासाठी तिन्ही प्रकारचे बुलबुल, पोपट खिडकीत येत राहतात. त्यांच्या नादाने, मुनिया, कोतवाल, खाटीक, तीन-चार प्रकारच्या मैना, एवढंच काय तर शिक्रासारखे पक्षीदेखील फोटोसेशनला खिडकीत येत राहातात.

असे जवळपास अडीचशेच्या वर छायाचित्रांचे प्रदर्शन ठाणे महानगर पालिकेच्या कलाभवन मध्ये २१ नोव्हेंबरपासून सुरू झाले असून, ते २३ नोव्हेंबरपर्यंत बघता येणार आहे. स्थिरचित्रण करताना त्यांनी या पक्षांचे चलचित्रणही केलं व पक्षीजीवनावर माहीतीपटही तयार केला आहे. तो माहितीपटही या प्रदर्शनावेळेस दाखवला जात आहे. या प्रदर्शनातून पक्षांचे निसर्गातले महत्त्वाचे स्थान व निसर्ग संवर्धनाची आत्यंतिक गरज लक्षात येते.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, छायाचित्रण वा पक्षीनिरीक्षण या दोन्ही विषयांत कोणतेही पारंपरीक शिक्षण नसताना, हिमतीने ते ज्ञान मिळवून हा छंद त्यांनी जोपासला आहे व आपला फावला वेळ सत्कारणी लावलेला आहे.

स्थळ : कलाभवन, ठाणे महानगर पालिका

वेळ :  सकाळी १० ते सायंकाळी ७

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version