Home टॉप स्टोरी गणेश विसर्जनासाठी खंडणीची मागणी

गणेश विसर्जनासाठी खंडणीची मागणी

1

गणपतीचे विसर्जन करण्यासाठी गिरगाव चौपाटीवर पोहोचलेल्या एका कुटुंबाकडे खंडणीची मागणी करून रक्कम न दिल्यास विसर्जन करू न देण्याची धमकी देणा-या त्रिकुटाला शनिवारी डी. बी. मार्ग पोलिसांनी अटक केली.

मुंबई – गणपतीचे विसर्जन करण्यासाठी गिरगाव चौपाटीवर पोहोचलेल्या एका कुटुंबाकडे खंडणीची मागणी करून रक्कम न दिल्यास विसर्जन करू न देण्याची धमकी देणा-या त्रिकुटाला शनिवारी डी. बी. मार्ग पोलिसांनी अटक केली. गणेश मंडळ व गणेश भक्तांना धमकावून त्यातून पैसे उकण्याचे प्रकार पहायला मिळत असून, अशाच एका प्रकारात नागपाडयातील गणपती मंडळाकडे खंडणीची मागणी केल्याप्रकरणी शुक्रवारी  पोलिसांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या चार आरोपींना अटक केली होती.

आपल्या लाडक्या बाप्पाची दीड दिवस यशाशक्ती सेवा केल्यानंतर रमेश रामचंद्र गौडा व त्यांचे कुटुंबीय शनिवारी गिरगाव चौपाटीवर गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी गेले. गौडा कुटुंबीयांनी विसर्जनापूर्वी गणपतीची आरती व पूजा केली. दरम्यान, तीन लुटारू त्यांच्याकडे आले व त्यांच्या परवानगीशिवाय गणपतीचे विसर्जन करू शकत नाही, असे सांगत ‘पैसा दो, नही तो विसर्जन नही करने देंगे’, असे धमकावून त्यांच्याकडे दोन हजार रुपयांची खंडणी मागितली. यावर त्यांनी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गौडा यांच्या दाव्यांची पडताळणी करून या त्रिकुटाबाबत माहिती मिळवून त्यांना अटक केली.

अरुण काळे, गणेश पवार व रामा पवार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांच्या कारवाईनंतर गौडा कुटुंबीयांनी गणेश मूर्तीचे विसर्जन केले. गणेशोत्सवाच्या दरम्यान भक्तांना व मंडळांना धमकावण्याचा नवा ‘ट्रेंड’ पहायला मिळत आहे. नागपाडयातील कामाठीपुरा परिसरातील गणपती मंडळांकडे ‘प्रोटेक्शन मनी’ची मागणी करणा-या गोपाळ तमंग, मेघराज साबुनकर ऊर्फ मेघ्या, निलेश अमटोलकर व जुनैद रेहमान अख्तर कुरेशी या चौघांना नागपाडा पोलिसांनी शुक्रवारी अटक केली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी स्थानिक गणेशोत्सव मंडळांकडे याची पडताळणी करून आरोपींना अटक केली. यातील तमंग विरोधात १२, साबुनकर विरोधात १०, अमटोलकर विरोधात ४ तर कुरेशी विरोधात तीन गुन्हे दाखल आहेत.

तक्रार करण्याचे पोलिसांचे आवाहन

दीड दिवसांच्या गणरायाच्या विसर्जनादरम्यान गौडा कुटुंबाकडे त्रिकुटाने दोन हजार रुपयांची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने पोलिसांनी अशा लुटारूंच्या मुसक्या आवळण्यासाठी कंबर कसली आहे. अन्य भाविकांकडेही अशा प्रकारे कोणी खंडणी मागितल्यास त्यांनी विसर्जनाच्या ठिकाणी तैनात असलेल्या पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version